नोंदणीसाठी वाहनाचे मुख्य प्रकार खासगी आणि व्यावसायिक वाहन असे असतात. मोटारसायकल, कार, जीप टाइप वाहने म्हणजे खासगी वाहने. काही चारचाकी वाहने जेव्हा  टूरिस्ट म्हणून वापरली जातात तेव्हा ती व्यावसायिक वाहने ठरतात. खासगी वाहनांचे नोंदणीचे प्रमाण खूप जास्त असते. आपल्याकडे घरापासून कामावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहन व्यवस्था अत्यंत अपूर्ण असल्याकारणाने महानगरामध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहनांची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होते. हे प्रत्येक वाहन नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे.
वाहन खरेदी अधिकृत वितरकाकडून खरेदी करावे. वाहनाची नोंदणी करून देण्याची जबाबदारी कायद्याने वितरकाची असते. आपण वाहन अधिकृत वितरकाकडून घेतलेले नसेल तर आपली फसवणूक होऊ शकते. आपल्या ताब्यात वाहन मिळते पण आपल्या वाहनाची नोंदणी झालेली नसते. खोटा नंबर दिला जाऊ शकतो. म्हणून आपण पेमेंट आपल्या खात्यावरून जारी केलेल्या चेकने करावे. अमुकच मुहूर्तावर गाडी घरी आली पाहिजे असा आग्रह धरू नये, त्यामध्ये आपण फसवले जाण्याची शक्यता असते. अधिकृत वितरकाकडून वाहनाचा क्रमांक मिळाला असला तरी आपण स्वत: त्या क्रमांकाची आरटीओ कार्यालयातून अर्ज करून माहिती मिळवावी. बऱ्याच वेळेस नुसता नंबर दिला जातो, पण वाहनाची नोंदणी केली जात नाही, कारण नंबर आगाऊ फी भरून राखीवदेखील ठेवता येतो. माहितीची फी अगदी नाममात्र असते. वितरकाकडून नोव्हेंबर २०१४ पावेतो तीन प्रकारच्या पसे भरल्याच्या पावत्या मिळणे आवश्यक होते. त्यातील स्मार्ट कार्ड फीची रु. ३९४ ची पावती आता भरावी लागत नाही. आता कर आणि शुल्क अशा दोनच पावत्या भराव्या लागतात. आपला योग्य पत्ता आणि मोबाइल क्रमांक दिला तर मोबाइलवर अलर्ट व घरपोच आरसी येते.
संजय डोळे,  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे