अभिनेत्री म्हणून मोठय़ा आणि छोटय़ा पडद्यावर सहजपणे वावरण्याबरोबरच आपल्या भूमिकेची लांबी-रुंदी न पाहता खोली जोखून अभिनय करण्याची हातोटी जपणारी नेहा जोशी सध्या छोटय़ा पडद्यावरील रजनी या भूमिकेमुळे चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. त्याबरोबरच नाटककार महेश एलकुंचवार लिखित ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक नव्याने रंगभूमीवर आले असून यातही ती रंजू नावाची महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
गेल्या आठ-नऊ वर्षांपासून अभिनय करीत असून सध्या माझ्याकडे मारुती कंपनीची आल्टो ही पूर्ण काळ्या रंगाची गाडी आहे. ड्रायव्हिंगची दांडगी हौस असल्यामुळे ड्रायव्हर वगैरे न ठेवता शूटिंगच्या ठिकाणी जा-ये करण्याबरोबरच एकटय़ाने मनमुराद फिरण्यासाठीही मी स्वत:च ड्रायव्हिंग करते. देखभाल खर्च जुजबी, किफायतशीर असण्याबरोबरच एकटीच फिरत असल्यामुळे मागच्या सीटवर आवश्यक तेवढे सामान ठेवून मस्त ड्राईव्ह करण्याचा आनंद लुटता येतो. स्मॉल कार सेगमेंटमधली ही गाडी मुंबईत भरपूर रहदारीतही सहजपणे चालविता येते हा याचा फायदा आहे. अन्य तरुणींसारखी मी वागायला-बोलायला नाजूकबिजूक खचितच नसल्यामुळे म्हणा किंवा मला ड्रायव्हिंगची हौस आहे म्हणूनही असेल मला ड्रीम कारचे विचाराल तर एसयूव्ही सेगमेंटच्या गाडय़ा उदाहरणार्थ जॅग्वार आणि ऑडीच्या एसयूव्ही गाडय़ा या माझ्या ड्रीमकार आहेत. जॅग्वार आणि ऑडी एसयूव्ही चालवायला मिळाली तर त्यापैकी कोणती माझी ‘अल्टिमेट’ ड्रीम कार ती मला निवडता येऊ शकेल. पण सध्यातरी जॅग्वार आणि ऑडीची एसयूव्ही याच माझ्या ड्रीम कार आहेत. कारच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे जी गोष्ट रोज आपण वापरतो त्याचे फायदे-तोटे आणि त्यातल्या बेसिक गोष्टी आपल्याला जमल्याच पाहिजेत. एकटीच फिरत असल्यामुळे कारच्या बेसिक गोष्टी मी आवडीने शिकून घेतल्या आहेत. गाडी पंक्चर झाली तर टायर बदलून स्टेपनी लावणे तसेच बोनेट उघडून इंजिन ऑईल चेक करून ते बदलणे किंवा अशा जुजबी आणि मूलभूत गोष्टी माझ्या मीच करू शकते. वास्तविक ड्रायव्हिंगची आवड असलेल्या प्रत्येकालाच या गोष्टी माहीत हव्यात असे माझे मत आहे. गाडी घेणे आणि ड्राईव्ह करणे याचा आनंद अवर्णनीय असतोच. पण त्याचबरोबर गाडी बिघडल्यावर किंवा काही स्पेअरपार्ट्स बदलायचे असतील तरी मेकॅनिककडे गाडी घेऊन जाणे, नेमके काय बिघडले आहे ते जाणून घेणे या मूलभूत गोष्टी मी स्वत:च करते. माझी ड्रीम कार असलेली जॅग्वार किंवा ऑडीची एसयूव्ही घेतल्यानंतरही त्याची देखभाल मी स्वत: नक्कीच करू शकेन.