यंदाच्या सणांच्या हंगामाचा प्रारंभ १५ ऑगस्टपासूनच सुरू होत आहे. जोडून आलेल्या सुटीमुळे एकूणच खरेदीची बाजारपेठ गजबजू लागली आहे. वाहन उद्योगासाठी असलेल्या दसऱ्यापर्यंतचा प्रतीक्षा कालावधी जुलैमध्ये वाढणाऱ्या वाहन विक्रीने सुस केला आहे. हा कल मार्च २०१६ अखेपर्यंत, नाही तर किमान डिसेंबर २०१५ पर्यंत कायम राहील, अशी आशा आहे.
तमाम अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत असताना भारतीय वाहन उद्योगानेही त्यापासून फारकत न घेणे म्हणजे एक आश्चर्यच ठरले असते. मात्र गेल्या काही महिन्यातील वाहन उद्योगाच्या विक्रीचा प्रवास पाहिला तर त्यावर विश्वासच ठेवावा लागेल. केंद्रातील मोदी सरकारची वर्षपूर्तीही झाली. नव्या सरकारबरोबरच नवे आर्थिक वर्षही रुळले. मात्र वाहन विक्रीने काही वेग घेतला नाही.
जुलैमधील वाढत्या वाहन विक्रीने तमाम वाहन उद्योग क्षेत्राला एक प्रकारचे स्फुरणच चढले आहे. गेल्या महिन्यात भारतातील देशांतर्गत प्रवासी विक्री दुहेरी आकडय़ात वाढली आहे. जुलैमध्ये वाहन विक्री १.६ लाखांवर पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी ती १.५ लाखही नव्हती. चालू आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला, एप्रिलमध्ये वाढेलल्या १८ टक्के प्रमाणानंतर विक्री सातत्याने रोडावतच होती.जुलैमध्ये प्रवासी वाहन विक्री पूर्वपदावर येताना दिसली असली तरी दुचाकी वाहनांच्या मागणीने मात्र रिव्हर्स गीअर टाकला आहे. दुचाकीत अव्वल असणाऱ्या हीरो मोटोकॉर्पने ८ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदविली आहे, तर टीव्हीएस, होन्डा यांचा मोटरसायकल तसेच स्कूटरचा खप वाढला आहे.  देशातील एकूण प्रवासी कार बाजारपेठेपैकी जवळपास निम्मा हिस्सा राखणाऱ्या मारुती सुझुकीने तब्बल २३ टक्क्यांची वाढ नोंदवीत जुलैमधील १.१० लाख वाहन विक्रीचा टप्पा गाठला आहे. स्पर्धक ह्युंदाईची विक्रीही त्याच प्रमाणात वाढली आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांत नफ्यातील घसरण राखणाऱ्या टाटा मोटर्सच्या विक्रीत २७ टक्के वाढ झाली आहे.मारुती सुझुकीची एस क्रॉस, ह्युंदाईची क्रेटा, होन्डाची नवी अमेझ, फोर्डची फिगो अस्पायर, टोयोटाची इटिऑस, शेव्हर्लेची ट्रेलब्लेझर या माध्यमातून भारतीय वाहन कंपन्यांनी त्यांची नवी वाहने यंदाच्या हंगामात सादर केली. तसेच दुचाकीमध्ये होन्डा, हीरो मोटोकॉर्प, यामाहा यांनीही नव्या वाहनांची रेलचेल नोंदविली. सणांचा येणारा कालावधीही नव्या वाहनांसाठीच राखून ठेवला की काय अशी स्थिती आहे. महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्र तिची खऱ्या अर्थाने पहिली कॉम्पॅक एसयूव्ही सप्टेंबरच्या मध्यात घेऊन येईल. टीयूव्ही ३०० नावाचे हे चार मीटर लांबीच्या आतील वाहन या गटात काहीसे उशिराने दाखल होत असले तरी फोर्ड इकोस्पोर्ट, रेनो डस्टर या मातबरांना ते निश्चितच टक्कर देईल.येत्या अवघ्या आठ आठवडय़ात किमान सहा तरी नवीन वाहने निवडक कंपन्या सादर करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये टाटा समूहातील जग्वार लॅन्ड रोव्हरची डिस्कव्हरी स्पोर्टचाही समावेश आहे. मारुती सुझुकीची नवी बलेनोही प्रीमियम हॅचबॅक श्रेणीतील असेल. येणाऱ्या सणांच्या कालावधीत आणखी वाहने बाजारात येण्याची शक्यता असतानाच या दरम्यान वाहनांची मागणीही वाढेल, असा विश्वास वाहन उत्पादकांना आहे. तेव्हा यंदाच्या दसरा-दिवाळीपर्यंत विक्री पूर्वस्थितीत येण्याचा अंदाज आहे.
स्वस्त वाहन कर्जाची साथ हवी
व्याजदर कपातीचा लाभ मात्र अद्याप वाहन विक्रीला मिळालेला नाही. रिझव्‍‌र्ह बँकेने तिच्या ताज्या पतधोरणात स्थिर व्याजदर जाहीर केले होते. परिणामी अन्य कर्जासह वाहनांसाठीच्या कर्ज व्याजदरात फारसा फरक पडलेला नाही. दसऱ्यापूर्वी येणाऱ्या मध्यवर्ती बँकेच्या पतधोरणात किमान पाव टक्का कपात झाल्यास बँका वाहनांसाठीचे कर्ज कमी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. गृहकर्जाचे व्याजदर वार्षिक १० टक्क्याच्या काठावर आले असले तरी वाहनासाठीचे कर्ज व्याजदर हे अद्यापही दुहेरी आकडय़ातच आहेत.
चिनी वाहन विक्रीही रोडावली
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताइतकीच महत्त्वाची असलेली चिनी वाहन बाजारपेठेची चकाकीही गेल्या काही कालावधीत लुप्त पावली आहे. चीनची जुलैमधील प्रवासी वाहन विक्री ही गेल्या जवळपास दीड वर्षांच्या तळात विसावली आहे. गेल्या महिन्यात २.५ टक्के घसरण नोंदविताना चीनमधील कंपन्यांची वाहन विक्री १३ लाख होत फेब्रुवारी २०१४ च्या किमान स्तरावर आली आहे. ७ टक्क्यांखालील आर्थिक विकास प्रवास करणाऱ्या चीनला सावरण्यासाठी तेथील युआन या स्थानिक चलनाचे अवमूल्यन केल्यानंतर चिनी वाहनांच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून वाहन निर्यात यंदाच्या वर्षांत २० टक्क्यांनी वाढेल असा आशावाद त्या जोरावर चीनच्या प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांनी व्यक्त केला आहे. वाहनांना मागणी येण्यासाठी तिच्या खरेदीवर घसघशीत सूट देण्याची प्रथा चीनमध्ये ऐन मंदीच्या कालावधीत रूढ झाली आहे.