भारतीय ब्रॅण्ड म्हणून जगभरात मिरवण्यासारखे आपल्याकडे फारच कमी उत्पादने आहेत. त्यातील एक म्हणजे मारुती कार. तमाम मध्यमवर्गीयांच्या पसंतीला उतरलेल्या मारुतीची लोकप्रियता सातासमुद्रापारही गेली होतीच. मात्र, त्यात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या दशकभरात जगभरात अनेक गाडय़ांचे लाँचिंग झाले, अनेकांनी लोकप्रियता मिळवली. मात्र, मारुती अल्टो गेल्या दशकभरात जागतिक स्तरावरील सर्वाधिक खपाची गाडी (स्मॉल कार) ठरली आहे. सलग दहा वष्रे मारुती अल्टोने आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे, हे विशेष. भारतीय म्हणून ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. बरे मारुतीने अशातशा नव्हे तर नावाजलेल्या ब्रॅण्ड्सना मागे टाकत हा मान पटकावला आहे. मारुती ८००चे सुधारित रूप म्हणून अल्टोचे लाँचिंग झाले. अल्पावधीतच या गाडीने तमाम भारतीयांच्या हृदयात स्थान प्राप्त केले. मध्यमवर्ग जेव्हा गाडी घेण्याचा विचार करतो, त्या वेळी त्याच्या डोळ्यांसमोर मारुती अल्टोच असते, असे म्हटले तर वावगे ठरणारच नाही. त्यामुळेच गेल्या दशकभरात तब्बल २७ लाख मारुती सुझुकी अल्टो भारतीय ग्राहकांनी खरेदी केल्या. हा एक प्रकारचा विक्रमच आहे. मारुती सुझुकी अल्टोच्या पाठोपाठ फोक्सवॅगनच्या गोल्फ या गाडीने लोकप्रियतेच्या बाबतीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. मारुती सुझुकी अल्टोचे हे घवघवीत यश साजरे करण्यासाठी मारुती सुझुकीतर्फे आता थँक यू कस्टमर ही मोहीम राबवली जाणार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत दृकश्राव्य माध्यमे, शोरूम्स, छापील, डिजिटल अशा प्रकारच्या माध्यमांद्वारे ही मोहीम राबवली जाणार आहे. वुई प्राऊड ऑफ यू मारुती अल्टो.