महिन्द्रा टु व्हिलर्स आता स्वतंत्रपणे भारतीय बाजारपेठेत उतरली असून डय़ुरो व रोडिओ या दोन स्कूटर्सच्या पुढील आवृत्तीही आता त्यांनी दुचाकीप्रेमींसाठी आणली आहे. रोडिओची यापूर्वीची आवृत्ती बऱ्याच अंशी सुधारून, इंजिनमध्ये काही सुधारणा घडवून रोडिओ आरझेड या नावाने आता बाजारात उतरविली आहे. मोटारसायकलसारखी झटदिशी गती घेणारी रोडिओ-आरझेड ही १२५ सीसीची स्कूटर आहे.  वजन, वेग, आसनव्यवस्था, नियंत्रणक्षमता यांचा विचार करता रोडिओ ही नव्या जमान्याची व नवीन पिढीसाठी चांगली स्कूटर म्हणावी लागेल. आता महिलाही गतीच्या तुलनेत मागे नाहीत, किंबहुना ही बाब लक्षात घेतली तर महिलांनाही गतीमान स्कूटर नियंत्रणात ठेवून व सहजपणे चालविता येईल अशी महिन्द्राची रोडिओ-आरझेढ ही स्कूटर आहे.
स्कूटरची उंची पाहाता व आसनाची लांबी पाहाता साधारण सव्वापाच ते साडे पाच फूट उंचीच्या मध्यम आकाराच्या व्यक्तींना ही स्कूटर नक्कीच छान वाटेल. दोन जणांसाठी ही स्कूटर नक्की ताकदवान असली तरी उंचीच्यादृष्टीने भारतीय उंचीचा विचार करता साडेपाच फुटाच्याहून अधिक उंच असणाऱ्या व्यक्तींसाठी ही स्कूटर काहीशी अडनिडी पडेल. साडेपाच फुट उंचीच्यापेक्षा अधिक उंची असणारा चालक काहीसा मागे सरकून बसणे पसंत करतो, ही बाब व आसनाची लांबी लक्षात घेतली तर रोडिओवर चालकामागे कमी उंचीची व्यक्ती कशीतरी बसू शकले. स्कूटरच्या हँडलबारची रचना काहीशी मागे असणे आणि आसनाची लांबी कमी असणे ही कारणे त्यामागे वाटतात. मात्र सर्वसाधारण भारती मुलींना दोन जणींना बसण्यास उपयुक्त ठरू शकेल, असे वाटते. आसन पुढील बाजूनेही समतल असून निमुळते वा उतरते नसल्याने बसण्यासाठी व काहीशी लांब जाण्यासाठीही रोडिओ आरामदायी आहे. एका व्यक्तीला स्कूटरचा वापर करणे जास्त आरामदायी ठरू शकले हे नक्की.
क्षणार्धात वेग घेणारी रोडिओ मोटारसायकलीसारखी झपकन पुढे जाते, वर्दळीच्या ठिकाणी त्यामुळे ती जरा जपून चालवावी लागेल, मुंबईसारख्या वाहतुकीमध्ये नियंत्रितपणे व आवश्यक तेव्हा झटक्यात वेग वाढवून पळविणे व सिग्नल पार करणे ज्यांना आवडते अशांना स्कूटर असूनही मोटारसायकलीसारखा आनंद देणारी व तसा फायरींगच्या आवाजाचाही आनंद देणारी रोडिओ नक्कीच आवडणारी ठरू शकेल.
गतीमानता व मायलेज याबाबत मात्र मायलेज अतिगतीमानतेत व वाहतुकीच्या वर्दळीत पळविणे मायलेज कमी देणारे ठरू शकेल. मात्र एकसंघ गतीतून रोडिओ शहराबाहेर चालविताना आरामदायी व गतीचा आनंद देणारी ठरू शकेल. शॉकअ‍ॅब्सॉर्बर्स चांगले असून छोटी चाके असतानाही खड्डय़ांचा खडतरपणा तसा जाणविणारा नाही. अर्थात स्कूटर असल्याने अशा गोष्टी जपून कराव्यात कारण स्कूटर चालविताना मागील प्रवासी जर काहीसा उंच वा वजनदार असेल तर स्कूटरचा समतोल राखणे काहीसे कठीण होते. विशेष करून मुंबई-ठाण्यासारख्या शहरात असलेल्या वाहतूक व रस्ता यांची स्थिती पाहाता हा समतोल राखणे कठीण होऊ शकते. अशावेळी स्कूटर अतिनियंत्रित वेगात न्यावी लागेल. स्कूटरची झपकन वेग घेण्याची शैली अशा ठिकाणी काळजीपूर्वक हाताळावी लागेल.
स्कूटरला इंधन भरण्यासाठी नियंत्रणाच्या हँडलबारच्या डाव्या हाताला पेट्रोल भरण्यासाठी जागा असून उजव्या बाजूला असलेली इग्निशनच्या चावीच्या खाचेत असणारी चावीदेखील न बाहेर काढता पेट्रोल टँकचे झाकण उघडता येऊ शकते व स्कूटरवरून खाली न उतरता पेट्रोल भरता येऊ शकते. त्याचप्रमाणे स्कूटरला दिलेले चार्जरचे सॉकेट, वेग किती आहे, आरपीएम मीटर काय दर्शवितो व वेग इंधनबचतीसाठी योग्य आहे की नाही ते सांगण्यासाठी असलेल्या बहुरंगी प्रकाशाच्या डिजिटल मीटरमध्ये प्रकाशमान होणारा स्वतंत्र लाल रंग अशा सोयी खूप वेगळ्या आहेत. अर्थात इलेक्ट्रॉनिक गोष्टींमुळे शहरात त्या किती चांगल्या टिकतील तो विचार करायला हवा. भारतीय ग्राहकाच्या विद्यमान स्थितीतील वापरानुसार या बाबी खूप सांभाळून वापरण्याच्या ठरतात, कदाचित भविष्यात त्या खर्चिकही ठरू शकतात.   स्कूटरच्या आसनाखाली असलेली सामान व हेल्मेट ठेवण्याची जागा ऐसपैस असून उपयुक्त आहे. त्यात रात्रीच्यावेळी आतील वस्तू दिसावी यासाठी एलईडी दिवाही देण्यात आला आहे.  स्कूटरची बॉडी ही प्लॅस्टिक प्रकारातील असून त्यामुळे स्कूटरचे वजन कमी केले गेले आहे. त्यामुळे काही फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. मात्र नवीन काळानुसार स्कूटरचे वजन कमी होणे हे मायलेज चांगले मिळण्यासाठी पोषक मानले जाते. त्याचप्रमाणे हे प्लॅस्टिक झटकन बदलता येते. काही खराब झाल्यास त्यासाठी पत्र्याला रंगकामादी प्रक्रियेत जसा वेळ द्यावा लागतो तसा तो द्यावा लागणार नाही, बहुधा नवीन उत्पादन संकल्पनेतील ही संकल्पना रोडिओमध्येही देण्यात आली आहे. प्लॅस्टिक वापरूनही स्कूटर वजनाला तशी हलकी नाही, त्यामुळे रस्ता सोडून जाणार नाही, तशी रचना देऊन रोडिओचे आरेखन करण्यात आले आहे. मोठय़ा रस्त्यावर अवजड वाहन बाजूने गेले तरी रोडिओ वेगात असली तरी हलत नाही की रस्ता सोडत नाही.अर्थात स्कूटरच्या चाकाचा आकार (परिघ) पाहाता अतिवेगाऐवजी तो नियंत्रित स्वरूपात असणे महत्त्वाचे ठरावे.

तांत्रिक वैशिष्टय़े
इंजिन : डीसीडीआय इंजिन- झेड मालिका/ ४ स्ट्रोक, स्पार्क इग्निशन, १२४.६ सीएम (१२५ सीसी)  पुश बटन व किक स्टार्ट,
कमाल ताकद : ६ किलोव्ॉट- ७००० आरपीएम
कमाल टर्क : ९ एनएम-५५०० आरपीएम
लांबी/रूंदी/उंची/व्हीलबेस/ग्राऊंड क्लीअरन्स : १७९०/६५०/१११०/१२४५/१५४
इंधन टाकी क्षमता : ४.५ लीटर पेट्रोल
टायर : ३.५०-१० ४ पीआर ५१ किंवा
९०/१००-१०,५३
ब्रेक्स : मेकॅनिकल एक्स्पांडिंग शू टाईप १३० डायमीटर.
सस्पेंशन : फ्रंट – टेलिस्कोपिक व रेअर – स्विंग आर्म
फ्रेम : टय़ुब्युलर
ट्रान्समीशन : ऑटोमॅटिक
रंगसंगती : मिस्टिक वयोलेट, फ्लेम ऑरेंज, इलेक्ट्रिक ग्रीन, ऑनेक्सी ब्ल्यू, डर्बी रेड, फायरी ब्लॅक, पर्ल व्हाइट.
मूल्य : ४७ हजार ४११ (एक्स शोरूम – जकात, विक्री कर, नोंदणी, अतिरिक्त सामग्री यांची किमंत वेगळी)