ड्रायिव्हग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. तुमचा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. मेल करा.  ls.driveit@gmail.com

माझ्या मोबिलिओचा अभिमान

लहानपणी आई-आप्पांबरोबर टॅक्सीमधून फिरताना मी नेहमी पुढे ड्रायव्हरच्या शेजारी बसायचा हट्ट धरत असे. पण ते विंडस्क्रीनमधून बाहेरची रंगीबेरंगी दुनिया बघण्यासाठी नव्हे, तर तो ड्रायव्हर गाडी कशी चालवतो तो पाहण्यासाठी! आपल्याला कार चालवता यायला हवी हे मी मनाशी पक्के करून टाकलेले होते. आणि जेव्हा मी माझी पहिली कार घेतली तेव्हा हा निश्चय पूर्णत्वास गेला. माझी पहिली कार मारुती ८०० ही मी गुजरातमधील बारडोलीच्या सेकंडहॅण्ड कार मार्केटमधून खरेदी केली होती आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरून मुंबईपर्यंत चालवत आणली होती एकटय़ाने! नवल म्हणजे ड्रायव्हिंग स्कूलचे प्रशिक्षण मी नुकतेच पुरे केलेले होते. त्यानंतर याच कारवर मी ड्रायव्हिंगचा खूप सराव केला. रिव्हर्स घेणे, भर ट्रॅफिकमध्ये पूल चढणे आणि उतरणे, यू टर्न-डिप राईट किंवा लेफ्ट टर्न घेणे मला लीलया जमू लागले.
माझ्या पत्नीनेदेखील ड्रायव्हिंग स्कूलचे प्रशिक्षण झाल्यावर याच कारवर सराव केला. जवळजवळ तीन वर्षे ही कार मी माझ्या जिवापलीकडे सांभाळली. जुनी होती तरीही तिने चांगलेच काम दिले. कार चालविण्याचा माझा आत्मविश्वास वाढवला. त्यानंतर एप्रिल २००८ मध्ये मी नवीन कार घेतली मारुती सुझुकी एस्टीम. सेदान कार! या कारवरून हात फिरवताना मला खूप छान वाटे. स्वत:च्या नव्या कारचं माझं स्वप्न साकार झालं होतं. ही कार मी मुंबईत छानच जपून चालवली. शिवाय अलिबाग, पुणे अशा अनेक सहलींना तिने मला उत्तम साथ दिली. माझ्या कुटुंबालाही तिच्याबद्दल फार प्रेम वाटत असे. ती तर आमच्या कुटुंबाची एक सदस्यच झाली होती. सहा वर्षे ही कार मी सांभाळली. ती जेव्हा विक्रीसाठी काढली, तेव्हा ती चांगल्या हाती पडावी या इच्छेपोटी ती एक्स्चेंजमध्ये देऊ नये असे फार वाटले. त्याप्रमाणे ती चांगल्या कुटुंबाने विकत घेतली तेव्हाच मला बरे वाटले. काही काळ मी वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार्स पाहण्यात घालवला तेव्हाही माझ्या मनातून माझी एस्टीम जात नव्हती. जवळजवळ दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मी होंडा कंपनीची नवीन कार मोबिलिओ घेण्याचे निश्चित केले. त्यापूर्वी एनजोय, डस्टर, एर्टीगा, सेलेरिओ, आय १०, आय २०, वेर्ना अशा कार्सही पाहिल्या. परंतु मोबिलिओसारखी स्टायलिश कार मला दुसरी कोणतीही आढळली नाही. अनेक सोयींनीयुक्त अशी ही सात व्यक्तींची आसन व्यवस्था असलेली कार मी नुकतीच जून २०१५ मध्ये खरेदी केली. ही कार घेताना एक सेदान कार चालवण्याचा अनुभव गाठीशी असल्याने माझा आत्मविश्वास दुपटी तिपटीने वाढलेला होता. एक मोठी आय टेक कार मालकीची होत असल्याचा आनंदही होत होता. मी या कारला क्रोम कव्हरिंगच्या वेगवेगळ्या अ‍ॅक्सेसरीजनी अगदी नव्या नवरीसारखे सजवले. एलईडी दिव्यांनी कारचा अंतर्भाग प्रकाशमान केला. जीपीएस, नेव्हिगेशन सिस्टीम बसविली. या कारमधून प्रवास करण्याचा अनुभव मला सुखदायक वाटतो. दूरच्या प्रवासात एक्स्प्रेस वे किंवा पूर्वमुक्त मार्गावरून माझी कार वाऱ्याशी स्पर्धा करत पळते तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा होतो. आज माझी मोबिलीओ जेव्हा रस्त्यावरून धावते तेव्हा लोकांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या मला जाणवतात आणि मग मला अशा शानदार गाडीचा रास्त अभिमानच वाटतो.
– चंद्रहास जयवंत म्हात्रे,
परळगाव, मुंबई.