वाहतुकीच्या रहदारीमध्ये बेशिस्त चालकाला दोष देणे हा आपल्या स्वभावाचा स्थायीभाव असतो, मग आपण चालक असू किंवा प्रवासी. पण प्रत्यक्ष वाहन चालविताना आपण उत्तम चालक आहोत हे कसे ओळखावे याचे काही निकष आहेत. या संबंधी अत्यंत सोपे, व्यवहार्य आणि सुलभ असे निकष तयार करण्यात आले आहेत. त्याविषयी..
१) वाहन चालविताना निघते वेळी आपण किती वेळ हाती राखून निघतो, याचे भान ज्या चालकाला असते तो चांगला चालक मानला जातो. म्हणजे, घरातून निघाल्यापासून गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी नेमका किती वेळ लागेल आणि वाहतूक सुरळीत नसल्यास तो वेळ कितीने वाढू शकेल याचा अंदाज असला म्हणजे वाहन चालविताना अनावश्यक वेग आणि वेळेत पोहोचण्याचा ताण टाळता येतो.
२) वाहन चालविताना, सामान्यपणे पाणी, प्रथमोपचारांची पेटी चालकाजवळ असणे गरजेचे आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत याचा मानसिक आधार तर असतोच पण गरजेला किंवा अडनिडय़ा ठिकाणी गाडी बंद पडल्याससुद्धा याचा उपयोग होऊ शकतो.
३) वाहन चालविताना भ्रमणध्वनी वापरू नये हे तर सर्वश्रुत आहेच. पण, वाहतूक ठप्प झालेली असताना किंवा सुरळीत नसताना हाच भ्रमणध्वनी उपयुक्त ठरू शकतो. आपण नेमके कुठे आहोत, का अडकलो आहोत आणि साधारण किती वेळात पोहोचू शकू याचा अंदाज आपण संबंधित व्यक्तीला कळविणे गरजेचे आहे. उत्तम चालक असण्याचे हे एक मुख्य लक्षण सांगितले जाते.
४) रस्त्यावर वाहन चालविताना आपल्याला नेमके कोठे वळायचे आहे याचे नेमके भान असणे, त्यानुसार योग्य वेळी डाव्या अथवा उजव्या लेनमध्ये वाहन चालविणे आणि लेन बदलताना योग्य ते संकेत – सिग्नल देणे गरजेचे आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा टाळता येतो.
५) वाहतूक खोळंबलेली असताना बऱ्याचदा आपण मिळेल त्या ठिकाणी ‘गाळलेल्या जागा भरा’व्यात तशी वाहने रेटत जातो. पण त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटणे राहिले दूरच उलट ती वाढत जाते. आपत्कालीन नियोजनातीलसुद्धा महत्त्वाचा नियम म्हणजे पर्यायी रस्त्यांच्या उपलब्धतेबाबत विचार करणे. त्यामुळे वाहतूक पूर्ववत होण्यास मदत होते.
६) वाहन चालविताना अन्य कोणाशीही स्पर्धा टाळावी. सहज, गंमत म्हणून अनेकदा साध्या रस्त्यावरही हा प्रकार सुरू असलेला आपल्याला दिसतो. एखाद्या मोकळ्या – महामार्गावर एक वेळ वेगाची स्पर्धा – शर्यत परवडू शकेल पण शहरी – गजबजलेल्या भागात अशी स्पर्धा फारशी हितावह नाही.
७) उत्तम चालक म्हणून आणखी एका गोष्टीचे भान राखणे गरजेचे आहे. विकसित देशांमध्ये हे भान राखलेही जात आहे. ते म्हणजे शक्यतो २ ते ४ किमी पर्यंतचे अंतर कापण्यासाठी सायकलचा वापर करावा आणि ज्या वाहनांमध्ये ४ जणांची आसनक्षमता आहे, असे वाहन किमान ३ जण त्यात बसलेले असल्याशिवाय रस्त्यावर चालवू नये. वरकरणी साधा वाटणारा हा मुद्दा. पण याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मुंबई-पुणे-नाशिकसारख्या शहरांत किमान एक तृतीयांश वाहने रस्त्यावर कमी उतरतील आणि स्वाभाविकच वाहतुकीचा खोळंबा टाळता येईल.