तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द. ई-पत्ता :  vinay.upasani @expressindia.com

बुलेट माझ्या दारी
वयाच्या अठराव्या वर्षी मी बाइक चालवायला शिकलो. मी अनेकदा बाबांबरोबर बाइकवर फिरायचो. त्यांच्या काही मित्रांकडे बुलेट होती, तीही मी चालवायचो. मात्र, मला खरे वेड लावले रॉयल एन्फिल्डने. रॉयल एन्फिल्डची डेझर्ट स्टॉर्म घेण्यासाठी मी बाबांकडे हट्ट धरला. मात्र, बाबांनी नकार दिला. पण मीही ठाम होतो की बुलेट घेईन तर हीच. बाबांना मनवण्यासाठी मग मी माझ्या दादाची, राहुल, मदत घेतली. त्यालाही बाइकचे वेड होतेच. अखेरीस आम्ही दोघांनी बाबांना पटवलेच. गेल्या वर्षी बुलेट घेण्यासाठी परवानगी दिली. डिसेंबर, २०१३ ला आम्ही बुकिंगही केले आणि अखेरीस मार्च, २०१४ मध्ये माझे स्वप्न साकार झाले. माझी आवडती बुलेट माझ्या दाराशी थाटात उभी होती. आम्ही सर्वानी मग बुलेटवरून पिकनिक काढली. मात्र, वाहतुकीचे आणि सुरक्षेचे सर्व नियमांचे पालन करूनच आम्ही गाडी चालवली. आताही मी सर्व नियम काटेकोरपणे पाळूनच गाडी चालवतो. हेल्मेटची सक्ती खरंच खूप आवश्यक आहे. माझ्यासारख्या बाइकवेड्यांना मी विनंती करतो की त्यांनी कधीही हेल्मेटविना बाइक चालवू नये.
– रोहित मुणगेकर,
खार (मुंबई)

थँक्यू यशवंती
मीही इतरांसारखाच बाइकवेडा आहे. परंतु माझे हे वेडेपण जरा वेगळे आहे. कारण मी दोन्ही पायांनी अपंग आहे. तरीही मी इतरांसारखाच बाइक चालवतो. सुरुवातीला मी खूब घाबरलो गाडी शिकताना. परंतु माझ्या आप्तस्वकीयांनी, मित्रांनी मला बाइक शिकायला खूप मदत केली. वयाच्या विसाव्या वर्षी मी बाइक चालवायला शिकलो. तो क्षण माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा होता. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. माझ्या मित्रांनाही खूप आनंद झाला. आता आमचा बाइकग्रुपच आहे. आम्ही सर्वजण महिन्यातील एखाद्या रविवारी बाइकवरून फिरायला जातो. मजामस्ती करतो. सर्वजण माझी खूप काळजी घेतात. माझ्या अपंगत्वाची जाणीवही करून देत नाही कोणी. घरची कामेही मी करतो. बाइकवरूनच मी कॉलेजला जातो. माझे बीसीए आणि एमबीएही मी पूर्ण केले आहे. म्हणून माझ्या बाइकला मी लाडाने यशवंती असे म्हणतो. कारण माझे यश हे एकट्याचे नाही तर तिचाही त्यात सिंहाचा वाटा आहे, असे मला वाटते. थँक्यू यशवंती.
– नीलेश पाटील,
शिरूर ताजबंद (ता. अहमदपूर)

लय भारी ट्रिगर
मला कधी कंटाळा आला तर बाइकवरून एक लांब चक्कर मारून येतो. मात्र, याचा अर्थ असा नाही की मग इंधन वाया घालवतो. परंतु स्वतला रिलॅक्स करण्यासाठी असं बाइकवरून लांब फिरायला जाणे मला खूप उपयुक्त ठरते. माझ्याकडे बाइक नव्हती त्यावेळी चालत फिरायचो. पण स्वतची अशी एक बाइक हवीच असे मला नेहमी वाटायचे. खूप विचार केला परंतु नेमकी कोणती बाइक घ्यावी हेच कळत नव्हते. त्यावेळी मार्केटमध्ये होंडा ट्रिगर हे नवीन मॉडेल आले होते. मग काय विचारता, सरळ गेलो होंडाच्या शोरूममध्ये आणि ३ नोव्हेंबर २०१३ रोजी दीपावलीच्या शुभमुहूर्तावर ट्रिगर बाइक घेऊन आलो.  गाडी तशी मस्तच आहे, सर्वच बाबींमध्ये ही बाइक खूप लकी ठरलीय माझ्यासाठी. हिची एक गोष्ट जी मला आवडते ती म्हणजे उत्तम ब्रेक सिस्टीम.  कारण त्यामुळे असा खरच वाटतं की गाडी आपल्याला जपत आहे म्हणून मीसुद्धा तिची जमेल तेवढी चांगली काळजी घेतो. आता पावसात तर बाइक राइड म्हणजे एक सुखद अनुभव. पण ज्यावेळी आपण फिरायला जाऊ त्यावेळीच, ऑफिसच्या वेळी नाही. म्हणून कधीही जर थोडा मूड ऑफ असला, किंवा काही सुचत नसेल त्यावेळी माझी बाइक मला नेहमी खुणावत असते एका लाँग राइडसाठी. मी माझ्या बाइकवरून इगतपुरीपासून लोणावळ्यापर्यंत सर्व परिसर िपजून काढला आहे.
– गजानन कुराडे,
ठाणे.

गडकिल्ल्यांची भटकंती करायचीय
मला लहान असल्यापासून बाइकचे वेड होते. परंतु परिस्थिती बेताची असल्याने बाइक घेवू शकत नव्हतो. नोकरी लागल्यानंतर मी लगेच हिरो होंडाची सी डी डिलक्स बाइक घेतली. घरात बाइक घेणारा मी पहिलीच व्यक्ती असल्याने सगळ्यांना खूप आनंद झाला होता. माझ्या बाइकवर माझे खूप प्रेम होते. घरातून बाहेर काढण्या अगोदर बाइक पुसल्याशिवाय मी बाइकवर स्वार होत नव्हतो. त्यामुळे पाच र्वष वापरूनही बाइक शोरूम पिस वाटायची. ही बाइक मी नंतर बदलली. मी नंतर हिरो होंडाचीच पॅशन प्लस घेतली. आजही काही मित्र भेटल्यानंतर बाइक नवीन आहे का, अशी विचारणा करतात इतकी काळजी मी बाइकची घेतो. परंतु हे बाइकवेड मला स्वस्थ बसू देत नाही. मी नुकतीच रॉयल एन्फिल्डची ३५० सीसीची बुलेट बुक केली आहे. या बाइकवर मी खूप प्रवास करणार आहे. बुलेटवर गड-किल्ल्यांची भटकंती करण्याची माझी खूप दिवसांची इच्छा मी पूर्ण करून घेणार आहे.
शिवा फुलारी