समज यायला लागली त्या वयापासूनच मी माझ्या ड्रीम बाइकचे विचार घरात बोलून दाखवले होते. घेईन तर यामाहाच घेईन असा निश्चयही बोलून दाखवला होता. घरात बाइक चालवणारे फक्त बाबाच. त्यामुळे त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर होता. यामाहाच्या नवनवीन मॉडेल्सची माहिती जाणून घ्यायचो. बाइकबद्दल परिपूर्ण माहिती देणारी सर्व मासिके मी वाचून काढायचो. त्यात आलेल्या बाइकची छायाचित्रांची कात्रणे काढायचो. अशा प्रकारे मी माझे बाइकवेडेपण जपत होतो. २००८ मध्ये यामाहाने त्यांची आर१५ ही बाइक बाजारात आणली. हे मॉडेल पाहताक्षणी मला खूप पसंत पडले. मी चक्क तिच्या प्रेमातच पडलो असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. ही गाडी घेण्यासाठी मी खूप कष्ट केले. तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माझ्याकडे काळ्या रंगाची माझी यामाहा आर१५ आली. स्वर्ग दोनच बोटं उरला होता माझ्यासाठी त्यावेळी. आणि आश्चर्य म्हणजे गाडी घेईपर्यंत मी ड्रायव्हिंग लायसन्स घेतले नव्हते. मात्र, गाडी घेतल्यानंतर लगेचच ही प्रक्रिया पूर्ण करून घेतली.
गेल्या तीन वर्षांत अनेक लाँग टूर्स केल्या आहेत माझ्या लाडक्या यामाहावरून. दमणची ट्रीप ही त्यातली अगदी अविस्मरणीयच. या सर्व प्रवासात माझ्या गाडीने मला कधी त्रास दिला नाही. मला ही सुंदर गिफ्ट दिल्याबद्दल मी यामाहाचे मनापासून आभार मानतो. आणि मला गाडी घेऊ दिल्याबद्दल माझ्या पालकांचेही मी धन्यवाद मानतो.

मी बाइकवेडा..
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून दर गुरुवारी ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द. ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com