अभियांत्रिकी शाखेतील वाहनप्रेमी आणि संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या व त्यातून वाहन उद्योगाच्या हाती चांगले काही लागावे, या उद्देशाने दरवर्षी इंदूरमध्ये बाहा एसएई इंडिया ही स्पर्धा आयोजित केली जाते. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवडय़ात ही स्पर्धा पार पडली. त्याचा लेखाजोखा..

इंदूरनजीकच्या पिथमपूर येथील काहीशा ओबडधोबड, खडबडीत, छोटय़ा-मोठय़ा टेकडय़ांच्या भागात जय्यत तयारी सुरू असते. वेगवेगळ्या आकाराच्या खुल्या स्वरूपातल्या चारचाकी गाड्या आपापल्या टेंटनजीक उभ्या असतात. गाडीचा चालक आणि गाडीची निर्मिती करणारी अख्खी टीम आपल्या गाडीकडे कौतुकाने पाहात असतात. कोणी स्पध्रेपूर्वीची ‘लास्ट मिनीट’तयारी करण्यात गुंतलेला असतो, तर कोणी गाडीच्या प्रत्येक भागाची तपासणी करून त्यात काही बिघाड असल्यास त्याची दुरुस्ती करण्यात गुंतलेला असतो, गाडीसह आपल्या टीमचा फोटो कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याची कोणाची घाई सुरू असते.. स्पर्धा सुरू होण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागते तसतशी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहू लागतो.. आपल्या गाडीच्या ड्रायव्हरला चीअर अप करण्यासाठी प्रत्येक टीम उत्सुक असते.. तेवढ्यात ऑन युअर मार्क, गेट सेट, गो.. ही घोषणा होते आणि स्पर्धा सुरू झाल्याचा हिरवा झेंडा दाखवला जातो.. त्या खडबडीत, ओबडधोबड रस्त्यावरून मग गाडय़ा सुसाट धावू लागतात.. रुढार्थाने या नेहमीच्या ब्रँडेड गाडय़ा नसतात.. त्या असतात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बग्गीसारख्या स्पोर्टस कार..
भारतातील अभियांत्रिकी शाखेतील वाहनप्रेमी आणि संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून व त्यातून वाहन उद्योगासाठीही चांगले काही हाती लागावे या उद्देशातून सुरू करण्यात आलेल्या बाहा एसएई इंडिया ही विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्पोर्ट मोटारींची शर्यत. यंदा या स्पध्रेचे सातवे वर्ष. गेल्याच महिन्यात इंदूरनजीकच्या पिथमपूर येथील नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्टिंग अँड आर अँड डी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट (नाट्रिप) येथे ही स्पर्धा पार पडली. ‘रेज द बार’या संकल्पनेवर आधारलेल्या या स्पर्घेत इंदूरच्याच श्री गोविदरा सिकसरिया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. तर कॉलेज ऑफ इंजिनीअिरग पुणे आणि वेल्लोर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या दोन संस्थांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. देशभरातून ३२७ संघांनी स्पध्रेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १२५ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. या १२५संघातील सुमारे साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी विविध स्पोर्टस् कार सादर केल्या. सुमारे ३१ लाख ५० हजार रुपयांची बक्षिसे यावेळी वितरीत करण्यात आली.

स्पर्धेचे स्वरूप
देशाच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर विभागातील आलेल्या अनेक इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्रवेश अर्जाची छाननी केली जाते. विद्यार्थ्यांनी स्पोर्टस् कार कशा तयार केल्या, त्यांचे ब्रेक्स, सस्पेन्शन, स्टीअरिंग यांचे आरेखन कसे करण्यात आले या सर्व बाबी शर्यतीआधी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून समजून घेतल्या जातात. वाहन उद्योगातील नामवंत व्यक्ती परीक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या नजरेखालून गेल्यानंतरच एखादी टीम स्पध्रेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरते. त्यानंतर प्रत्येक टीमला पिथामपूर येथे स्पर्धेसाठी पाचारण करण्यात येते. मिहद्रा आणि सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्स इन इंडिया (एसएई इंडिया) हे या स्पध्रेचे मुख्य प्रायोजक असतात तर इतर नामांकित वाहन कंपन्या सहप्रायोजक असतात.

बाहाचा इतिहास
बाहाचं स्पेलिंग बीएजेए असे असले तरी त्याचा उच्चार बाहा असा केला जातो. सर्वात आधी ही स्पर्धा अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना येथे १९७६ मध्ये आयोजित करण्यात आली होती. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कार आरेखनाची सवय व्हावी, त्यांना त्यात प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यानंतर या स्पध्रेचे लोण ब्राझील, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका व भारतात पसरले. २००७ पासून ही स्पर्धा इंदूरमध्ये भरवली जाते. त्यासाठी पिथमपूर येथे ऑफ रोड गाड्यांसाठीचा खास ट्रॅक (नाट्रिप) तयार करण्यात आला आहे.
स्पध्रेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आनंद झाला आहे. तरुण अभियंत्यांना वाहन क्षेत्रात भरीव कामगिरी करता यावी व त्यांना त्यासाठी प्रोत्साहन मिळावे हाच या स्पध्रेमागचा आमचा उद्देश आहे. तसेच या स्पध्रेतून टॅलेंट हंट करणे हाही आमचा उद्देश असतो. त्यातही आम्ही सफल झालो आहोत. याच स्पध्रेच्या माध्यमातून अनेक अभियंत्यांनी मिहद्रामध्ये नोकरी पटकावली आहे.
पवन गोएंका, अध्यक्ष

स्पर्धेचे विजेते-


ऑटोमोटिव्ह अँड फार्म इक्विपमेंट सेक्टर, मिहद्र अँड मिहद्र
१. एसजीएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (कार-५)
२. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे (कार-१)
३. वेल्लोर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, वेल्लोर (कार-४)
४. प्राइड ऑफ इंदोर : एसजीएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, इंदूर

५. चेअरमन्स अ‍ॅवॉर्ड : इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली
६. द्रोणाचार्य अ‍ॅवॉर्ड पहिला : इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ, अहमदाबाद
७. द्रोणाचार्य अ‍ॅवॉर्ड दुसरा : मेडि-कॅप्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, इंदूर
१. एसजीएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (कार-५)
२. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे (कार-१)
३. वेल्लोर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, वेल्लोर (कार-४)
४. प्राइड ऑफ इंदोर : एसजीएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, इंदूर

५. चेअरमन्स अ‍ॅवॉर्ड : इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली
६. द्रोणाचार्य अ‍ॅवॉर्ड पहिला : इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ, अहमदाबाद
७. द्रोणाचार्य अ‍ॅवॉर्ड दुसरा : मेडि-कॅप्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, इंदूर