एफ-वनपाठोपाठ गो-कार्टिगसारखा थरारक गाडय़ांच्या शर्यतीचा प्रकार भारतामध्ये पसरायला सुरुवात झाली असून, मुंबईच्या राजेश डिसुझाने नुकत्याच आबुधाबी येथील अल फॉर्सन कार्टवर झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. आबुधाबी येथील स्पर्धेत ८ विविध देशांचे ११० स्पर्धक सहभागी झाले होते, यामध्ये राजेशने १२वा क्रमांक पटकावला. यावेळी फक्त तीन सेकंदांच्या फरकाने त्याची अंतिम फेरी हुकली. १.२ कि.मी.ची फेरी पूर्ण करण्यासाठी राजेशने ७८.८५ सेकंदाचा अवधी घेतला. पुढच्या वर्षांत दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या शर्यतीत तो सहभागी होणार असून यावेळी अव्वल दहा क्रमांकांमध्ये यायचे त्याचे ध्येय असेल.