‘प्रतिबिंब’, ‘संघर्ष’, ‘सामथ्र्य’ अशा चित्रपटांतून भूमिका करण्याबरोबरच अभिनेता नकुल घाणेकर हा झी मराठी वाहिनीवरील ‘अजूनही चांदरात आहे’ या मालिकेमुळे मराठी रसिक प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अभिनेता असण्याबरोबरच नकुल एक कथ्थक नृत्यकार असून सालसा आणि कथ्थकचे फ्यूजन असा नृत्याविष्कारही त्याने अलीकडेच एका विशेष कार्यक्रमात सादर केला. नृत्यगुरू म्हणूनही नकुलचे स्वतंत्र करिअर आहे.

ऑडी क्यू सेव्हन

कथ्थक या शास्त्रीय नृत्याची आवड आणि नंतर त्यात केलेले करिअर, त्याचसोबत नृत्य प्रशिक्षण देणे, सालसा-कथ्थकचे फ्यूजन सादर करण्याबरोबरच संधी मिळेल तेव्हा अभिनयाची झलक दाखविणे अशा एका वेळी अनेक व्यवधाने सांभाळत वाटचाल करत असताना इथून तिथे लवकरात लवकर पोहोचण्यासाठी चारचाकी वाहन ही माझी गरजच बनली आहे. नृत्याचे पोशाख, भूमिकेसाठी आवश्यक कपडे घेऊन जाण्यासाठी वाहन अपरिहार्य ठरते. आज माझ्याकडे स्विफ्ट डिझायर या गाडीचे उत्कृष्ट हाय-एण्ड मॉडेल आहे. ही गाडी मी ९ लाख रुपयांना घेतली होती. मारुती ८०० पासून ह्य़ुंदाईची सॅण्ट्रोपर्यंत गाडय़ा चालविल्या आहेत. परंतु, होंडा या ब्रॅण्डची सिव्हिक ही गाडी चालविण्याचा आनंद अवर्णनीय होता. माझ्याकडे सध्या तरी स्विफ्ट डिझायर आहे. ‘अल्टिमेट’ ड्रीम कार म्हणून विचारले तर ‘ऑडी’ हेच उत्तर मला द्यावेसे वाटते. होय ऑडी ही माझी अल्टिमेट ड्रीम कार आहे. संपूर्ण काळ्या रंगाची ऑडी ऐटीत फिरविणे हे माझे स्वप्न आहे. परंतु, त्यापूर्वी होंडा या ब्रॅण्डचा अनुभव घ्यायला मला नक्कीच आवडेल. कारण एकदा सिव्हिक या मॉडेलची गाडी चालविण्याचा आनंद घेतला असून त्यामुळेच नजीकच्या काळात होंडा सिव्हिक किंवा होंडा सिटी घेण्याची इच्छा आहे. ऑडी या ब्रॅण्डला असलेले वलय, या गाडीच्या पुढचा ऑडीचा वैशिष्टय़पूर्ण लोगो हे सगळे ब्रॅण्ड कॉन्शस करणारे आहे. ऑडी ब्रॅण्डचे नव्याने बाजारात आलेले क्यू सेव्हन या मॉडेलची गाडी मला घ्यायची इच्छा आहे. नृत्याच्या पावलांवर थिरकण्याचा आनंद आणि वेगाने गाडी चालविण्याचा आनंद दोन्ही अवर्णनीयच असतो.