ड्रायिव्हग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. तुमचा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची.  मेल करा. ls.driveit@gmail.com

मी माझ्या ‘कार’कीर्दीसाठी भारतीय आयुर्वमिा महामंडळाचा आभारी आहे. मी गेली २२ वर्षे एजंट म्हणून काम करत आहे. माझी  ड्रायव्हिंगची पॅशन महामंडळामुळे जोपासली गेली. मी माझी पहिली टू व्हीलर हिरो होंडा स्प्लेंडर १९९८ साली घेतली. माझे ड्रायव्हिंग शिक्षक माझ्याच शेजारी राहणारे रिक्षा मेकॅनिक होते. माझे ड्रायव्हिंग पॅशन एवढे होते की, त्यांच्याबरोबर अवघे दोन-तीन दिवस शिकून मी पत्नी व पाच वर्षे वयाच्या माझ्या मुलाला ट्रॅफिकमध्ये गाडी घेऊन गेलो. मुंबईतील पहिला पाऊस सर्वाना आवडतो, पण माझ्या तो लक्षात राहिला माझ्या पहिल्या अपघाताने, कारण मुंबईतले काँक्रीटीकरण झालेले रस्ते वळणाच्या ठिकाणी अगदीच निसरडे झालेले असतात. वाहन कितीही सांभाळून चालवले तरीही ब्रेक लावताना टू व्हीलर घसरण्याची शक्यता खूपच. तरीदेखील मी ड्रायव्हिंग सफाईदारपणे करू लागलो. माझी पहिली कार मी २००४ साली घेतली ती होती मारुती अल्टो. माझा बालपणचा मित्र महेश व त्याची व माझी फॅमिली मिळून खूप फिरलो. त्या चार जण बसतील अशा गाडीत आम्ही सहा जण अगदी जमेल तसे अ‍ॅडजस्ट करून बसलो आणि फिरलो. मला सलग कितीही तास ड्रायव्हिंग करायला आवडते. त्यामुळे कधीकधी माझ्याबरोबर असलेल्यांची कुचंबणा व्हायची. माझ्या स्मरणात राहतील असे काही लाँग ड्रायव्ह म्हणजे सातारा ते वाशी साडेतीन तासांत पोहोचलो होतो. मी नंतर २०१२ मध्ये फोक्सवॅगनची व्हेंटो घेतली. या गाडीत असलेल्या खास वैशिष्टय़ांमुळे ही गाडी चालवणे एक अद्भुत आनंद देते. व्हेंटोची लाँग ड्राइव्ह मी मुंबई ते अहमदाबाद शताब्दीपेक्षा जास्त वेगाने पार केली आहे. अगदी नेमक्या शब्दांत सांगायचे तर, पाच तास ४५ मिनिटांत. हा किस्सा अगदी एखाद्या िहदी चित्रपटात झाल्यासारखा आहे. माझी पत्नी आणि मेहुणीची मुलगी दोघी शताब्दीने अहमदाबादला चालल्या होत्या. त्या दोघी घरातून निघाल्यावर मी व माझा मुलगा व्हेंटो घेऊन निघालो व त्या दोघी अहमदाबादच्या मेहुणीकडे पोहोचण्याअगोदर आम्ही त्यांच्या स्वागताला हजर झालो. अशी ही माझी ‘कार’कीर्द.
सुनील मोरे