संजय डोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावेत हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३२ मुख्य नियम आहेत. त्यापकी नियम क्रमांक २३, २४, २५, २६ व २७ खाली देण्यात येत आहेत.
२३) आपल्या पुढे असलेल्या वाहनापासून अंतर किती असावे: जर एखादे वाहन दुसऱ्या वाहनाच्या मागच्या बाजूला चालवण्यात येत असेल तर अशा वाहनाच्या चालकाने पुढच्या वाहनात व आपल्या वाहनात इतके अंतर ठेवले पाहिजे की, जर समोरच्या वाहनाचा वेग अचानक कमी झाला किंवा ते वाहन आकस्मिकरीत्या थांबले तर टक्कर होणार नाही.
२४) अकस्मात ब्रेक मारणे: कोणत्याही वाहनाच्या चालकाने अत्यंत अपरिहार्य नाइलाज असल्याशिवाय अकस्मात ब्रेक लावू नये.
२५) वरच्या दिशेने चढणाऱ्या वाहनांना प्राधान्य देणे: एखाद्या डोंगरी रस्त्यावर किंवा तीव्र चढण असलेल्या रस्त्यावर जर दोन वाहने एकमेकांजवळून सुलभतेने व निर्धोकपणे जाऊ शकणार नाही इतका अरुंद असेल तर अशा वेळेस वरून खाली उतरणाऱ्या वाहनाच्या चालकाने वर चढणाऱ्या वाहनास प्राधान्य दिले पाहिजे. अशा वाहनाच्या चालकाने आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून वर चढणाऱ्या वाहनास जागा करून दिली पाहिजे.
२६) वाहनचालकास अडथळा : जर एखादी व्यक्तीच्या बसण्याने अथवा उभे राहण्याने किंवा एखादी वस्तू ठेवल्याने जर वाहनाच्या चालकास त्याच्या ताब्यातील वाहनाचे नियंत्रण करण्यास अडचण येत असेल तर अशा व्यक्तीस बसण्यास किंवा उभे राहण्यास तसेच अशा प्रकारे एखादी वस्तू ठेवण्यास परवानगी देऊ नये.
२७) काही परिस्थितीमध्ये वेग नियंत्रित ठेवणे: मोटार वाहनाच्या चालकाने जर रस्त्यावरून सन्याची तुकडी जात असेल किंवा पोलिसांचे संचलन सुरू असेल किंवा रस्त्यावर कामगार रस्ता दुरुस्त करण्याचे काम करत असतील आणि त्याचे वाहन अशा वेळेस समोरून येत असेल अथवा मागून येऊन पुढे जात असेल, तर त्या वाहनाचा वेग ताशी २५ कि.मी.पेक्षा कमी ठेवावा. क्रमश: