‘सीओईपी’चे प्रा. दिलीप मालखेडे यांनी सांगितले की, ‘बहा एसएई’ची ही शर्यत २००७ मध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. त्या वेळी प्रथम झालेल्या स्पर्धेतही पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, पुणे (सीओईपी)यांच्या चमूने पहिला क्रमांक पटकाविला होता. तेव्हापासून ‘सीओईपी’ने सातत्याने या स्पर्धेत भाग घेतला आहे. याआधीच्या वर्षांमधील शर्यतीमध्ये ज्यांनी भाग घेतलेला असतो, त्यापैकी काही जण पुढील वर्षांतही चमूमध्ये असतात. आपल्या अनुभवांचा उपयोग ते नव्यांना देतात. त्यांच्यामध्ये चर्चा होते, वाहन कसे बनवावे, ते कसे दिसावे, त्यात वैशिष्टय़े कोणती हवीत, पूर्वीचे गुण-दोष काय होते याचा विचारही केला जातो. यावर समन्वय होतो व त्या दृष्टीने शर्यतीमधील वाहनाच्या निर्मितीमधील विविध टप्पे पार पाडले जातात, वाहनांचे आरेखन केले जाते व त्यानंतर शर्यतीमध्ये प्रत्यक्ष येणाऱ्या अनुभवासाठी प्रॅक्टिसही केली जाते. प्रत्येक महाविद्यालयांचा चमू हा २५ जणांचा असतो व त्यात जुने व नवे असा समतोलही आम्ही ठेवतो. या स्पर्धेसाठी फोर्स मोटरने आम्हाला प्रायोजित केले होते.
बहा-२०१३ च्या एकूण स्पर्धेसाठी ‘सीओईपी’च्या चमूने ८ लाख ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळविले असून आतापर्यंतचे हे सर्वाधिक मोठे बक्षीस आहे. पूर्वीच्या शर्यतीचाही आम्ही रेकॉर्डब्रेक केला असून ही परंपरा पुढेही चालू ठेवण्याचा निर्धार महाविद्यालयाच्या वतीने प्रा. मालखेडे यांनी व्यक्त केली. ‘सीओईपी’चे संचालक प्रा. आहुजा, उपसंचालक व उत्पादन विभागप्रमुख प्रा. राजहंस, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. सपाली व कार्यशाळेचे, कार्यालयातील कर्मचारीवर्गानेही बहुमोल सहकार्य केले असल्याचेही प्रा. मालखेडे यांनी सांगितले.