तरुणांच्या दिलाची धडकन असलेल्या ह्य़ोसंग सुपरबाइकने आता ६५० सीसीची अ‍ॅक्विला प्रो आणि जीटी-६५० आर या दोन मॉडेल्स बाजारात लाँच केल्या आहेत. या बाइक्सचा अनावरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी डीएसके ह्य़ोसंगचे व्यवस्थापकीय संचालक शिरीष कुलकर्णी व एस अँड टी मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक जिमी पार्क उपस्थित होते. लूक आणि टेक्नॉलॉजी या दोन्ही बाबतीत ह्य़ोसंगने अल्पावधीतच भारतीय तरुणांमध्ये लोकप्रियता मिळवली. त्यामुळे या बाइकचे अधिकाधिक मार्केटिंग करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. अ‍ॅक्विला प्रोची किंमत चार लाख ९९ हजार रुपये तर जीटी ६५० आरची किंमत चार लाख ७९ हजार रुपये आहे. अ‍ॅक्विला प्रो बाइक लाल, चंदेरी आणि काळ्या अशा तीन रंगात तर जीटी ६५० आर ही टिटॅनियम पांढरा, टिटॅनियम लाल व टिटॅनियम काळ्या रंगात उपलब्ध आहे. ट्विन सिलिंडर, ऑइल कूल्ड फोर स्ट्रोक इंजिन्स हे अ‍ॅक्विला प्रोची वैशिष्टय़ आहे. हिचा वेग ताशी १९५ किलोमीटर असेल. तर जीटी ६५० आरचाही वेग ताशी १९५ किमीच आहे. देशातील चारही महत्त्वाच्या शहरांमध्ये या गाडय़ा विक्रीसाठी उपलब्ध असतील.