वाहननिर्मिती क्षेत्रात जागतिक स्तरावर सातव्या क्रमांकावर असलेला फियाट ख्रायस्लर समूह आता भारतात चांगला स्थिरावला आहे. भारतातील फियाटचा बाजारहिस्सा मात्र तसा कमीच. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये यात चांगला बदल होऊ लागला आहे. फियाटने आता आपल्या बाजारहिश्श्यात वाढ करण्याच्या दृष्टीने दमदार पावले टाकली असून पुन्टोच्या यशानंतर अ‍ॅव्हेंच्युरा ही क्रॉसओव्हर कार बाजारात आणली आहे. स्पोर्टी लुक असलेली ही गाडी तुम्हाला कोणत्याही रस्त्यावरून चालवण्यासाठी आश्वस्त करते..
यंदाच्या फेब्रुवारीत दिल्लीमध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये अ‍ॅव्हेंच्युरा प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीनंतर ही गाडी बाजारात येईल असा दावा फियाटने त्या वेळी केला होता. आणि त्यांचे म्हणणे त्यांनी खरेही करून दाखवले, दिवाळीपूर्वीच फियाटची ही कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर सेगमेंटमधली कार लाँच झाली. ही गाडी चालवण्याची संधी नुकतीच मिळाली. अमेिझग या एकाच शब्दात या अनुभवाचे वर्णन करता येईल. फोर्ड इकोस्पोर्टसारखंच अ‍ॅव्हेंच्युरालाही मागच्या बाजूला स्टेपनीसारखं चाक लावण्यात आल्याने हिच्या दिसण्यात उठाव आला आहे, शिवाय वर सामान ठेवायलाही कॅरिअर आहे, त्यामुळे ही गाडी बरीचशी इटिऑस क्रॉससारखी दिसते. मात्र, एक खरं की इकोस्पोर्ट आणि फोक्सवॅगनची क्रॉस पोलो यांना अ‍ॅव्हेंच्युरा टफ फाइट देणार यात शंका नाही.

इंजिनाची ताकद
पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांत अ‍ॅव्हेंच्युरा उपलब्ध आहे. पेट्रोल इंजिनाची ताकद १३०० सीसी तर डिझेलची १२०० सीसी एवढी आहे. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या किमतींची तुलना केली असता लोकांचा कल डिझेल गाडी घेण्याकडेच असतो. डिझेल मॉडेल साडेवीस किमी प्रतिलिटर तर पेट्रोल मॉडेल १४.४ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. मात्र, हायवेवर दोन्ही प्रकारच्या गाडय़ा तुम्हाला उत्तम मायलेज देतील याची खात्री आहे. फाइव्ह स्पीड मॅन्युअल गीअरबॉक्स असलेली ही गाडी टू व्हील ड्राइव्ह आहे.

पुन्टो इव्होसारखाच तोंडवळा
अ‍ॅव्हेंच्युराचा तोंडवळा बराचसा पुन्टो इव्होसारखाच आहे. मात्र, बोनेटचे साम्य वगळले तर डोअरसाइडला प्लास्टिक क्लॅिडग, छतावर कॅरिअर, आणि बॅश प्लेट्स यामुळे अ‍ॅव्हेंच्युरा बरीचशी स्पोर्ट आणि ऑफ रोड कारसारखी दिसते. पुन्टोसारखी दिसत असली तरी तिचा लुक स्पोर्टी असल्याने अ‍ॅव्हेंच्युराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. मागच्या बाजूला असलेले स्टेपनी टायर त्यात जास्त भर घालते. १६ इंची अलॉय व्हील्स हिची शोभा तर वाढवतातच शिवाय ग्राउंड क्लिअरन्स तर अमेिझग आहे. कितीही खराब किंवा मग खडकाळ रस्ता असूदेत अ‍ॅव्हेंच्युरा न कुरकुरता रस्ता कापते. बरं आतमध्ये बसणाऱ्याला काही तोशीसही पडू देत नाही.

अंतरंग
अ‍ॅव्हेंच्युरामध्ये चालकाच्या बाजूला बसणाऱ्याला पाय मोकळे सोडून बसता  एवढा लेग स्पेस आहे.  तसेच मागे बसणाऱ्यांनाही पाय आखडून बसावे लागणार नाही एवढी जागा  देण्यात आली आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी गाडीच्या अंतरंगात समाविष्ट आहेत. एक म्हणजे कम्पास आणि दुसरे म्हणजे टिल्ट मीटर. गाडी ऑफ रोड चालवत असताना कोणत्या बाजूने किती झुकली वगरे हे टिल्ट मीटर दाखवते. तर ऑफ रोड फिरण्याच्या नादात वाट चुकून भरकटायला झाले तर दिशादर्शनाचे काम कम्पास करते. याशिवाय एअरबॅग्ज व एबीएस या सुरक्षेच्या उपाययोजना आहेतच. क्लायमेट कंट्रोलर, मागील बाजूला बसलेल्यांना एसीची हवा चांगल्या पद्धतीने मिळावी यासाठीची सोय, अ‍ॅडजस्टेबल ड्रायिव्हग सीट, आरशांचे नियंत्रण सोयीने करता यावे यासाठी चालकाच्या बाजूलाच त्याची बटने देण्यात आली आहेत. म्हणजेच मिररचे अ‍ॅटोमॅटिक कंट्रोल पद्धती अ‍ॅव्हेंच्युरामध्ये देण्यात आली आहे. ऑडिओ सिस्टिम, ब्ल्यू टूथ सिस्टिम याही गोष्टी यात आहेत. गाडीची डिकी हा एक उल्लेखनीय प्रकार आहे. तीन-चार जणांचे सामान सहजगत्या राहू शकेल एवढी जागा मागच्या बाजूला देण्यात आली आहे. शिवाय सेफ्टी लॉकही आहे. जे इलेक्ट्रॉनिकरित्याच उघडते. त्याखाली टूलबॉक्स देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स
पेट्रोल व्हर्जन
१.४ लिटर फायर
डिसप्लेसमेंट १३६८ सीसी
मॅक्सिमम पॉवर ८९बीएचपी@६००० आरपीएम
मॅक्सिमम टॉर्क ११५ एनएम@४५०० आरपीएम
डिझेल व्हर्जन
१.३ लिटर मल्टिजेट
डिसप्लेसमेंट १२४८ सीसी
मॅक्सिमम पॉवर ९२बीएचपी@४००० आरपीएम
मॅक्सिमम टॉर्क ११५ एनएम@२००० आरपीएम

किंमत
* अ‍ॅव्हेंच्युरा अ‍ॅक्टिव पेट्रोल     :     पाच लाख ९९ हजार रु.
* अ‍ॅव्हेंच्युरा डायनामिक पेट्रोल :     सात लाख पाच हजार रु.
* अ‍ॅव्हेंच्युरा अ‍ॅक्टिव डिझेल :         सहा लाख ८९ हजार रु.
* अ‍ॅव्हेंच्युरा डायनामिक डिझेल :     सात लाख ६५ हजार रु.
* अ‍ॅव्हेंच्युरा इमोशन डिझेल :         आठ लाख १७ हजार रु.
(किमती एक्स शोरूम आहेत.)
या रंगात उपलब्ध
dr09 dr08 dr07