तीनचाकी मालवाहू टेम्पो, चारचाकी लहान मालवाहू ट्रक या वाहनांचे मालासहित अधिकृत जास्तीत जास्त वजन तीन हजार किलोपेक्षा कमी असते. या वाहनांना परमिट लागत नाही. ज्या वाहनांना परमिट नसते त्या वाहनास व्यवसाय कर आणि फिटनेस उशिरा केले तर त्याबद्दल विलंब दंड नसतो, परंतु असे वाहन रस्त्यावर चालताना आढळून आले तर मात्र फिटनेस नसताना वाहन चालवण्याचा दंड भरावा लागतो. वर उल्लेख केलेली वाहने वगळता इतर वाहने जसे मध्यम मालवाहू, जड मालवाहू, प्रवासी वाहन या वाहनांना उशिरा फिटनेससाठी विलंब दंड अथवा निलंबन यापकी एक शिक्षा होते.
मुंबई शहर, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा यामध्ये फिटनेससाठी उशिरा सादर  करण्याची परवानगी घेण्याचा  ‘ना वापराचा अर्ज’ सादर न केलेली वाहने यासाठी निलंबन किंवा दंडाचा ठराव केलेला आहे. हा दंड एक ते दहा दिवसांसाठी एक हजार रुपये तसेच त्यापुढील प्रत्येक दिवसासाठी १००/- रु. आहे. हा दंड ऑटो रिक्षा-टॅक्सीसाठी  १५ डिसेंबर २०१२ आणि इतर वाहनांसाठी १५ एप्रिल २०१३ पासून लागू झालेला आहे. म्हणजे सध्या हा दंड जास्तीत जास्त ८० हजारांच्या जवळपास जाऊन ठेपला आहे.
अर्थात पूर्वपरवानगी घेऊन वाहन उभे करून ठेवलेले असल्यास तसा पुरावा तपासून हा कालावधी निलंबन काळात रुपांतरित करून दंड भरावा लागत नाही. या कडक नियमामुळे वाहने फिटनेससाठी वेळेवर दाखवण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे वाहन कर भरणा, व्यवसायकर भरणा, विमा हप्ता भरणा, बँक फायनान्सर हप्ता भरणा, पीयूसी नवीकरण, परवाना नूतनीकरण, परवाना प्राधिकार पत्राचे नूतनीकरण, वाहनांवरील केसेस सोडवणे या बाबी वेगाने होत आहेत. हे धोरण खूप यशस्वी ठरले आहे असेच यावरून दिसून येते.
संजय डोळे,   – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे