बरोबर पाच वर्षं झाली. आजही गाडी शिकण्याचा तो पहिला दिवस अगदी कालचाच असल्यासारखा ताजा आहे. थोडीशी भीती, खूप जास्त उत्सुकता आणि प्रचंड उत्साह अशी भावनांची सरमिसळ मनात होती. खरंच सांगते, पूर्वी अजिबात असं वाटलं नव्हतं की, मी कधी स्कूटी चालवू शकेन. लहानपणापासूनच बिनधास्त स्वभाव असल्याने असेल, पण माझ्या स्वत:च्या अपेक्षेपेक्षा खूपच लवकर मी स्कूटी शिकले. आता स्कूटी चालवणं हे जणू माझं वेडच आहे. सिग्नल सुटला की सगळे कसे रेस लागल्यासारखे गाडी पळवत सुटतात. हायवेवर चालवताना शरीरात, मनात अक्षरश: रोमांच असतो. सुसाट चालवताना असं वाटतं की सगळं जग जणू मलाच फॉलो करतंय. स्कूटी चालवताना मी अक्षरश: ‘फ्री बर्ड’ असते. सुसाट स्कूटी चालवताना आमच्यामध्ये तिसरं कोणीच नसतं. आम्ही म्हणजे, मी व माझी अत्यंत लाडकी वेगो. माझं सासर कळवा (ठाणे) आणि माहेर पनवेल येथे आहे. माझ्या वेगोने मला व माझ्या माहेराला आणखी जवळ आणले आहे. बसची वाट पाहणं नको आणि लटकत, लोंबकळत जाणं नको. अचानक कधीही ठरवून वेगो कढावी व पाऊण तासात पनवेलला आईला भेटावं. ‘होणार सून मी या घरची’ मध्ये लक्ष्मीकांतसोबत सतत त्याच्या ‘ती’चा उल्लेख होतो, तशी माझी वेगो माझ्या आयुष्यातली ‘ती’ आहे. अशी सुसाट स्कूटी चालवताना हे भान मात्र नेहमीच असतं की, घरी माझी माणसं माझी वाट बघतायंत..