दर महिन्याला वाढणाऱ्या इंधनांच्या किमती, रस्त्यांची बिकट अवस्था, वाहतूक कोंडी या असंख्य समस्यांकडे पाहता भारतीय ऑटोमोबाइल ग्राहक शक्यतो या जादा मायलेजवाल्या गाडय़ांकडे लक्ष देतो. भारतीय बाजारपेठेतील अशाच काही जास्त मायलेज देणाऱ्या गाडय़ा..
ऑटोमोबाइल जगतातील भारतीय मानसिकतेचं दर्शन घडवणारी एक जाहिरात मध्यंतरी खूप गाजली होती. एका स्पेस शटलची माहिती देणारा मार्गदर्शक त्या शटलच्या तांत्रिक बाबींबाबत सांगत असतो. त्याची माहिती देऊन झाल्यावर कोणाला काही प्रश्न आहेत का, असे विचारतो. गर्दीतून एक भारतीय माणूस हात वर करतो आणि विचारतो, कितना देती है? आपल्या गाडीच्या टाकीत पडलेल्या पेट्रोलच्या थेंबाथेंबाचा हिशेब करणारं भारतीय मन या जाहिरातीतून लख्खं दिसलं होतं. एवढंच कशाला, उतरणीवर असताना टू व्हीलर बंद करून पेट्रोल वाचवण्याची क्लृप्ती भारतातच सर्रास वापरली जाते. इथे एखादी गाडी किती आलिशान आहे, यापेक्षा ती किती मायलेज देते, याची चर्चा जास्त होते. म्हणूनच भारतात जाहिरात करताना ऑटोमोबाइल कंपन्याही एक लिटर पेट्रोलमध्ये गाडी किती धावणार, ही माहिती ठळकपणे देतात. याच मानसिकतेचा विचार करून अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेसाठी खास मायलेज देणाऱ्या गाडय़ाही बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यात मारुती-सुझुकी या कंपनीला तोड नाही. एक तर मारुती-सुझुकी ही कंपनी भारतीय रस्त्यांसाठी गाडय़ा बनवण्यात अव्वल आहे. पण विशेष म्हणजे परदेशातून, खासकरून युरोपमधून आलेल्या कंपन्यांनीही भारतीय बाजारपेठेच्या गरजेप्रमाणे गाडय़ांची इंजिनं कमी तेल पिणारी आणि जास्त धावणारी, अशी डिझाइन केली आहेत. अशाच भारतीय मायलेजधार्जण्यिा मानसिकतेला आधार देणाऱ्या दहा गाडय़ांची माहिती या लेखात देत आहोत. विशेष म्हणजे या दहाही गाडय़ा हॅचबॅक प्रकारात मोडणाऱ्या आहेत.
टाटा नॅनो – २५.३५ किमी/लिटर
‘लाखाची गाडी-टाटाची गाडी’ या उक्तीप्रमाणे मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातील गाडी असलेली नॅनो ही नि:संशय भारतातील सर्वात जास्त मायलेज देणारी गाडी आहे. ६२४ सीसी क्षमता असलेलं दोन सििलडरचं नॅनोचं हे इंजिन ३८ बीएचपी एवढी शक्ती निर्माण करतं. या गाडीला पॉवर स्टिअिरग असल्याने ही गाडी भारतातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठीही चांगली आहे. तसंच केवळ ६२४ सीसी एवढी क्षमता असल्याने गाडी एक लिटर इंधनात २५.३५ लिटर एवढी पळते.

मारुती-सुझुकी अल्टो के-१० एजीएस – २४.०७ किमी/लिटर
भारतीय रस्त्यांसाठी म्हणून बनलेल्या गाडय़ांमध्ये मारुती-सुझुकी कंपनीच्या गाडय़ांची गणना होते. या कंपनीची अल्टो ही गाडी भारतातील मध्यमवर्गीयांमध्ये प्रचंड लोकप्रिय गाडी आहे. ६७ बीएचपी एवढी शक्ती निर्माण करणारं १ लिटर के सीरिज इंजिन असलेली ही गाडी वजनाने हलकी असल्याने सेलेरियो या मारुतीच्याच गाडीपेक्षा जास्त मायलेज देते. ही ऑटोमॅटिक गिअरवाली गाडी एका लिटरमध्ये २४ किलोमीटर धावते.

मारुती-सुझुकी सेलेरियो एएमटी
– २३.१ किमी/लिटर
भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या दहा गाडय़ांच्या यादीत पाच गाडय़ा मारुती-सुझुकी या कंपनीच्या आहेत. पण यात तिसऱ्या स्थानावर आहे. मारुतीने गेल्या वर्षीच भारतीय रस्त्यांवर उतरवलेली सेलेरियो ऑटोमॅटिक ही गाडी! हॅचबॅक श्रेणीत ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सोय देणाऱ्या या गाडीत १ लिटर के सीरिज इंजिन आहे. हे इंजिन ६७ बीएचपी एवढी शक्ती निर्माण करतं. तसंच या श्रेणीतील सर्वात जास्त मायलेज देतं. मारुती-सुझुकी सेलेरियो एएमटी ही गाडी २३.१ किमी प्रति लिटर एवढा मायलेज देते.

मारुती-सुझुकी अल्टो ८००
– २२.७६ किमी/लिटर
मारुती-सुझुकी या कंपनीची भारतातील एके काळची ओळख म्हणजे मारुती-८०० ही गाडी. आजही अनेक जणांच्या गॅरेजमध्ये असलेल्या या गाडीने भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्राचा चेहरा बदलला होता. हीच गाडी मारुतीने नव्या रूपात आणि मारुती-सुझुकी अल्टो-८०० या नावाने आणली. ८०० सीसी, तीन सिलेंडर असलेलं गाडीचं इंजिन ४७ बीएचपी एवढी शक्ती निर्माण करतं आणि २२.७६ किमी प्रति लिटर एवढा मायलेज देतं. त्यामुळे शहरात चालवण्यासाठी ही उत्तम गाडी मानली जाते.

मारुती-सुझुकी वॅगनआर – २०.५१ किमी/लिटर
गेल्या दोन ते तीन पिढय़ांची लाडकी गाडी म्हणजे मारुती-सुझुकी वॅगन आर ही गाडी! शहरातील तसेच लांबच्या प्रवासासाठी अत्यंत उत्तम असलेल्या या गाडीच्या स्पोर्ट्स आवृत्तीचं इंजिन १ लिटर के सीरिजचं आहे. हे इंजिनही डॅटसन गो एवढीच म्हणजे ६७ बीएचपी शक्ती निर्माण करतं. पण मायलेजच्या बाबतीत काही मीटरने मार खातं. वॅगनआर साधारण २०.५१ किलोमीटर प्रति लिटर एवढं मायलेज देते.

मारुती-सुझुकी स्विफ्ट १.२ – २०.४ किमी/लिटर
आपल्या वेगळ्या आकारामुळे आणि ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील प्रेझेन्समुळे लोकप्रिय झालेली मारुती-सुझुकीची आणखी एक हॅचबॅक म्हणजे स्विफ्ट. या गाडीच्या १.२ आवृत्तीचा मायलेज दहा सर्वोत्तम गाडय़ांच्या श्रेणीत आठव्या स्थानावर आहे. १.२ लिटर, ४ सििलडर के सीरिज इंजिन ८४ बीपीएच एवढी शक्ती निर्माण करतं. त्यामुळे या गाडीचा वेगही चांगला आहे. तसंच इंजिनाच्या शक्ती निर्मितीच्या मानाने ही गाडी प्रत्येक लिटरमागे २०.४ किमी एवढी धावते.

ह्य़ुंदाई इयॉन
१.० – २१.१ किमी/लिटर
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय बाजारपेठेत मुसंडी मारणारी कंपनी म्हणजे ह्य़ुंदाई. हॅचबॅक प्रकारात आधी सेंट्रो आणि नंतर आय-१०, आय-२० अशा गाडय़ा आणि सेदान प्रकारात असेंटपासून ते व्हर्ना, एलेण्ट्रापर्यंतच्या गाडय़ा यांमुळे भारतीय बाजारपेठेत ह्य़ुंदाई कंपनी लोकप्रिय झाली. याच कंपनीची मायलेजसाठी ओळखली जाणारी गाडी म्हणजे ह्य़ुंदाई इयॉन १.०! १ लिटर काप्पा व तीन सििलडर इंजिन असलेली ही गाडी ६८ बीएचपी एवढी शक्ती निर्माण करते. ही गाडी एका लिटरमध्ये तब्बल २१.१ किमी धावते.

डॅटसन गो – २०.६४ किमी/लिटर
निसान या जॅपनीज कंपनीचाच भाग असलेल्या डॅटसनची भारतातील पहिली गाडी म्हणजे डॅटसन गो. या कंपनीने भारतीय मायलेजप्रिय मानसिकतेचा विचार करून आपल्या पहिल्या गाडीत त्याची पुरेपूर काळजी घेतली. १.२ लिटर तीन सििलडर पेट्रोल इंजिन असलेली ही गाडी ६७ बीएचपी एवढी शक्तीही निर्माण करते आणि त्याचबरोबर २०.६४ एवढं मायलेजही देते. मात्र ही गाडी भारतीय बाजारपेठेत अद्याप स्थिरावलेली नाही.

हय़ुंदाई आय-१० १.१
– १९.८१ किमी/लिटर
मायलेजच्या बाबतीत अव्वल दहा गाडय़ांच्या शर्यतीत ह्य़ुंदाईची ही दुसरी गाडी! सेंट्रो ही गाडी हय़ुंदाईने बाजारपेठेतून मागे घेतल्यानंतर त्याची जागा आय-१० ने घेतली. याच आय-१०च्या १.१ या आवृत्तीत १.१ लिटर आयआरडीई इंजिन १९.८१ किमी प्रतिलिटर एवढे मायलेज देते. तीन सििलडर असलेलं हे इंजिन ६७ बीएचबी एवढी शक्ती निर्माण करतं. त्यामुळे शहरी वाहतुकीसाठी ही गाडी अत्यंत खास मानली जाते.

निसान मायक्रा अ‍ॅक्टिव्ह
– १९.४९ किमी/लिटर
जपानी कंपनी असलेल्या निसानची मायक्रा अ‍ॅक्टिव्ह स्पोर्ट्स ही गाडी १.२ लिटर, ३ सििलडर इंजिनमुळे मायलेजच्या बाबतीत उत्तम मानली जाते. ६८ बीएचपी एवढी शक्ती निर्माण करणारं हे इंजिन प्रत्येक एक लिटरमागे १९.४९ किमी धावू शकतं. तसंच या गाडीत प्युअर ड्राइव्ह तंत्रज्ञान वापरल्याने निसानची ही गाडी काहीशी पर्यावरणप्रेमी मानली जाते.

रोहन टिल्लू
rohan.tillu@expressindia.com