मार्च महिना म्हणजे परीक्षांचा महिना.. पण परीक्षा संपल्यानंतर सगळ्यांनाच एक छानशी ट्रिप करावीशी वाटते. मग अशा वेळी गाडी काढून सगळ्या कुटुंबासह रोड ट्रिपला जावंसं वाटलं, तर त्यात काही नवल नाही. हाती गाडी आणि चार-आठ दिवस असतील, तर रोड ट्रिपसारखा दुसरा आनंददायी प्रकार नाही. मस्त घरातून निघायचं. गाडीत आवडतील अशी गाणी लावायची. स्वच्छ सूर्यप्रकाशात गाडी चालवायची. हव्या त्या ठिकाणी, हवा तेवढा वेळ थांबायचं. हे सगळं स्वातंत्र्य गाडीमुळे तुम्हाला मिळेल. पण त्यासाठी काही गोष्टी आधीच तपासून घ्यायला हव्यात. तुमची रोड ट्रिप सुरक्षित आणि सुखाची होवो, यासाठी या काही टिप्स.
९ मेकॅनिकला भेटणं मस्ट!
रोड ट्रिपवर निघण्यापूर्वी गाडीसह मेकॅनिकला भेटायलाच हवं. गाडीचं सíव्हसिंग अगदी महिन्याभरापूर्वीच करून आणलं असेल आणि गाडी एकदम मस्त चालत असेल, तरीसुद्धा लांबच्या ठिकाणी गाडीने जायचं असेल, तर एकदा गाडी मेकॅनिककडून तपासून आणायला हवी. गाडीत अगदी छोटे-मोठे प्रॉब्लेम्स असतील, तर मेकॅनिक ते नक्कीच दूर करू शकतो. या काही छोटय़ा गोष्टींमुळे तुमची ट्रिप अधिक आरामदायक होऊ शकते. मेकॅनिककडे जायचं नसेल, तर गाडीचं तेलपाणी, कूलण्ट आदी गोष्टी घरच्या घरी तपासून बघा. तसंच बॅटरी जोडणी व्यवस्थित आहे का, हेदेखील तपासायला विसरू नका. ट्रिपवर निघण्यापूर्वी बॅटरीच्या जोडणीला ग्रीस किंवा पेट्रोलियम जेली लावणं अधिक श्रेयस्कर!

९ हेडलाइट तपासणी
वायपर ठीक आहे, पण हेडलाइट कशाला, असाही प्रश्न मनात येऊ शकतो. मात्र बऱ्याचदा गाडीच्या हेडलाइट्सकडे आपलं दुर्लक्ष होतं. रात्रीच्या वेळी अंधाऱ्या रस्त्यावरून गाडी चालवण्याचा प्रसंग आला आणि हेडलाइट्स व्यवस्थित काम करत नसतील, तर नक्कीच मोठी समस्या उद्भवू शकते. ती टाळण्यासाठी हेडलाइट्सची तीव्रताच नाही, तर हेडलाइटच्या सॉकेटची काच तपासणंही गरजेचं आहे. या काचेवर खूपच ओरखडे असतील, तर ती काच बदलून घ्या. त्यामुळे प्रकाशझोतावर परिणाम होऊ शकतो.

९ नकाशा बाळगा
‘भाऊ, पाचगणीला जायला उजवीकडे वळायचं की डावीकडे?’ एखाद्या तिठय़ावर गाडी थांबवून गाडीची काच खाली करून समोरच्या टपरीवरील माणसाला हा प्रश्न विचारायचा नसेल, तर ज्या ठिकाणी जात आहात, तेथपर्यंतचा रोड मॅप जवळ बाळगणं कधीही चांगलं आहे. आजकाल तंत्रज्ञानाच्या युगात छापील माप बाळगायचीही गरज नाही. प्रत्येकाच्या मोबाइल फोनमध्ये आजकाल गुगल मॅप असतो. पण हा गुगल मॅप ब्राऊज करण्याऐवजी ते अ‍ॅप डाऊनलोड केल्यास तुमच्या मोबाइलला रेंज नसली, तरी तुम्हाला मॅप बघण्यात काहीच अडचण येणार नाही. मोबाइल फोनमध्ये जीपीएस नॅव्हिगेशन सिस्टीम असेल, तर मग तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. पण कुटुंबासह रोड ट्रिपवर जात असाल, तर तुमच्याकडे नकाशा हे आयुध असणं अत्यावश्यक आहे.

९ वायपर तपासा
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वायपर तपासण्याची काय गरज, असा एक प्रश्न सहज डोक्यात येऊ शकतो. पण गरज आहे. एक तर अवकाळी पाऊस काही सांगून येत नाही. त्याचप्रमाणे गाडीची पुढील काच साफ करायची असेल आणि वायपर सुस्थितीत नसेल, तर काचेवर चरे पडू शकतात आणि चालकाला समोरच्या गोष्टी बघण्यात अडचण येऊ शकते. त्यासाठी गाडीचे वायपर तपासणं गरजेचं आहे. नवीन गाडी आणि नवीन वायपर असतील, तर मग प्रश्नच नाही. पण तरीही एकदा टिश्यूपेपर आणि क्लिनरच्या सहाय्याने वायपरच्या ब्लेड्सवरची धूळ पुसून घ्या. वायपरचे ब्लेड्स कुठेही फाटल्यासारखे झाले असतील, तर तातडीने वायपर बदलून घ्या. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही.

९ गाडीचे टायर्स तपासा
कोणतीही गाडी योग्य प्रकारे चालण्यासाठी गाडीचे टायर्स व्यवस्थित असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. गाडीच्या चारही टायर्समधील हवा योग्य दाबाने भरली आहे ना, हे तपासायलाच हवं. त्याचप्रमाणे स्टेपनी टायरची स्थितीही तपासून घ्यायला हवी. अनेकदा या टायरचा विसर पडतो आणि मग एखादा टायर पंक्चर झाला, की स्टेपनी टायरची आठवण होते. मात्र या रोड ट्रिपच्या वेळी असं घडू देऊ नका. त्याचप्रमाणे गाडी पंक्चर झालीच, तर टायर बदलण्यासाठी लागणारं सगळं सामान म्हणजे जॅक, हँडल वगरे सगळ्या गोष्टी नीट तपासून घ्या. पंक्चर काढण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी बरोबर बाळगल्यात, तर मग पंक्चरवाला शोधण्याची गरजही पडणार नाही. टायर ट्युबलेस असतील, तर बघायलाच नको. पण तरीही सर्व काळजी घेणं आवश्यक आहे. टायरमधील हवेचा दाब तपासताना सर्व टायर व्यवस्थित ठिकाणी आहेत ना, याचीही तपासणी एकदा करून घ्यावी. नाही तर गाडी चालवताना तुम्हाला गाडी खेचल्यासारखी वाटेल आणि त्याचा दाब तुमच्या हातांवर येऊ शकतो.

९ तापमान-हवामान काय म्हणतंय
ज्या ठिकाणी रोड ट्रिपला जाताय, त्या ठिकाणी पुढील आठवडाभर हवामान कसं राहणार आहे, याची माहिती घेणं आजकाल अजिबातच कठीण नाही. मोबाइल फोनवरील कोणत्याही वेदर संदर्भातील अ‍ॅपवरून ही माहिती मिळू शकते. या माहितीचा फायदा तुम्हाला नक्कीच बॅग भरताना होईल. आठवडाभरात त्या ठिकाणी पाऊस पडणार असेल, तर तशी तजवीज करता येईल. किंवा तापमान खालावणार असेल, तर गरम कपडे घेऊन जाता येतील. थोडक्यात, त्या ठिकाणाच्या हवामानाचा अंदाज तुम्हाला असायला हवा.
या सगळ्या बाबींची पूर्तता केल्यानंतर तुम्ही बिनदिक्कत रोड ट्रिपवर निघू शकता. एवढी काळजी घेऊनही काही समस्या उद्भवलीच, तर मग तो तुमच्या कुंडलीतल्या ‘अनिष्ट ग्रहयोगां’चा परिणामच म्हणायला हवा. किंबहुना अशा आयत्या वेळी उद्भवलेल्या समस्याच सहल अविस्मरणीय करतात.
रोहन टिल्लू
rohan.tillu@expressindia.com