मी २०१४ ऑक्टोबरमध्ये निवृत्त झाले. आयुष्य मध्यमवर्गीयांसारखंच गेलं. स्वत:ची चारचाकी गाडी असावी असं स्वप्न होतं. तशा जुन्या चार गाडय़ा घेऊन र्वष-दोन र्वष वापरून विकल्या होत्या. शेवटी माझा विचार पक्का झाला. खूप महाग नको व अत्यंत गरजेची म्हणून मला स्वत:ला परवडणारी गाडी घ्यायची ठरवली. माझ्या दोन्ही पायांचं ऑपरेशन झाल्यामुळे मला कुणावर अवलंबून रहायचं नव्हतं. मुलांना स्वत:च्या नोकऱ्या सांभाळून मला सोबत करणं शक्य नाही म्हणून परवडणारी गाडी घ्यावी व स्वत: चालवावी असं मनात आलं व मी नॅनो घ्यायचं ठरवलं. छोटी गाडी असल्यामुळे चालवताना अडचण येत नाही. शिवाय किंमत सर्वसामान्य माणसाला परवडणारी. रतन टाटांना मनापासून धन्यवाद. गाडी घेतली व मोटार ड्रायव्िंहगला नाव घातलं. मनात पक्का निश्चय होता गाडी चालवायचीच. क्लासच्या मुलाने गाडीबद्दल माहिती दिली. मला गाडीच्या इंजिन व इतर भागांची माहिती हवी होती. कारण कधी अडचण आली तर स्वत:ला दुरुस्ती करता यावी, पण तो म्हणाला अगोदर गाडी चालवायला शिका. मग स्टार्टपासून गीअर बदलणे, क्लच, ब्रेक, अ‍ॅक्सिलरेटचा उपयोग, वळताना इंडिकेटरचा उपयोग कसा करायचा, फ्युएल इंडिकेटर, वायपरचा उपयोग, क्लच किती प्रमाणात दाबायचा, हँड ब्रेक कधी वापरायचा, गीअर कधी बदलायचा, पावसाळ्यात वायपर कसा वापरायचा, हेड लाइट, टेललाइट आणखीन बरंच काही शिकवलं. गाडी चालवण्याचा मला एवढा उत्साह व आनंद वाटत होता की मी एकटी कधी गाडी चालवेन, असे मला वाटत होते. शेवटी त्या शिकणाऱ्या मुलाने मला एकटीला गाडी चालवायला दिली. व्हीलवर त्याचापण हात असायचा. पण अ‍ॅक्सिलरेटवर मी एवढा जोर द्यायचे की गाडी जोरात पुढे जायची. खूप भीती वाटायची. तसेच चढणीवर गाडी थांबवली तर आपोआप मागे यायची. उभी करताना तिरपी उभी करायची. अशा छोटय़ा मोठय़ा अडचणी वारंवार यायच्या. मला वाटायचे एवढी मोठी बाई मी पण या चुका परत परत का करते? स्वत:चीच लाज वाटायची. मी मोठी असल्याने क्लासचा मुलगा मला ओरडायचा नाही. शेवटी परीक्षेपर्यंत मी गाडी व्यवस्थित चालवू लागले. परीक्षेत पास झाले. सध्या मी लायसन्स मिळण्याची वाट पाहात आहे. माझा स्वत:चा आत्मविश्वास व रस्त्याचे भान ठेवूनच मी स्वतंत्रपणे गाडी चालवीन याची खात्री आहे.    -पद्मा पाटोळे.

ड्रायिव्हग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. तुमचा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची.

-मेल करा.  ls.driveit@gmail.com