कुटुंबाबरोबर किंवा मित्रांबरोबर लाँग ड्राइव्ह किंवा रोड ट्रिपसाठी बाहेर पडलात आणि अचानक गाडीत काही बिघाड झाला, तर गॅरेज अथवा मेकॅनिक शोधणं, ही डोकेदुखीची बाब असते. तुमची गाडी ज्या कंपनीची आहे, त्या कंपनीचे सर्व्हिस सेंटर शोधण्यापासून त्या सेंटरचा नंबर मिळवण्यापर्यंत अनेक खटपटी कराव्या लागतात. त्यातही गाडी तुमच्या ओळखीच्या प्रदेशात किंवा एखाद्या मोठय़ा शहरात बंद पडली, तर काम सोपे होऊन जाते. पण अनोळखी प्रदेशातील लोकांची भाषा कळत नसेल, तर संवाद साधण्यातही अनेक अडचणी येतात. लोकांवर विश्वास ठेवायचा की नाही, या द्विधा मन:स्थितीत असताना तंत्रज्ञानाची मदत मिळाली तर.. हाच विचार करून खास कारवेडय़ांसाठी अनेक अ‍ॅप्स तयार झाली आहेत. विशेष म्हणजे ही अ‍ॅप्स कारवेडय़ांना २४ तास मदत करतात. त्यामुळे कोणत्याही वेळी आणि कुठेही बंद पडलेली गाडी सुरू करण्यासाठी मेकॅनिक मिळवून देण्यापासून अपघात झाला असल्यास पोलिसांची मदत मिळवण्यापर्यंत सगळ्यासाठीच ही अ‍ॅप्स मदतीला येऊ शकतात. अशाच काही अ‍ॅप्सबद्दल ही माहिती..

ब्रेकडाऊन हे अप भारतातील अशा रोडसाइड असिस्टंट अ‍ॅप्समधील सर्वात लवकर सेवा देणारं खात्रीदायक अ‍ॅप असल्याचा दावा करतं. या अ‍ॅपच्या नावाप्रमाणेच गाडी ब्रेकडाऊन झाल्यास तातडीने मदत पोहोचवण्यासाठी या अ‍ॅपची गरज भासू शकते. भारतात कुठेही तुमची गाडी बंद पडल्यास या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही सहज मदत मिळवू शकता. या अ‍ॅपमध्ये मुख्यत्वे गाडी बंद पडल्यानंतरच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या संपर्क यंत्रणेचा समावेश आहे. पण त्याचबरोबर गाडीचा अपघात झाल्यास पोलिसांशी संपर्क साधणे, रुग्णवाहिकेची गरज भासल्यास त्यांचा संपर्क, आणीबाणीच्या परिस्थितीत त्या परिसरातील रुग्णालयांचा संपर्क क्रमांक आदी सर्व गोष्टी या अ‍ॅपद्वारे तुमच्या हाती अगदी सहज मिळू शकतात. हे अ‍ॅप सध्या गुगल प्ले आणि अ‍ॅपल स्टोअर या दोनच यंत्रणांवर उपलब्ध आहे.

मेरीकार डॉट कॉम हे अ‍ॅप फक्त अँड्राइड फोन वापरणाऱ्या ग्राहकांनाच वापरता येईल. सध्या हे अ‍ॅप फक्त गुगल प्लेवरच उपलब्ध आहे. या अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमच्या गाडीच्या कंपनीच्या सíव्हस सेंटरशी थेट संपर्क साधू शकता. ज्या परिसरात तुमची गाडी बंद पडली आहे, त्या परिसरातील सíव्हस सेंटर शोधण्यासाठी हे अ‍ॅप तुम्हाला मदत करते. यात मारुती, ह्युंदाई, टाटा अशा अनेक कंपन्यांच्या सíव्हस सेंटरचा समावेश आहे. त्याशिवाय परिसरातील छोटी गॅरेज, गाडी दुरुस्तीची दुकाने आदींबाबतचा तपशीलही या अ‍ॅपवर मिळू शकतो. त्यामुळे हे अ‍ॅपही फायद्याचे आहे.

२४ तास रोडसाइड असिस्टन्स पुरवणाऱ्या अ‍ॅपच्या मांदियाळीत नव्याने दाखल झालेलं अ‍ॅप म्हणजे गोबम्पर. हे अ‍ॅप सध्या फक्त चेन्नई परिसरातच चालू असलं, तरी लवकरच ते भारतातील सर्वच मोठय़ा शहरांमध्ये विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. हे अ‍ॅप रोडसाइड असिस्टन्सशिवाय गाडीच्या इतर वेळच्या देखभाल-दुरुस्तीसाठी लागणाऱ्या गोष्टींकडेही लक्ष पुरवतं. त्याशिवाय गाडीत नेमका काय बिघाड आहे, हे शोधण्यासाठीही या अ‍ॅपची मदत होऊ शकते. सध्या हे अ‍ॅप फक्त अँड्रॉइड प्रणालीवर उपलब्ध असून, गुगल प्लेवरून डाऊनलोड करता येईल. लवकरच हे अ‍ॅप अ‍ॅपल आयओएस प्रणालीवरही उपलब्ध होणार आहे.

भारतात रोडसाइड असिस्टन्स देणाऱ्या अ‍ॅपपकी सर्वाधिक लोकप्रिय आणि मागणी असणारं अ‍ॅप, अशी स्ट्रँड-डी या अ‍ॅपची ओळख आहे. या अ‍ॅपचं वैशिष्टय़ म्हणजे अ‍ॅपच्या माध्यमातून जेवढी मदत घेतली जाते, फक्त तेवढय़ाच किमतीचे बिल ग्राहकाला मिळते. त्यात कोणतेही छुपे दर आकारले जात नाहीत. इतर अ‍ॅप्सप्रमाणे या अ‍ॅपद्वारेही संपूर्ण भारतभरात कुठेही गाडी बिघडली असता तातडीची मदत मिळवणे सोपे जाते. उत्तम आणि तातडीची सेवा आणि त्याचबरोबर बिल भरण्याचे विविध पर्याय यांमुळे हे अ‍ॅप अधिक लोकप्रिय आहे. सध्या हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि अ‍ॅपल आयओएस या प्रणालींवर उपलब्ध आहे.

गोबम्पर या अ‍ॅपप्रमाणेच सध्या ठरावीक भागात सेवा पुरवणाऱ्या अ‍ॅपमध्ये हेल्प ऑन व्हील्स हे अ‍ॅप तेजीत आहे. हे अ‍ॅप नवी दिल्ली, नॉएडा, ग्रेटर नॉएडा, गुरगांव, फरिदाबाद आणि गाझियाबाद म्हणजेच एनसीआरमध्ये ग्राहकांना सेवा देत आहे. गाडीची चावी आतच विसरून गाडी लॉक करण्याचे प्रकार अनेकदा घडतात. अशा गोष्टींसाठीही हेल्प ऑन व्हील्स हे अ‍ॅप मदतीला धावून येते. त्याशिवाय गाडीतील बिघाड, टायरच्या समस्या, इंधन संपल्यास इंधन भरणे आदी गोष्टींसाठीही हे अ‍ॅप उपयुक्त आहे. सध्या हे अ‍ॅप फक्त अँड्रॉइड फोन्ससाठी उपलब्ध असून, लवकरच या अ‍ॅपचे क्षेत्र विस्तारण्यात येणार आहे.
रोहन टिल्लू – rohan.tillu@expressindia.com