स्वत:ची गाडी घेण्याचे स्वप्न मी सतत पाहात असे. अखेर िहमत करून १९७४ साली मी १९६३ मध्ये तयार झालेली जुनी फियाट विकत घेतली. आम्हा चौघांसाठी ही गाडी पुरेशी होती. त्या गाडीने आम्ही बराच प्रवास केला. पण जुनी असल्याने ती बरेचदा गॅरजेमध्ये असायची. एका लग्नाला औरंगाबादला जाण्यासाठी जुलमध्ये पत्नी, दोन मुली व सासूबाई व मी असे आम्ही पाचही जण दुपारी तीन वाजता पुण्याहून निघालो. शिक्रापूपर्यंत चांगला प्रवास झाला, मात्र त्यानंतर गाडी गरम झाली. बॉनेट उघडले तर भपकन वाफ अंगावर आली. रेडिएटरमधील पाणी संपल्याने ते भरून दुरुस्तीसाठी शिरूपर्यंत पोहोचावे म्हणून निघालो. पण पुढे आठ-दहा किमी अंतर गेलो तर पुन्हा तोच प्रकार झाला. पावसामुळे जागोजागी रस्ते उखडलेले होते. मग एका नातेवाइकाकडे रात्रीचे जेवण घेतले, आराम केला. रेडिएटरची तुटलेली नळी बदलून औरंगाबादकडे निघालो. नगर सोडले आणि पुन्हा तोच प्रकार घडला. पाण्याच्या डबक्यातील पाणी रेडिएटरमध्ये टाकून कसेबसे मध्यरात्री लग्नघरी, औरंगाबादला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी लग्नाचा कार्यक्रम उरकून गॅरेज गाठले. रेडिएटर दुरुस्तीला टाकला. गॅरेज मालकाने इंजिन गरम होऊन जाम झाल्याचे सांगितले. मग इंजिन उतरवून त्याची दुरुस्ती झाली अखेरीस सायंकाळी पाच वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला सज्ज झालो. गाडी सुरू केली पण पुढेच जाईना! गॅरेजमध्ये हॅंड ब्रेक लावला होता, तो सोडल्यावर परतीचा प्रवास सुरू झाला. लवकरच अंधार पडायला लागला. पण नगरच्या पुढे आम्ही आलो आणि गाडीने पंक्चरचा हिसका दाखवला. अखेर स्टेपनीवर गाडी पुण्यापर्यंत आणली. अशी आमची फजिती झाली. नंतर खूप फिरलो गाडी घेऊन. फियाटनंतर नवीन मारुती ८०० घेतली. आता माझ्याकडे वॅगन आर आहे. वयाची पंच्याहत्तरी लवकरच गाठणार आहे. मात्र, अजूनही फिरण्याची हौस काही गेली नाही. अनेकदा नागपूर, खोपोली वगरे असा फिरतो. माझ्या जुन्या फियाटची चेष्टा करणारे लोक आता मात्र माझ्या गाडी चालवण्याच्या कौशल्याचे कौतुक करतात.
– अरिवद पांडे, पुणे