मी एफवायबीकॉमला १९९५ साली असताना माझे लग्न व्यवसायाने रासायनिक अभियंता असलेल्या मुलाशी झाले. त्यावेळी पगारपण कमी आणि परिस्थितीसुद्धा बेताची. लगेच वर्षांच्या आत मुलगा यश, तर चार वर्षांच्या फरकाने दुसरा मुलगा आकाश झाला, त्यात माझे शिक्षण सुरू.पुढे त्यांची शाळा, क्लास, संस्कार वर्ग सुरू झाले. त्यांना चालत नेण्या-आणण्याची कामे लागली. त्यांना आणण्यास कधी सासरे जायचे, तर कधी मी जायची. पण बाबा कधीच जात नसे. त्यावेळी आमच्याकडे एक हीरो होंडा होती, पण वापर कमी होत असे. जेव्हा बाबा घरी, तेव्हाच वापर होत असे. एक दिवस मी संस्कार वर्गाला यश, आकाशला सोडायला घेऊन गेले तेव्हा ते म्हणाले की, तू का नाही गाडी शिकत, म्हणजे आम्हाला घ्यायला येशील. त्यांच्या या प्रश्नांनी माझा डोक्यात चक्र फिरले आणि ते जेव्हा कंपनीतून आले तेव्हा मी त्यांच्याशी बोलले. त्यांनीसुद्धा लगेच माझी शिकवणी प्रारंभ केली. मग मी गाडीवर एक मागे आणि एक पुढे मुलांना बसवून परीक्षा देण्यास प्रारंभ केला. गीअर कसा टाकायचा; क्लच कसा सावकाश सोडायचा; गाडी कशी उठवायची, याचे सर्व धडे शिकवले आणि बरोबर चार दिवसांनी मी एकटीने त्यांच्या मदतीशिवाय गाडी चालवली. रस्ताच्या दोन्ही बाजूंनी लोक उभे राहून अभिमानाने पाहायचे. बायका तर आम्हालापण गाडी शिकवाल का, तुम्ही सांगाल ती फी देऊ. आमचे मिस्टर तर नेहमी तुमचे उदाहरण देतात, असे म्हणत आग्रह करू लागल्या. मुले तर आनंदानं त्यांच्या मित्रांना म्हणत, तुमचे बाबा येतात तर आमची आई येते न्यायला. एखादी कठीण गोष्ट शिकण्याचे बाळकडू माझ्या वडिलांकडून मिळालेले आहे, याचा मला फार गर्व आहे.
भावना राजेंद्र मेथा, महाड

माझी सखी.. स्प्लेंडर
मी माहेरची विजया खांडेकर मी अठराव्या वर्षांपासून एम८० चालवत होते. नोकरीला एम८० ने जात असे. लग्न झाल्यावर नवरोबांची बजाज सुपर चालवत होते. १९९० ते २००० अशी दहा वर्षे माझी मैत्रीण सुपर बजाजच होती. ती जुनी झाल्यावर स्प्लेंडर घेतली. पायातल्या गीअरची सवय नव्हती म्हणून जरा शंका होती. पण दोनच दिवसात मी सराईतासारखी चालवू लागले. बाइकच्या दोन्ही बाजूला  पिशव्या आणि मागे ऑक्टोपस हुकला सामान अडकवून मी अगदी सहज बाजार करन घरी येत असे. आज स्प्लेंडर शिकून १४ वर्षे झाली. पहिल्या सव्‍‌र्हिसिंगपासून ते बारीकसारीक दुरुस्तीसाठी मीच गाडी गॅरेजमध्ये घेऊन जाते. मला बाइकच्या मागच्या सीटवर बसायला कधीच आवडत नाही. अशा या माझ्या मत्रिणीमुळे मला रत्नागिरीतील सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांना जाता येणे सहज शक्य होते. रात्री अपरात्री मी तिच्यावर विसंबून कार्यप्रमाला जात असे. या माझ्या   मत्रिणीने मला कधीही दगा दिला नाही की कधीही अडचणीत आणले नाही. म्हणूनच मला ती अतिशय प्रिय आहे.
नेहा देशकुलकर्णी, मिरजोळे (रत्नागिरी)

कोणावर विसंबून राहात नाही
माझा गाडी शिकण्याचा श्रीगणेशा बजाज सुपरवरून झाला. माझ्या मिस्टरांनी माझ्याकडून गाडी चालवण्याचा चांगला सराव करून घेत मगच शिकाऊ वाहन परवाना काढून दिला. परिवहन अधिकाऱ्यांसमोर गाडी चालविण्याची वेळ आली तेव्हा मी एक राऊंड चांगल्या प्रकारे गाडी चालविली. तशी हा गाडी जड असल्याकरणाने विशेष म्हणजे याचे इंजिन एका साईडला असल्याने जेव्हा गाडी उभी करण्यास अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा मला गाडी नीट उभी न करता आल्यामुळे ती पडली. माझ्या मिस्टरांनी तर चक्क कपाळावरच हाक मारून घेतला ते चित्र जर माझ्या डोळयासमोर उभे राहिले तर हसू येते. नंतर पुन्हा एकदा परीक्षा झाली व अखेरीस मला लायसन्स मिळाले. नंतर तीच स्कूटर मी अनेकदा अलिबाग- पाली या रोडवर चांगल्या प्रकारे चालविली. एसटी रिझव्‍‌र्हेशन,गॅससाठी नंबर लावणे, पोस्ट, बँक यातील कामे प्रत्यक्ष जाऊन करावी लागत असल्याने मी गाडी लवकर शिकण्याचा खूप फायदा झाला. त्यानंतर मी यामाहा आरएस १०० ही गाडी सोलापूर-पुणे महामार्गावर वेगाने दामटवली. हिरो होंडा स्पलेंडर हीसुद्धा ट्रिपच्या वेळी अनेक वेळा चालविली. माझी सध्याची बाइक अ‍ॅक्सेस१२५ ही आहे. मला बी.एडच्या वेळेस या गाडीचा उपयोग चांगल्या प्रकारे झाला गाडीच्या वेळच्या वेळी सव्‍‌र्हिसिंग करण्याच्या सवयीमुळे आम्हाला कोणत्याही गाडीने कधीही त्रास दिला नाही. गाडी येण्याच्या या सवयीमुळे मला बऱ्याचशा कामांसाठी मिस्टांरावर अवलंबून रहावे लागत नाही.
संगीता शिंदे, चेंबूर (मुंबई)