माझे वय सध्या ६४ वर्षे पूर्ण. ड्रायिव्हिंग लायसन्स भारतात ज्या पद्धतीने मिळते त्याच पद्धतीने माला मिळाले आहे. जुजबी गाडी चालवता येत होती. पक्के लायसन्स मिळाले होते. म्हणून तीन वर्षांपूर्वी आमच्या डोंबिवलीतील रेल्वे ग्राऊंडवर आमचे पुण्याचे साडू यांची गाडी घेऊन मी व त्यांचा मुलगा निशांत गाडी चालवण्याचा सराव करण्यासाठी गेलो. रेल्वे ग्राऊंडवर सराव केला. गाडी जोरात घेऊन एकदम थांबवली. फुल टर्न घेत गाडी गोल गोल फिरवली. ठरावीक जागी गाडी थांबवली. मला आता गाडी येते या भ्रमात मी निशांतला म्हणालो, ‘मी घरापर्यंत गाडी चालवतो’ व घराचा रस्ता धरला दुपारी तीनची वेळ होती. रस्त्यावर गर्दी नव्हती. घर जवळच गुप्ते रोडवर होते. गुप्ते रोडवर येण्यासाठी रेल्वे ग्राऊंडच्या रस्त्याने उजवा टर्न घेणे आवशक होते. गाडी चालूच होती. हळूहळू मी उजवा टर्न घेतला. तेवढय़ात उजवीकडून जोरात रिक्षा येताना दिसली. मी गांगरलो व रिक्षाला  पुढील बाजूस जोरात धडक दिली. रिक्षा १८० अंशांत फिरली. रिक्षाला पुढे मोठ्ठा धब्बा पडला. मी परत गाडी सावरून सरळ पुढे घेतली त्यासाठी निशांतने मदत केली. तोपर्यंत लोक गोळा झालेच. मला ट्राफिक सेन्स बरा आहे. शांतपणे बाहेर आलो तर एक जण कुठली गाडी आहे, कशी धडक झाली? विचारू लागला. मी त्याला विचारले, ‘तू कोण आहेस पोलीस, का गव्हर्नर तुला काय करायचे? तू तुझ्या कामाला जा. मी इथेच राहतो. ग्रामीण भागातून आलो आहे. गप्प आपल्या कामाला जा. नाही तर शिव्या खाव्या लागतील आणि तुला जर रिक्षावाल्याची कणव येत असेत तर त्याला १०० रुपये दे’ व सर्व जमावालाही आवाज दिला, ‘सर्वजण आपापल्या कामाला जावा. आम्ही आणि रिक्षावाला बघून घेऊ.’ थोडय़ा वेळात तेथे आम्ही व रिक्षावाला एवढेच उरलो. रिक्षातील प्रवासीही निघून गेले. नंतर मी रिक्षावाल्याला माझे लायसन्स दाखवले व त्याचे लायसन्स विचारले. त्याच्याकडे लायसन्स नव्हते. मी त्याला म्हटले, चल  पोलीस स्टेशनमध्ये. तो कसला येतो. मलाच माझी चूक कळली होती म्हणून आमच्या गल्लीतच असणाऱ्या गॅरेजमध्ये त्याचा धब्बा सरळ करून दिला. ‘आम्ही आमचे बघून घेऊ. इतरांनी मध्ये पडू नये’ हे सूत्र निशांतला फार आवडले व त्याचा उपयोग तो गरज पडली तर करतो व मित्रपरिवाराला सांगतो.
नंतर माझी गाडी (फोटोतील) मारुती सुझुकी  एक वर्षांपूर्वी मालाड-डोंबिवली अशी ड्राइव्ह केली. वेस्टर्न हायवेवरून एलटीपर्यंत  ट्राफिक जाम लागला. मध्यंतरी मी अमेरिकेत जाऊन आलो त्यामुळे गाडी चालवताना आता पुढील गाडीमध्ये अंतर ठेवतो. बॉनेट टू बॉनेट गाडी चालवत नाही. तर माझ्या उजवीकडील रिक्षावाला माझ्या पुढे घुसण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला गाडीतूनच आवाज दिला. ‘जर माझ्यापुढे गाडी घातली तर तुझी गाडीच चेम्बून टाकीन.’ तो एलटीपर्यंत पुढे आला नाही.
सध्या गाडी चालवताना उजवीकडील टर्न तर गाडी थांबवून  घेतो. ‘सिनियर सिटिझन ड्रायिव्हग’ तसेच  उजवा टर्न लांबून तर डावा जवळून. उजवा लांबून घेतो. त्या वेळेस उजवीकडून बरेच जन घुसतात पुलावर तर डावीकडून व उजवीकडूनही पुढे घुसतात पुढे पुढे जात असतात ट्राफिक जाम करतात. जा पुढे मी मात्र गाडीच्या मागे ‘सिनियर सिटिझन ड्रायिव्हग’ असे लिहून घेणार आहे, म्हणजे मला आरामात गाडी चालवता येईल.
– म. न. ढोकळे डोंबिवली

ड्रायिव्हिंग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. तुमचा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची.  मेल करा. ls.driveit@gmail.com