माझा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण मराठी शाळेत घेतले. १९७२ साली मुळा धरणाचे पाणी माझ्या गावी सोनईला आले. वडील व तीन चुलते असे जिराईत शेतकरी कुटुंब होते. चुलते गुलाब पाटील व आजोबा धोंडीराम पाटील गावातल्या समाजकारणात व राजकारणात होते. चुलत्यांनी सहकारी साखर कारखाना काढण्याचे ठरविले व मुळा कारखाना स्थापन केला. जमीन कमी असल्यामुळे त्यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले. तसेच दोन जावा मोटरसायकल, एक जुनी पेट्रोल इम्पाला गाडी घेतली व ती डिझेलवर त्या काळी अल्टर केली. मला पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेण्यास पाठविले. दहावीच्या सुट्टीत घरी कोणी नसताना जावा गाडी चालवावी अशी लहर आली. तिची चावी आम्हाला कोणी देत नव्हते. कोठून तरी कळले की तरवडाची (एक झुडूप वर्गीय झाड) काडी चावीच्या जागी घातली की गाडी चालू होते. आम्ही त्याप्रमाणे केले व गाडी लोटून चालू केली व थोडीशी चालविली. हे कळल्यावर घरचे रागावले. हा पहिला अनुभव. गावातून सिनेमाला गुपचूप जाण्यासाठी मोटरसायकल चालू करायच्या व जायचे. नंतर वडिलांची अल्टर करून डिझेलवर केलेली एक जुनी पेट्रोल जीप होती. तिला सर्व गाव झेलम एक्स्प्रेस म्हणायचे. मी बारावीच्या सुट्टीत घरी असताना गुपचूप जीप ड्रायव्हरकडून चालवायला घेतली. जीप चालवताना वडिलांचे निरीक्षण करणे चालू असायचे. इंजिनीअर झाल्यावर मुळा कारखान्यावर सायकलने ठेकेदाराकडे अनुभवासाठी कामाला जायचे, परंतु खूप दमायचो. मग जावा गाडी घेऊन जायला लागलो, नंतर नगरला एक वर्ष नोकरी केली, तेव्हा जावा गाडी रुपांतरित करुन त्याचे नामकरण जावासाकी असे केले. या सगळ्या उपद्व्यापासाठी त्याकाळी ६५०० रुपये खर्च केला होता, परंतु एकाच वर्षांत ती खिळखिळी झाली. कारण माझी ड्रायव्हिंग फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस अशीच आहे. मग त्याकाळी टीव्हीएस सुझुकी दणकट व आधुनिक व पेट्रोलला मायलेज देणारी गाडी म्हणून प्रसिद्ध झाली होती. मग नवीन सुझुकी घेतली १९८७ साली पुण्यात असताना गाडय़ांचा थरार असलेला मॅड-मॅक्स सिनेमा पाहिलेला होता, त्यामुळे सुझुकीच्या पुढच्या नंबर प्लेटवर मॅड-मॅक्स असे लिहिले. गाडीच्या पेट्रोल टाकीवर वॉकमन स्पिकरसह कॅसेट व इअरफोनवर गाणे ऐकणे व प्रवास करणे. ठेकेदारी व्यवसाय स्वीकारल्यामुळे रोज किमान शंभर कि.मी. सरासरी प्रवास सुझुकीवर १८ वर्षे केला. कुटुंब विभाजनामुळे व आर्थिक तंगीमुळे जीप १९९० साली विकून टाकली. १९९७ साली एका मित्राने रॉकेलवर फियाट गाडी चालते, असे सांगितल्यावर पुन्हा चारचाकी चालवावी अशी मनाने उचल खाल्ली. मग पुण्याला जाऊन जुनी पेट्रोल फियाट ५० हजार खर्चून आणली. इंदोरला दहा हजार खर्चून रॉकेलवर चालणारे किट बसवले. परंतु हे तंत्रज्ञान सपशेल फसवे निघाले. गाडी पुन्हा वर्षांत जनरलवर आली. मग मातीमोल भावाने विकून टाकली. परंतु तिला घेऊन मुंबई, सोलापूर व लांबलांब भरपूर प्रवास केला. वरील सुझुकी २००५पर्यंत वापरात होती नंतर उभी करून ठेवली. १९८७ ते १९९१पर्यंत सुझुकी पेट्रोलवर वापरली. १९९१ साली पेट्रोलचे भाव खूप वाढवल्यामुळे रॉकेल मिक्स करून २००५ पर्यंत वापरली. २००५ साली टीव्हीएस सुझुकी व्हिक्टर घेतली. ती अजून वापरात आहे. आता चारचाकीचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे वाटत असताना २००८ साली टाटांनी नॅनोची घोषणा केली. मी लगेच बुकिंग केले. २०१० साली माझी डिलिव्हरी मिळणार होती, परंतु पेपरमध्ये नॅनोविषयी नकारात्मक बातम्या यायच्या. एकदा फियाट प्रकरणातून पोळलेलो असल्यामुळे नॅनोचा काय निर्णय घ्यायचा ते कळेना. नंबर जवळ आलेला. मग गाडय़ा घेतलेल्या ग्राहकांची विचारपूस केली. एका रिटायर्ड पंजाबी कॅप्टनने केरळ दौरा केलेला. चांगला रिझल्ट सांगितला. पण स्वत चालवून पाहिल्याशिवाय चन पडेना. मग एका ग्राहकाची गाडी पाच कि.मी. चालवून पाहिली व टाटांनी अत्यंत उत्कृष्ट गाडी तयार केल्याचा आनंद झाला. मग ऑगस्ट २०१०मध्ये गाडी घेतली व आजपर्यंत तिचा आनंद घेत आहे. सगळा महाराष्ट्र सहकुटुंब पालथा घातला. सहकुटुंब केरळ, कर्नाटक ट्रिप ९ दिवसांत ३५०० कि.मी. प्रवास केला. नॅनोला कमी प्रतिसाद मिळाला, पण ३५ वर्षांच्या ड्रायिव्हग अनुभवातून सांगू इच्छितो की, नॅनो इज अ वंडरफूल अ‍ॅन्ड इकॉनॉमिकल कार. – , नेवासा, नगर

ड्रायिव्हिंग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. तुमचा ड्रायिव्हिंग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. मेल करा. ls.driveit@gmail.com