मला सायकल चालविता येत होती परंतु बाइकची फार भीती वाटे. त्यामुळे अगदी नोकरी लागली तोपर्यंत मी बाइक हातात घेतली नव्हती. घर आणि ऑफिस हे अंतर अधिक असल्यामुळे मी बाइक घेणं अपरिहार्य झालं. त्यामुळं २००४ला दसऱ्याच्या मुहूर्तावर बाइक घेण्याचं निश्चित केलं. कोणत्या कंपनीची बाइक घ्यायची यावर बराच खल करून यामाहा क्रक्स घेतली. शो रूममध्ये गेलो. व्यवहार करून गाडी ताब्यात घेतली. बाइक घेतली तर खरं, परंतु घरी न्यायची कशी? बाइक घेतली आणि तुम्ही शोरूमवर या असा निरोप शेजारच्यांना दिला. मग त्यांनीच माझ्या बाइकचे उद्घाटन केले आणि मला व माझ्या नव्याकोऱ्या बाइकला घरी आणून सोडले. मग पुढे त्यांच्याकडूनच बाइक चालवायला शिकलो.
रिक्षेची वाट पाहण्यातच याआधी निम्मा वेळ जाई. त्यामुळे स्वत:चं हक्काचं वाहन असण्याचं महत्त्व मला पटलं. बाइकमुळं येण्या-जाण्याचा वेळ वाचला व तो वेळ सत्कारणी लावला जाऊ लागला. बाइकवर अनेक महत्त्वाच्या कामगिरीसाठी प्रवास केला आणि करतोय. माझी बाइक आतापर्यंत एक लाख किलोमीटर फिरली आहे. मित्र म्हणतात की, साठ-सत्तर हजार किलोमीटरनंतर बाइक बदलून टाकावी, परंतु याबाबत मी कुणाचाही सल्ला ऐकला नाही. माझी बाइक माझ्यासाठी खूप लकी आहे. माझ्या जीवनाचा ती अविभाज्य घटक आहे. कुठलाही त्रास बाइकपासून नाही. इतक्या सावधपणे बाइक चालवितो की बाइक आजपर्यंत पडली नाही की पडू दिली नाही. नियमित सíव्हसिंग करतो, टायरची हवा चेक करतो आणि दररोज स्वच्छ धुतो आणि पुसतो. आजही ती नव्या नवरीसारखी दिसते. असं आहे माझं बाइकवेड.
किशोर कुळकर्णी, जळगाव,