ड्रायिव्हग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. तुमचा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची.  मेल करा. ls.driveit@gmail.com

चारचाकी वाहनांबद्दल मला लहानपणापासूनच आकर्षण होते. मी जेव्हा लहानपणी आईबाबांबरोबर अम्युझमेन्ट पार्कमध्ये फिरायला जात असे तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट येत असे आणि ती म्हणजे गो-काìटग. मला गाडय़ांचा गेम खेळायला खूप आवडत होता, मी गाडी खेळताना आजूबाजूच्या गाडय़ांना न ठोकता आपली गाडी इतरांच्या पुढे कशी जाईल, हाच प्रयत्न करीत असे. गो-काìटग खेळताना माझी कार नेहमी पुढे असायची!
मी गाडी व्यवस्थित चालवते आहे असे पाहून माझी आई माझ्या बाबांना म्हणाली, ‘आपली किरण कार उत्तम रीतीने चालवूशकेल.’ कार चालवण्याची इच्छा माझ्या विसाव्या वर्षी पूर्ण झाली. भारत मोटार ट्रेिनग स्कूलमधून कार ड्रायिव्हग शिकले, लायसन्स मिळाले. मग मला आईने होण्डा ब्रिओ कार घेऊन दिली पण आईच्या मनात थोडी भीती असल्यामुळे, मी कॉलनीमध्ये कार चालवायचे. हायवेवरचा अनुभव नव्हता. माझा हात साफ होण्यासाठी ८-१० दिवस एका ड्रायव्हरची मदत घेतली, कारण ट्रेिनग स्कूलमध्ये शिकताना पॅसेंजर सीटवर बसलेल्या ड्रायव्हरकडे सगळी कंट्रोल्स असायची.
मला ड्राइव्ह करायचा भन्नाट अनुभव यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर आला. मग आम्ही थेट सोलापूर गाठले, ४२० किमीचा  प्रवास, विश्रांती न घेता पार पाडला. हायवेपर्यंत मजा आली. मग जशी जशी कार घाट चढू लागली तेव्हा खरे ड्रायिव्हग काय असते हे कळले. हा अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. पहिली वेळ असल्यामुळे रस्ता थोडा चुकला. सोलापूरला जेव्हा आम्ही मावशीच्या घरी सुखरूप  पोहोचलो, तेव्हा सगळ्यांनी माझे भरभरून कौतुक केले. मात्र कौतुकाने हुरळून न जाता माझ्या कुटुंबीयांना घेऊन कधीही कुठेही लाँग ड्राइव्हला घेऊन जाऊ शकते हा आत्मविश्वास आला. याच अनुभवातून आम्ही  श्री अष्टविनायक यात्रा करायची ठरविले. प्रथम आम्ही महडला वरदविनायकाचे दर्शन घेऊन पाली (बल्लाळेश्वर) गाठले. तेथून पुण्याला जाताना  घाट लागला. घाट चढताना मला चित्तथरारक अनुभव आला. आठ विनायकांचे दर्शन घेताना वेगवेगळे अनुभव आले. शेवटी राहिले मोरगाव (मयूरेश्वर). पण जसजसा अंधार पडू लागला,  तसतसे मोरगावचा रस्ता मिळणे अवघड वाटू लागले. त्या दिवशी मंगळवार म्हणून माझा निश्चय दृढ होता. शेवटी ट्राफिक हवालदाराची मदत घेऊन मोरगावचा रस्ता विचारला. त्यांनी सांगितले दिवा घाट पार करावा लागेल. हे ऐकून माझ्या  घशाला खरेच कोरड पडली, पण मोरगाव आल्याशिवाय पाणी प्यायचे नाही असे ठरवूनच दिवा घाट पार केला. सासवड मग जेजुरी आले तेव्हा  रात्रीचे १० वाजले होते. जेजुरीवरून मोरगाव १० मिनिटांत आले तेव्हा तेथील लोकांनी सांगितले, मंदिर आता बंद झाले असेल. मग थेट मंदिर गाठले आणि मयूरेश्वराचे दर्शन झाल्यावरच मी पाणी प्याले, कारण मंदिर बंद होण्याची वेळ होती रात्री १०.३०ची. असा हा माझा पहिला अनुभव माझ्या नेहमी लक्षात राहील.

किरण शिंदे