अलीकडच्या काळात कार अधिकाधिक टेक्नोसॅव्ही होऊ लागल्या आहेत. मात्र, तरीही प्रवास अधिकाधिक सुरक्षित कसा होईल यासाठी कारमध्ये आणखी काय काय तंत्रज्ञान बसवता येईल याबाबत निरंतर संशोधन सुरूच असते. त्यामुळेच आगामी काही वर्षांत स्वयंचलित कार रस्त्यावरून धावताना दिसली तरी आश्चर्य वाटायला नको. नवीन येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाचा हा आढावा.

कार जसजशा आधुनिक होऊ लागल्या तसतसे अपघातांचे प्रमाण कमी कमी होऊ लागले आहे. अखेरीस वाहनचालक/धारकाची आणि रस्त्यावरील पादचाऱ्यांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची. त्यामुळेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी गाडीच्या तंत्रज्ञानांत काय सुधारणा करता येईल या दृष्टीने संशोधन सध्या जगभरात सुरू आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे..


मद्यपानशोधक

अनेक देशांतील वाहननिर्माते ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने याबाबत संशोधन करत आहेत. चालकाने गाडीत प्रवेश केल्या केल्या त्याच्या हालचालींवरून किंवा त्याच्या श्वासावरून त्याने मद्यपान केले आहे किंवा नाही, हे तपासणारी यंत्रणा गाडीत बसवण्याच्या दृष्टीने हे संशोधन सुरू आहे. जपान, अमेरिका व युरोपात अशी यंत्रणा बसवण्याच्या दृष्टीने गांभीर्याने विचार सुरू आहे. चालकाने मद्यपान केले असेल तर गाडी जागची हलणार नाही, असे हे तंत्रज्ञान असेल. चालकाच्या मद्यपानाच्या आधीच्या हालचाली आणि श्वास व नंतरच्या हालचाली व श्वास यांच्या तर्कसंगतीने गाडीतील तंत्र वागेल. अजून या तंत्रज्ञानावर बराच खल सुरू आहे. तरीही येत्या काळात गाडीत हे तंत्र लागलेले असल्यास आश्चर्य वाटायला नको.

व्हॉइस कमांड्स
अलीकडे काही गाडय़ांमध्ये हे तंत्रज्ञान दिसते. विशेषत: टॉप एण्डच्या मॉडेल्समध्ये व्हॉइस कमांड्स तंत्रज्ञान आढळून येते. चालकाला गाडी चालवताना अनेक व्यवधाने पाळावी लागतात. अशा वेळी गाडीतील अंतर्गत सुविधांकडे त्याचे दुर्लक्ष होऊ शकते. ते टाळले जावे व चालकाला गाडीतील अंतर्गत सुविधांची तंत्रांची माहिती व्हावी यासाठी व्हॉइस कमांड्स हे नवे तंत्र विकसित करण्यात येत आहे. कोरियन कारनिर्माते हय़ुंदाई हे तंत्रज्ञान भारतात आणणार आहे. आयफोनचा वापर करणाऱ्यांना हे तंत्र अतिशय सोपे वाटेल असे आहे.


कॅमेरा डिटेक्टर्स

हल्ली बहुतांश गाडय़ांमध्ये रीअर कॅमेरा हा प्रकार आढळतो. गाडी पार्क करताना कुठे आदळू नये वा पाìकग सुरक्षितपणे करता यावे यासाठी हा कॅमेरा उपयुक्त ठरतो. चालकाला पुढील मार्गाची माहिती देणारा, मार्गावर असलेल्या ट्रॅफिकची माहिती देणारे सेन्सर्स या कॅमेरात लावले जाणार आहेत, जेणेकरून चालकाला वाहन चालवताना या माहितीचा उपयोग करून सुरक्षितपणे वाहन चालवणे शक्य होईल. तसेच रात्रीच्या वेळी गाडी चालवताना त्याचा अधिक उपयोग होऊ शकेल. मर्सडिीझ आणि बीएमडब्ल्यूच्या काही मॉडेल्समध्ये या तंत्राचा वापर करण्यात आला आहे.
नऊ गीअरची अ‍ॅटोमॅटिक गाडी
हल्ली सहा गीअरच्या अ‍ॅटोमॅटिक गाडय़ा बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, अमेरिकेत अलीकडेच नऊ गीअरवर चालणारी अ‍ॅटोमॅटिक गाडीची चाचणी घेण्यात आली. रेंज रोव्हर आणि ख्रायस्लर यांच्या आगामी नव्या मॉडेल्समध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. खासकरून एसयूव्हींमध्येच ही सुविधा असेल. त्यामुळे १६ टक्के इंधनाची बचत होईल असा दावा आहे.


मुलांची सुरक्षितता

ज्यांना टीनएजर मुलं आहेत त्यांच्यासाठी हे उपयुक्तच तंत्रज्ञान आहे. या तंत्रायोगे कारमध्ये एक नवीन जीपीएसप्रणाली बसवली जाईल. ज्याद्वारे गाडी कुठे आहे, कोणत्या स्थितीत आहे हे इंटरनेटवर कळू शकणार आहे. ही ट्रॅकिंग सिस्टीम पोर्टेबल असल्यामुळे सहजपणे दुसऱ्याही कारमध्ये बसवता येऊ शकते. तसेच वाहनाने मर्यादित वेगापेक्षा अधिक वेग घेतला तर त्याची सूचनाही तातडीने या सिस्टीमच्या नियंत्रकाला मिळू शकते.

इलेक्ट्रिक पॉवर स्टीअिरग
सध्याच्या गाडय़ांमधील स्टीअिरग हायड्रॉलिक तंत्राने तयार करण्यात आलेले आहे. मात्र, त्यामुळे पंप, रिझव्‍‌र्हायर, कूलंट, होज आणि गीअर या सर्वावर ताण येतो. तसेच हायड्रॉलिक इंधनगळती हा तर सर्वानाच अनुभवाला येणारा सर्वसामान्य त्रास आहे. त्यामुळे या पूर्ण प्रक्रियेलाच हद्दपार करून त्या जागी इलेक्ट्रिक पॉवर स्टीअिरग आणण्याच्या दिशेने संशोधन सुरू आहे. या तंत्रामुळे चालकाचा निम्मा त्रास वाचणार आहे. शिवाय इंधन वाचवणेही शक्य होणार आहे.


तातडीची ब्रेक पद्धती

भरधाव वेगात जात असताना अचानक कोणी मध्ये आला किंवा एखादे वाहन आले तर अचानक ब्रेक लावावा लागतो. अनेकदा हा प्रयत्न असफल होऊन अपघात होतात. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी तातडीची ब्रेक पद्धती विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार आणि इतर वाहनांमध्ये लावण्यात आलेले सेन्सर्स यांच्या मदतीने हे तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. म्हणजे दोन वाहनांमधील टक्कर टाळण्यासाठी चालकाने काही प्रयत्न करण्याआधीच ही पद्धती कार्यान्वित होईल आणि गाडी जागीच थांबेल, अशी ही पद्धती असेल. अनेक वाहननिर्मात्यांनी ही पद्धती कारमध्ये बसवण्यास सुरुवातही केली आहे.