रोल्स रॉइसचे ऑनलाइन लाँचिंग
नवी दिल्ली : रोल्स रॉइस मोटर कार्सच्या (आरआरएमसी) इतिहासात प्रथमच नव्या गाडीचे ऑनलाइन लाँचिंग केले जाणार आहे. नव्या मॉडेलविषयी प्रचंड गोपनीयता राखण्यात आली असून ८ सप्टेंबर रोजी रोल्स रॉइसचे हे नवे मॉडेल एकाच वेळी लंडन, न्यू यॉर्क, दुबई व शांघाय येथे लाँच केले जाणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रसारमाध्यमांना ऑनलाइन लाँचिंगसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांना संकेतस्थळाचा पत्ता देऊन एक परवलीचा शब्द (पासवर्ड) देण्यात आला आहे. त्याद्वारे संकेतस्थळावर प्रवेश करून लाँचिंगच्या दिवशी आरआरएमसीचे सीईओ टॉर्सटन म्युलर-ओटव्होज यांच्याशी संवाद साधता येणार आहे.
होंडाच्या विक्रीत वाढ
मुंबई : होंडा कार्स इंडिया लिमिटेडने नुकत्याच संपलेल्या ऑगस्ट महिन्यात चांगल्या विक्रीची नोंद केली आहे. होंडाच्या विविध श्रेणीतील एकूण १५ हजार ६५५ गाडय़ांची विक्री यादरम्यान झाली. मागील वर्षी हाच आकडा १६ हजार ७५८ होता. ऑगस्टमध्ये होंडाने ५८५ गाडय़ांची निर्यातही केली. एकूणच चालू आíथक वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांत होंडाच्या गाडय़ांची विक्री वाढली असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. होंडाकडे ब्रिओ, अमेझ, मोबिलिओ, जॅझ, सिटी आणि सीआर व्ही या सर्व श्रेणोंतील गाडय़ा आहेत.