पुण्याच्या एमकेएसएसएसच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरींग फॉर वुमन्सच्या चमूने या वर्षी प्रथमच या ‘बहा २०१३’ मध्ये सहभाग घेतला होता. कप्तान मृणाल सावंत, ड्रायव्हर ऋजुता मराठे यांनी सांगितले की, दोन वर्षांपासून आम्ही या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयारी करीत आहोत. या वर्षी मात्र सहभागी होऊ शकलो. इतकेच नव्हे तर सुदैवाने अंतिम शर्यतीत आम्ही कोणताही अडथळा न येता १३ वा क्रमांक पटकाविला. आमचा हा पहिलाच प्रयत्न होता, तरीही त्यात आम्ही प्राप्त केलेले हे यश पुढचे पाऊल म्हणता येईल. चढण असलेल्या डोंगराळ रेस ट्रॅकवर २२ अंशाचे ५० मीटर लांबीचे चढण आम्ही ३९ मीटर पार केले. त्यानंतर आमचे वाहन थांबले. शर्यतीत पहिल्यांदाच घेतलेल्या सहभागात आमची कामगिरी एकदिलाने आम्ही पार पाडली आहे. त्यांच्या या यशामुळे मुलेही मोटारी चालवू शकतात असे म्हणायला हरकत नाही! ‘कमिन्स’च्या या चमूमध्ये मृणाल सावंत, ऋजुता मराठे, नेहा जावळे, ज्योती जाधव, सुरभी काबरा, पूजा शिवाळे पाटील, भार्गवी पाटील, रितुजा मराठे, अनिया कोल्हटकर, इशा पारगांवकर, श्वेता हरिहरन, नूपूर भोंगे, विभा मनवी, विशाखा पांडय़े, प्रेरणा चौहान, वृषाली तळेकर, अंकिता निगडे, रेणुका रोडे, उत्तरा पेशवे, पूर्वा मुजुमदार, मैत्रेयी एकबोटे, मेघा गुप्ता, अनुश्री देशिर्गे, रचना येमुल यांचा समावेश होता. ड्रायव्हर म्हणून आपला अनुभव सांगताना ऋजुता मराठे हिने सांगितले, की अशा प्रकारचा अनुभव खूप वेगळा असतो. सर्वसाधारण वाहन चालविताना रस्त्यावरील नियम पाळावे लागतात, येथे ते इतके नसतात. ताशी ६० किलोमीटर इतका वेग नियंत्रण येथे दिलेला होता. हे ऑफ रोड प्रकारचे वाहन तयार करताना अनेक बाबींचा विचार करून आम्ही तयार केले होते. बसताना त्रास होऊ नये, त्यात बसणारी व्हायब्रेशन्स ही नेहमीच्या कारमध्ये जाणवतही नाहीत. त्यामुळे तसा अनुभव व त्यातून हे वाहन चालविणे हे तसे वेगळे कौशल्य आहे. पण यातही एक वेगळा आनंद असतो. अंतिम रेसमध्ये फक्त एकदाच क्लचचा त्रास झाल्याने काही क्षणासाठी वेळ गेला पण कोठेही वाहन बंद पडले नाही किंवा धक्का मारावा लागला नाही. हे सांगताना नशिबाचा भाग असला तरी कुठेही आपल्या वाहनचालनातील कौशल्याची तरफदारी न करता एकूण सर्व चमूच्या यशाची गुणगणना ऋजुताने केली.