मारुती सुझुकी डेझर्ट स्टॉर्मच्या निमित्ताने मोटारस्पोर्ट विश्वाची अनोखी सफर अनुभवायला मिळाली. एरवी वाळवंट म्हटलं की शांततेची, रूक्षतेची किनार असते, मात्र या रॅलीच्या निमित्ताने प्रचंड वेगात दौडणाऱ्या गाडय़ा आणि बाइक्स त्यांच्या भन्नाट वेगाने पसरणारा वाळूचा कल्लोळ आणि हा अभुतपूर्व थरार अनुभवताना अवाक होणारे राजस्थानचे रहिवासी. भारतात हळूहळू प्रसार होत असलेल्या या खेळातील या महत्त्वपूर्ण रॅलीतील तांत्रिक गोष्टींची माहिती करून देणारा लेख.  
या रॅलीत सहभागी होण्यासाठी एक तपशीलवार अर्ज भरावा लागतो. यामध्ये तुमच्याबद्दल आणि तुमच्या गाडीबद्दल सर्व महत्त्वाच्या गोष्टी नमूद कराव्या लागतात. प्रवेश शुल्क ४०,००० ते ५०,००० यादरम्यान असतं. ही प्रक्रिया केल्यानंतर स्पर्धकांना संपूर्ण रॅली मार्ग समजावून देणारे तक्ते, माहिती-पुस्तिका देण्यात येते. चालकाला रस्ता कसा आहे, गाडी कोणत्या दिशेला वळवायची आहे, जवळपास काही मोठा अडथळा आहे याबाबतच्या सूचना नेव्हिगेटरला चालकाला द्यायच्या असतात. त्यामुळे नेव्हिगेटरसाठी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. याव्यतिरिक्त चालक आणि नेव्हिगेटर यांना रॅलीदरम्यान निवास तसेच भोजन, न्याहरी यांची सोय संयोजकांतर्फे करण्यात येते. मात्र रॅलीचा टप्पा सुरू असताना किंवा सामान्य रस्त्यावरून वाटचाल करताना स्पर्धकांना खानपानाची व्यवस्था स्वत:च करावी लागते.
गाडीमध्ये जीपीएस अर्थात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अनिवार्य नाही, पण गरजेचं आहे. रॅली दुर्गम तसेच निर्जन भागातून जात असल्याने अचूक रस्ता कळण्यासाठी हे यांत्रिक उपकरण बाळगणं सोयीचं जातं. काही अव्वल रॅलीपटू विशिष्ट कार-उत्पादक कंपन्यांशी करारबद्ध असतात. कंपनीच्या धोरणानुसार निश्चित करण्यात आलेल्या गाडीसह ते स्पर्धेत सहभागी होतात. या रॅलीपटूंना रॅलीदरम्यान विविध टप्प्यांवर कंपनीच्या सपोर्ट-स्टाफची मदत होते. रॅलीपटूची, त्याच्या गाडीची काळजी घेण्यासाठी या कंपन्यांची फौज सज्ज असते. अन्य रॅलीपटूंच्या मदतीसाठी संयोजकांतर्फे ‘सव्‍‌र्हिस’ अर्थात मदत गाडय़ा सदैव तय्यार असतात. एखाद्या गाडीला अडचण उद्भवल्यास वायरलेस यंत्रणेमार्फत सव्‍‌र्हिस टीम काही मिनिटांत घटनास्थळी दाखल होते. अपघात झाल्यास उपचारांसाठी अ‍ॅम्ब्युलन्स विविध टप्प्यांवर उपलब्ध असतात. रॅलीपटूच्या जिवाला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येते.
नेहमीच्या लायसन्सव्यतिरिक्त रॅलीसाठी वेगळा परवाना मिळवणं आवश्यक असतं. हा परवाना नॅशनल स्पोर्टिग अ‍ॅथॉरिटी फॉर मोटारस्पोर्ट या संस्थेतर्फे दिला जातो. परवान्यासाठी रॅलीपटूला अर्ज भरावा लागतो, तसेच काही भाग रॅलीपटूच्या डॉक्टरांनी भरणं अपेक्षित असतं. हा अर्ज भरून दिल्यानंतर मोटारस्पोर्ट संघटना परवाना देते. याशिवाय रॅलीपटूंनी स्वत:साठी रॅली इन्शुरन्स काढलेले असणे सोयीचं असतं. नेहमीच्या इन्शुरन्स योजनेत रॅली स्वरूपाच्या स्पर्धेचा समावेश नसतो. काही अतिरिक्त रक्कम भरून रॅलीसाठी इन्शुरन्स काढता येतो. मात्र प्रत्येक ठिकाणी अशी सोय उपलब्ध होईलच याची खात्री नसल्याने रॅलीपटूंनी स्पर्धेआधाची इन्शुरन्ससंदर्भातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून विशेष इन्शुरन्ससाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं. रुग्णालयातील देखभालीचा समावेश असलेला २ लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात इन्शुरन्स असणं अनिवार्य असतं. मोटारस्पोर्ट हा आकर्षक आणि थरारक खेळ असला तरी यामध्ये अपघाताची शक्यता जास्त असते. यामुळे किचकट वाटल्या तरी तांत्रिक गोष्टींची पूर्तता करणं अत्यावश्यक असतं.
डेझर्ट स्टॉर्ममध्ये चारचाकी वाहनांमध्ये एक्सट्रीम, एक्सप्लोर आणि एन्डय़ुरो असे प्रकार असतात, तर दुचाकी वाहनांचा मोटोक्वॉड्स हा प्रकार असतो. एक्सट्रीम प्रकार सगळ्यात खडतर असतो. एक्सप्लोर तसेच एन्डय़ुरो प्रकारातील रॅलीपटूही साधारण याच मार्गाने जातात, मात्र सामान्य रस्त्यांवरून ते अधिक काळ जातात.
रोल केज- गाडी आदळल्यास किंवा गाडीवर आघात झाल्यास, आतमध्ये बसलेल्या रॅलीपटूला इजा होऊ नये यासाठी रोल केजची व्यवस्था केलेली असते. चालक आणि नेव्हिगेटर यांच्या मागचा भाग हा आडव्या रॉडनी बंदिस्त असतो. रॅलीतील बहुतांशी गाडय़ांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रोल केज बसवण्यात येते.
सीट बेल्ट- सामान्य गाडय़ांना असतात त्यापेक्षा वेगळे सीट बेल्ट या गाडय़ांना बसवण्यात येतात. स्पार्को पद्धतीचे सीट बेल्ट बसवल्याने रॅलीपटू तसेच नेव्हिगेटर यांना आपत्कालीन परिस्थितीतही सुरक्षा मिळते.
सस्पेन्शन- विचित्र चढउतार, खड्डे यांच्यावर मात करीत आगेकूच करण्यासाठी सर्वच गाडय़ांना जागतिक दर्जाची सस्पेन्शन यंत्रणा बसवण्यात येते.
इंजिन- सातत्याने सहा दिवस, दिवस-रात्र तुफान वेगाने पळण्यासाठी गाडय़ांचं मुख्य अस्त्र म्हणजे इंजिन. ईसीयू प्रकारच्या इंजिनांना रॅलीपटू पसंती देतात. इंजिन सलामत तर रॅली सुसाट, हे सूत्र समोर ठेवून सर्वोत्तम दर्जाच्या इंजिनाची निवड रॅलीपटू करतात. डेझर्ट स्टॉर्ममध्ये गाडय़ांना दिवसाच्या काळात अतिशय तप्त वातावरणात, तर रात्रीच्या वेळी धुकं, दव अशा परिस्थितीत जायचं असतं. दोन्ही प्रकारच्या वातावरणात सक्षमतेने काम करणाऱ्या इंजिनची रॅलीपटू निवड करतात.
टायर- दररोज कापावं लागणारं तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरचं अंतर. हे अंतर कापताना १२० ते १३० च्या वेगाने पळणारी गाडी आणि सोबतीला वाळू, खड्डे. ही सगळी आव्हानं पेलण्यासाठी रॅलीपटूंना गरज असते ती तगडय़ा टायर्सची. सॅन्डक्रॉस प्रकारच्या टायर्सना प्राधान्य मिळते. पंक्चर न होणाऱ्या टायर्सची रॅलीमध्ये चलती असते. टायर्सला एम, के, एल असं मानांकन असतं. यामध्ये कंपाउंड आणि सॉफ्ट असे प्रकार असतात. नेहमीच्या वापरात जो प्रकार सरावाचा असतो त्या स्वरूपाच्या टायरची रॅलीपटू निवड करतात.
ब्रेक्स- प्रचंड वेगात वाटचाल करतानाही समोर अचानक काही अडथळा आल्यास तात्काळ गाडी नियंत्रणात आणण्यासाठी अत्याधुनिक ब्रेक्स उपयोगात आणले जातात. त्याची क्षमता वाढवण्यासाठी मोठे बुस्टर बसवण्यात येतात. रॅलीमध्ये वेग मूलभूत असतोच, पण योग्य वेळी वेगावर नियंत्रणही महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच ब्रेक्सकडेही रॅलीपटूंचं बारीक लक्ष असतं.
लाइट- डेझर्ट स्टॉर्ममध्ये काही टप्पे रात्रीच्या वेळी असतात, तर काही टप्पे पहाटेच्या काळोखात सुरू होतात. त्यामुळे प्रखर हेडलाइट्सचा वापर रॅलीपटू करतात.
हेल्मेट- सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चालक आणि नेव्हिगेटर सर्वोत्तम दर्जाची हेल्मेट घालतात. दुर्दैवाने काही अनुचित प्रकार घडल्यास हेल्मेट या दोघांना सुरक्षित ठेवू शकते.
या तिन्हीपैकी कुठल्याही प्रकारात सहभागी होण्यासाठी मोटारस्पोर्ट संघटनेतर्फे मान्यता मिळालेल्या गाडय़ांनाच रॅलीत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. यंदाच्या रॅलीमध्ये प्रामुख्याने मारुती सुझुकी व्हिटारा, जिप्सी, महिंद्रा, इस्टीम, फोर्ड, वेरिटो, इनडेव्हर या गाडय़ांचा वापर रॅलीपटूंनी केला.
मोटोक्वॉड्स प्रकारात बाइक्स ५०० ते १००० सीसीपर्यंतच्या असतात. वाळूमध्ये, खाचखळग्यांतून जाण्यासाठी बाइकचं वजन हलकं ठेवण्यावर त्यांचा भर असतो. रोल केज वगळता अन्य सर्व गोष्टी मोटोक्वॉड्समधील रॅलीपटूही आपल्या बाइकमध्ये बसवतात. वेगाची झिंग अनुभवण्यासाठी एकदा तरी या रॅलीत सहभागी व्हायला हवे, मात्र सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण केल्यानंतरच..
पराग फाटक
parag.phatak@expressindia.com