हॅचबॅक प्रकारात तीव्र स्पर्धा असतानाच फोर्डने त्यांच्या आधीच्याच फिगो या गाडीचे नवे मॉडेल बाजारात आणले आहे. दिल्ली ते आग्रा या यमुना एक्स्प्रेस-वेवरील प्रवासात या नव्याकोऱ्या फिगोचा अनुभव घेता आला. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांत ही गाडी उपलब्ध असेल तसेच स्विफ्ट व ग्रँड आय१०ला नवी फिगो आव्हान देईल, असा फोर्ड कंपनीचा दावा आहे..
फिगोच्या आधीच्याच रंगरूपात थोडी अधिक भर घालून नव्या फिगोची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र नवी संरचना, आतील फीचर्स आणि तीन संपूर्णपणे नवीन पॉवरट्रेन्स ही या गाडीची वैशिष्टय़े म्हणता येतील. मारुतीच्या स्विफ्ट व ह्युंदाईच्या आय१०ला ही गाडी स्पर्धक ठरणार आहे. कारण नवीन फिगो खरेदी करणाऱ्या ग्राहकाला स्विफ्ट आणि आय१०च्या तुलनेत १५ ते २० टक्के कमी मेन्टेनन्स लागणार आहे. शिवाय कंपनीकडून ग्राहकाला पुढील तीन वर्षांचा टोटल मेन्टेनन्स प्लॅन आखून देण्यात आला आहे. त्यानुसार गाडीची सíव्हसिंग सुलभ होणार आहे. तसेच दहा हजार किमीपर्यंत गाडीचा सíव्हसिंग मध्यांतर असेल जो की, स्विफ्ट आणि आय१० साठी पाच हजार किमीचा आहे. असो. या झाल्या व्यावसायिक बाबी. आता प्रत्यक्षात नवी फिगो आहे तरी कशी याचा आढावा घेऊ या.

– अंतरंग
गाडी आतून प्रशस्त आहे. नव्या फिगोमध्ये पुढील बाजूला चालकाच्या सीटला अत्याधुनिक पद्धतीने यंत्रणा जोडलेल्या आहेत. स्टीअिरग थ्री स्पोक आहे. ४.२ इंचाची सिंक मल्टिमीडिया इन्फोटेन्मेंटची सुविधा पुढीला बाजूला देण्यात आली आहे. डॅशबोर्डला काळ्या रंगाचा टोन देण्यात आला आहे. गाडी प्रशस्त वाटत असली तरी आसनव्यवस्था व आत वापरण्यात आलेले प्लास्टिक जरा आणखी चांगल्या दर्जाचे हवे होते. या बाबतीत फिगोच्या तुलनेत ग्रँड आय१० चांगली वाटते. बाकी आर्मरेस्ट, हेडरेस्ट, कपहोल्डर्स या बाबी आहेतच. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सहा एअरबॅग्ज, अ‍ॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टमसह इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, हिल असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, फोर्ड मायकी, उंची कमी-जास्त करता येऊ शकणारे ड्रायिव्हग सीट, २० स्टोअरेज स्पेसेस या उल्लेखनीय बाबीही गाडीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ड्रायव्हर व पॅसेंजर साइड एअरबॅग. सुरक्षेच्या बाबतीत फिगो तिच्या स्पर्धकांच्याही पुढे असल्याचे यातून दिसून येते.

– कामगिरी
१.२ लिटर टीआय-व्हीसीटी पेट्रोल, १.५ लिटर टीडीसीआय डिझेल आणि १.५ लिटर टीआय-व्हीसीटी पेट्रोल अशा तीन पॉवरट्रेन्समध्ये फिगो उपलब्ध आहे. पहिल्या दोन इंजिन प्रकारांत पाच स्पीड मॅन्युअल गीअरबॉक्स आहे, तर तिसऱ्या प्रकारात ड्युएल क्लच ऑटोमॅटिक गीअरबॉक्स आहे. मी दोन्ही म्हणजे पेट्रोल आणि डिझेल प्रकारातील फिगो यमुना एक्स्प्रेस-वेवर चालवून पाहिल्या. त्यात मला १.५ लिटर टीडीसीआय सर्वात जास्त आवडली. कारण हिचे इंजिन अधिक मजबूत वाटले. सीमलेस पॉवर डिलिव्हरी हे या मॉडेलचे वैशिष्टय़ म्हणता येईल. गाडी चालवतानाचा सर्वात सुखद अनुभव म्हणजे सारखे गीअर बदलण्याची गरज पडत नाही, कारण गाडीचा स्मूदनेस.
सरळसोट रस्त्यावर गाडीचा पिकअप दृष्ट लागण्यासारखा आहे. पाचव्या गीअरला गाडीचा वेग १३० किमी प्रतितास एवढा होता. इंजिनाचा वेग पाच हजार आरपीएमपर्यंत जाण्याची क्षमता असली, तरी या वेगाला ते आवाज करतंय, कुरकुरतंय असा अनुभव अजिबात आला नाही. शहरातील रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन गाडीच्या सस्पेन्शनची निर्मिती करण्यात आली असल्याने खड्डे किंवा खराब पॅचेसवरही गाडीच्या वेगावर जास्त परिणाम होताना दिसत नाही. कमी वेगात असताना गीअरशिफ्ट करतानाचा जर्क मात्र दोन्ही प्रकारांतील गाडय़ांत जाणवला. स्पोर्ट्स मोडमध्ये मात्र गीअरशिफ्ट तत्परतेने झाल्याचे आढळून आले. शहरातील रस्त्यांवर ही गाडी नियंत्रित पद्धतीने चांगली चालू शकते, तर हमरस्त्यांवर सुसाट धावू शकते.

– स्टायिलग
इतर बहुतांश हॅचबॅक आणि सबकॉम्पॅक्टसारखे नवीन फिगोच्या पुढील भागात ट्रेपझॉयडल ग्रील देण्यात आले आहे. तसेच त्याला चार हॉरिझोन्टल स्लॅट्सही आहेत. व स्वेप्टबॅक पद्धतीचे हेडलॅम्प्स नव्या फिगोमध्ये आहेत. साइड प्रोफाइलही चांगला आहे. रिअर प्रोफाइल आकर्षक आहे. टेललॅम्प्स हॅच पद्धतीचे आहेत. तसेच बूट स्पेसही चांगला आहे. गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्सही उत्तम आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर ही गाडी चांगली धावू शकते.

– किंमत
पेट्रोल : १.२ लिटर ४ बेस ४.२९ लाख ४ अ‍ॅम्बिएन्ट : ४.५६ लाख, ४ ट्रेन्ड : पाच लाख, ४ ट्रेन्ड प्लस : ५.२५ लाख ४ टिटॅनियम : ५.७५ लाख
* टिटॅनियम प्लस : ६.४० लाख,
१.५ लिटर (एटी) ४ टिटॅनियम : ६.९१ लाख
डिझेल : १.५ लिटर ४ बेस : ५.२९ लाख,
* एॅम्बिएन्ट : ५.६२ लाख ४ ट्रेन्ड : ५.९७ लाख
* ट्रेन्ड प्लस : ६.२२ लाख, ४ टिटॅनियम : ६.७२ लाख
* टिटॅनियम प्लस : ७.४० लाख.

– मायलेज
१.२ लिटर टीआय-व्हीसीटी पेट्रोल :
१८.१६ किमी प्रतिलिटर
१.५ लिटर टीडीसीआय डिझेल :
१७.०१ किमी प्रतिलिटर
१.५ लिटर टीआय-व्हीसीटी पेट्रोल :
२५.८ किमी प्रतिलिटर

* फिगोचे फायदे
* या गाडीचा आकार कॉम्पॅक्ट असल्याने वाहतूककोंडीतूनही तुम्ही गाडी सहजगत्या पुढे नेऊ शकता
* आतून गाडी प्रशस्त आहे तसेच आसनव्यवस्थाही चांगली आहे
* बूट कम्पार्टमेंट इतरांपेक्षा मोठा आहे
* किंमत परवडण्याजोगी आहे
* विक्रीनंतरची सíव्हसही चांगली आहे
* ऑटो ट्रान्समिशन मोड खूप छान आहे