जवळपास तीन तास पंडित जितेंद्र अभिषेकीजी त्यांच्या शांत, हळू आवाजात तानसेनच्या जीवनावरील कादंबरीचं सर्व कथानक मला उलगडून दाखवत होते. दादर केव्हा आले, दोघांना कळले नाही. त्यांच्या सांगण्यातून एका आगळ्या-वेगळ्या कादंबरीचा पट मला स्पष्ट दिसत होता. मी म्हणालो, ‘‘पंडितजी, तुम्ही आता उशीर करू नका. आपण प्रथम ती ‘माणूस’ दिवाळी अंकात प्रसिद्ध करू आणि नंतर त्याचं पुस्तक तयार करू.’’ पंडितजींना कल्पना पसंत पडली. पण.. 

आपण वाचलेल्या पुस्तकांपैकी काही पक्की स्मरणात राहतात. बरीचशी विरून जातात. माझे पुस्तकांशी नाते तर वाचनापेक्षाही दाट. पुस्तकांचा शोध घेण्याचे आणि शोधातून हाती आलेली पुस्तके प्रकाशित करण्याचे काम. अशी प्रकाशझोतात आलेली पुस्तके सुरुवातीच्या काही दिवसांत तुम्हाला आनंद देतात, नंतर तीही हळूहळू धूसर व्हायला लागतात. पण आपण प्रयत्न करूनही काही ना काही कारणाने प्रकाशात न आलेली पुस्तके मात्र दीर्घ काळ असमाधान देतात. अधून-मधून टोकत-टोचत राहतात.

अशाच एका मला सतत टोकत राहणाऱ्या पुस्तकाची ही गोष्ट.

पन्नास वर्षे झाली या गोष्टीला. १९६६ हे र्वष होतं ते. मी नुकताच श्री.गं.च्या- माझ्या थोरल्या बंधूंच्या हाताखाली ‘माणूस’चे काम पाहायला लागलो होतो. मी आणि माझी मोठी बहीण कुमुद (निर्मला पुरंदरे) संपादकीय कामाबरोबर जाहिरातींचे कामही बघत होतो. पुणे, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद या गावी प्रवास करत होतो. अशाच कामासाठी आम्ही गोव्याला गेलो होतो. त्या वेळी गोव्याचे मुख्यमंत्री होते

दयानंद बांदोडकर. सगळे त्यांना ‘भाऊ’ म्हणायचे. गोवा लहान असल्याने भाऊंना भेटणे सहज शक्य होते. आमच्या पहिल्याच दीर्घ भेटीत आमचे मैत्र जमलं. भाऊ  मनाने अत्यंत दिलदार, वागायला साधे, अघळपघळ; पण तितकेच लहरी. अगत्याने पाहुणचार करणारे. नंतरच्या माझ्या गोव्याच्या प्रत्येक भेटीत त्यांच्याबरोबर माझे गप्पासत्र झडायचे.

एका संध्याकाळी भाऊसाहेबांच्या बंगल्यावर सुशेगात गप्पा चाललेल्या. आदल्याच दिवशी त्यांनी एक वाघाचा बछडा विकत घेतलेला होता. भाऊ  त्याच्याशी क्रिकेटचे ग्लोव्हज घालून खेळत होते. मी पाहत होतो. छातीचा ठोका चुकत होता. नंतर गप्पा शिकारीवर आल्या आणि नंतर गाण्यावर. ते म्हणाले, ‘‘तुम्ही जितेंद्र अभिषेकी नावाचा तरुण गायक ऐकलाय का?’’ त्या सुमारास पुण्या-मुंबईत जितेंद्रचे नाव कानावर यायला लागले होते. हे मी त्यांना सांगितले. म्हणाले, ‘‘त्याची नवीन रेकॉर्ड आलीय, ती मी तुम्हाला ऐकवतो.’’ ती ऐकत असताना भाऊ  त्याची तोंडभरून तारीफ करत होते. त्याचा आवाज, त्याची समज.. त्याच्या गाण्यातील विविधता.. भाऊसाहेब थांबायलाच तयार नव्हते. मी गोव्याहून आलो ते जितेंद्रंना काना-मनात घेऊनच.

गमतीचा योगायोग म्हणजे त्यानंतर काही दिवसांनी मी कामासाठी शांताबाई शेळके यांना भेटलो. त्यांच्याशी झालेल्या गप्पात जितेंद्रचा विषय निघाला. शांताबाई म्हणाल्या, ‘‘अहो, जितेंद्र अभिषेकी फार उत्तम कथाकार आहेत, पण फार लिहीत नाहीत. त्यांना लिहितं करा!’’ असे म्हणून त्यांनी ‘वसुधा’ मासिकाचे दोन अंक मला दिले. त्यात जितेंद्रच्या कथा होत्या. कथा फार छान होत्या आणि केव्हा तरी दिवाळी अंकासाठी त्यांना भेटायचे माझ्या मनाने घेतले. त्यानंतर वर्षभरात मी पुन्हा गोव्याला गेलो. भाऊंची भेट झाली. जेवणानंतर गप्पा सुरू झाल्या. त्या ओघात मी म्हणालो, ‘‘भाऊ, तुम्ही मागच्या भेटीत जितेंद्र अभिषेकींबद्दल बोलला होतात ना. त्यांचं गाणं ऐकलं बरं का – फार सुरेख आवाज आहे..’’ मला अध्र्यावर तोडत भाऊ  म्हणाले, ‘‘अहो, त्या जितेंद्रचं काय घेऊन बसलात? आमच्या प्रभाकर कार्येकरांचं गाणं ऐका. जितेंद्र पार विसरून जाल. अहो, प्रभाकरचा आवाज फार तडफदार आहे. समज तर विलक्षण आहे.’’ जितेंद्र अभिषेकीला एकदम कोपऱ्यात टाकून भाऊंनी प्रभाकर कार्येकरांचं कौतुक सुरू केलं. हा अनपेक्षित बदल पाहून मी अवाक् झालो. काहीसा अस्वस्थही. भाऊंना हे विचारणे शक्य नव्हते, पण मनात शंका छळत राहिली. हा बदल का? कसा?

नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जितेंद्र अभिषेकी आता ‘पंडित जितेंद्र अभिषेकी’ झाले होते. हे नाव संगीताची विविध क्षेत्रे व्यापून टाकत होते. याच दरम्यान भाऊ  गेले. माझ्या गोव्याच्या फेऱ्या थांबल्या.

मध्ये दहा वर्षांचा काळ उलटला.

एक दिवस मी डेक्कन क्वीनने मुंबईला निघालो होतो. माझ्या समोरची जागा रिकामी होती. गाडी सुटता सुटता एक प्रवासी घाईघाईने डब्यात शिरला आणि माझ्या समोरच्या सीटवर येऊन बसला. पाहातो तो दस्तुरखुद्द पंडित जितेंद्र अभिषेकी! गाडी सुरू होऊन थोडे स्थिरस्थावर झाल्यानंतर मी आपण होऊन माझी ओळख सांगितली. गप्पा चालू झाल्या. पण पूर्ण वेळ माझ्या डोक्यात ‘तो’ विषय घणघणत होता. ‘हा अचानक बदल का?’

अखेर न राहवून मी पंडितजींना विचारले, ‘‘तुम्ही रागावणार नसाल, तर मला एक शंका विचारायची आहे.’’ त्यांचा होकार घेऊन मी त्यांना पंधरा वर्षांपूर्वीचा भाऊसाहेब बांदोडकरांचा प्रसंग सांगितला. सहा महिन्यांत बांदोडकरांच्या बोलण्यात झालेल्या आश्चर्यकारक बदलाचाही उल्लेख केला.

जितेंद्र माझ्याकडे पाहून काहीसे खिन्न हसले. म्हणाले, ‘‘दिलीपराव, तुम्हाला त्या बदलाचं जेवढं आश्चर्य वाटतं, तेवढं मला वाटत नाही. तो बदल का झाला, ते मी तुम्हाला सांगतो.’’

‘‘माझ्या गाण्याच्या सुरुवातीच्या काळात भाऊंनी मला खूप मदत केली. सगळ्या प्रकारची केली. पैशांपासून छोटय़ा-मोठय़ा मैफिली करण्यापर्यंत. त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. त्यांच्याबद्दल, त्यांच्या दिलदार स्वभावाबद्दल मला आजही खूप आदर आहे. पण एक अशी घटना घडली, जिच्यामुळे ‘भाऊसाहेब बांदोडकर एक सत्ताधारी मुख्यमंत्री’ आणि ‘मी एक कलावंत’ यात अंतर पडलं.’’

‘‘मी एका मैफिलीत गात होतो. गाणं ऐन रंगात आलं होतं आणि अचानक भाऊ आले. साहजिकच लोकांनी त्यांना वाट करून दिली. भाऊ  माझ्यापुढे येऊन बसले आणि रंगलेल्या बैठकीत अचानक तंबोऱ्याची तार तुटावी अन् सारं बेसूर व्हावं, तसे भाऊ  भर मैफिलीत मला थांबवत मोठय़ांदा म्हणाले, ‘अरे, हे बंद कर आणि ते अमुकतमुक गा बरं.’ माझी सुरू असलेली बंदिश पूर्ण झाल्यावर त्यांनी काहीही सांगितलं असतं, तर मी आनंदानं ते गायलो असतो. पण आपण जितेंद्रला मदत करतो, त्या उपकाराच्या तो ओझ्याखाली आहे; आता त्याच्या गाण्यावर आणि गळ्यावरही आपलाच अधिकार आहे – असं काहीसं त्यांना श्रोत्यांना दाखवून द्यायचं होतं की काय कोण जाणे? मला तो माझा अपमान वाटला. मी ठाम स्वरात म्हणालो, ‘भाऊ, ही चीज पुरी करतो आणि नंतर ते गातो.’’

‘‘भाऊंना ते आवडलं नाही. त्यांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसली. ते ताबडतोब बैठक सोडून निघून गेले. त्यानंतर माझ्याशी बोलणं-भेटणं त्यांनी बंद केलं. तोडूनच टाकलं सारं.’’ नंतर जितेंद्र किती तरी वेळ स्तब्ध बसून होते. पुढे बऱ्याच वेळाने मला म्हणाले, ‘‘दिलीपराव, खूप काळ माझ्या मनात एक विषय घोळतोय. आज तुम्ही हा विषय काढलात, म्हणून पुन्हा तो डोक्यात आला.’’

‘‘बहुतेक सर्व सत्ताधीश कलाकाराला आपल्या मर्जीप्रमाणे, लहरीपणे वागवतात. त्यांची लहर असेल, तोवर तो मोठा. त्यांची मर्जी फिरली, की त्यांच्या लेखी तो शून्य, नगण्य. काल राजे-महाराजे, संस्थानिक सत्ताधीश होते. आजच्या काळात त्यांची जागा नेते, राजकारणी आणि उद्योगपती यांनी घेतलीय. यात काही अपवाद असतीलही. पण बहुतेकांची मानसिकता हीच. त्यांना कलाकारांबद्दल प्रेम नसतं, असं नाही. त्यातल्या काहींना कलेची जाणही असते. पण हे प्रेम, ही जाण, ही कदर ही प्रत्येक वेळी कलेच्या वा कलावंताच्या भल्यासाठी नसते. त्यांचे वेगळेच हिशेब चालू असतात. आपल्या मनातला हेतू पुढे रेटण्यासाठी या कलावंताचा, त्याच्या कलेचा कसा उपयोग करून घेता येईल, याकडेच त्यांचं लक्ष असतं.’’

‘‘हा सारा विषय मला एका कादंबरीतून मांडायचाय. कारण हे आज नाही इतिहासकाळापासून चालू आहे. मला तानसेनच्या जीवनावर एक कादंबरी लिहायचीय. मी त्याचं चरित्र आणि त्याचा काळ याचा अभ्यास केलाय आणि अजून करतोय. अर्थात लेखी कागदपत्रे आणि पुरावे फारसे अजून मला मिळाले नाहीत. मी कथा-दंतकथा-आख्यायिका यांचा आधार घेणार आहे. पण सत्ताधीश आणि कलाकार यांचं नातं या सूत्राभोवतीच माझी कादंबरी फिरणार हे निश्चित. मी थोडक्यात तुम्हाला कादंबरीचं कथानक ऐकवतो. कसं वाटतंय सांगा. यात पुढे खूप बदल होतील. पण मूळ सूत्र तेच राहील.’’

मध्ये एक चहा झाला. पंडितजींनी बैठक जमवली आणि बोलायला सुरुवात केली. ‘‘तानसेनला आपण ओळखतो अकबर बादशहाच्या दरबारातला एक राजगायक म्हणून. अकबराच्या नवरत्नांपैकी एक. पण दिल्ली दरबारात येण्यापूर्वी तो बुंदेलखंडाच्या राजाच्या पदरी होता. तो मूळचा खेडय़ातला. तिथेच लहानाचा मोठा झाला. तिथल्या गायनशाळेत शिकू लागला. हळूहळू साऱ्यांच्या लक्षात यायला लागलं, की याला दैवी गळ्याची देणगी आहे. गायनशाळेत शिकवलं जाणारं संगीत तर त्याच्या गळ्यात उपजत होतं. हळूहळू त्याचं नाव व्हायला लागलं आणि त्याची कीर्ती राजाच्या कानावर गेली. आपल्या संस्थानातील एका छोटय़ा खेडय़ात एक लोकविलक्षण गळ्याचा लहान मुलगा गाणं शिकतोय, हे राजाला समजलं आणि त्यानं त्या मुलाला दरबारात गाण्यासाठी बोलावलं. त्याचं गाणं ऐकलं. राजा प्रभावित झाला. त्यानं तानसेनला पुढच्या शिक्षणासाठी स्वामी हरिदासजींच्याकडे सोपवलं. हळूहळू संस्थानात ठिकठिकाणी तानसेन गाऊ  लागला आणि त्याच्या गाण्याची कीर्ती दिल्लीत मोगल दरबारी पोचली. इतका गुणी गायक बुंदेलखंडासारख्या छोटय़ा संस्थानाचा गायक असण्यापेक्षा त्यानं आपल्या दरबाराची शान वाढवावी, असं अकबराच्या मनानं घेतलं. आपल्या मनातली इच्छा त्यानं बुंदेलखंडाच्या राजाला कळवली, ‘तानसेनसारखा मोठा गवयी जर मोगल दरबाराचा राजगायक बनला, तर मोगल दरबाराचं मोल वाढेलच; पण तानसेनचं नाव साऱ्या हिंदुस्थानभर दुमदुमेल!’’

‘‘बुंदेलखंडाच्या राजालाही तानसेनचं मोल ठाऊक होतं. हा कलावंत म्हणजे आपल्या दरबाराचं भूषण आहे, हे तो जाणून होता. अकबराला त्यानं उत्तर पाठवलं, ‘शहेनशहांनी एक वेळ माझं मस्तक मागितलं तर मी देईन; पण कृपया तानसेनची मागणी करू नये.’’

‘‘अकबर मोठा धूर्त आणि मुत्सद्दी राज्यकर्ता. त्यानं उत्तर पाठवलं, ‘जशी तुमची मर्जी. तानसेनऐवजी तुमचं मस्तक पाठवून द्यावं.’ या उत्तरामागचा उपहास आणि गर्भित धमकी बुंदेलखंडाच्या राजानं ओळखली. तानसेनची रवानगी मोगल दरबारात केली. तानसेनला स्वत:ला काय हवंय, याचं सोयरसूतक ना बुंदेलखंडाच्या राजाला, ना अकबर बादशहाला!’’

‘‘तानसेन मोगल दरबारात दाखल झाला. अकबराच्या नवरत्नांपैकी एक म्हणून ओळखला जाऊ  लागला. साऱ्या हिंदुस्थानभर त्याची कीर्ती पोचली. त्यानं गायलेल्या दीप राग, मेघमल्हार राग याच्याभोवती कथा-कहाण्यांचं, दंतकथांचं वलय तयार होऊ  लागलं. त्यातल्या काही मी कादंबरीत वापरण्याचा विचार करतोय.’’

‘‘एक दिवस बादशहानं तानसेनला बोलावणं पाठवलं आणि त्याला म्हणाला, ‘तुझं हे हिंदुस्थानी संगीत थोर आहेच. श्रेष्ठ  आहे. पण माझे पूर्वज ज्या ठिकाणाहून आले, ‘तिथे’ही एक वेगळ्या जातकुळीचं संगीत आहे. काबूल, समरकंदच्या प्रदेशातली ही सुरावट आहे. तिथलं संगीत भिन्न आहे. माझी अशी इच्छा आहे, की तू या दोन्ही संगीत प्रकारांचा मिलाफ घडवून आणावास. त्यातून निर्माण होणारं संगीत अगदी वेगळं, अभिनव आणि अद्भुत असेल. हे फक्त तूच करू शकतोस, कारण तुला दैवी गळा लाभलाय.’’

‘‘तानसेनला हे मोठं आव्हान वाटलं. त्याच्या गळ्यात स्थिरावलेलं हिंदुस्थानी संगीत आणि दूरच्या प्रदेशातून येणारे, नवखे असणारे, तरी काहीसे ओळखीचे भासणारे सूर, त्याला साद घालू लागले आणि त्यानं या मिलाफाला होकार दिला. दोन्ही बाजूंच्या संगीताचा बेमालूम मिलाफ घडवून तो नव्या संगीतरचना करू लागला. आजही गायले जाणारे ‘मियाँ की तोडी’, ‘मियाँ का मल्हार’ हे राग म्हणजे तानसेनच्या प्रतिभेचं आपल्याला घडणारं साक्षात दर्शन. हे मिलाफी संगीत गाता गाता एक दिवस तानसेनला बादशहाच्या खऱ्याखुऱ्या उद्दिष्टातले कणसूर जाणवू लागले.’’

‘‘तुम्हाला निर्वेध राज्य करायचं असेल, तर तुमचं राज्य तुमच्या प्रजेला ‘आपलं’ वाटायला हवं. ‘बाहेरून आलेल्या बाबरा’चा नातू ही ओळख मिटून जाऊन ‘आपल्यासाठी आपल्यातला’ – अकबर अशी ओळख कोरली जायला हवी. हे व्हायला हवं असेल, तर त्यासाठी केवळ तलवारीची धार पुरेशी नाही. जास्त जरूर आहे सांस्कृतिक फरक दूर करण्याची. धर्माचा फरक सहजासहजी मिटणारा नाही; पण आपल्याला साहित्य, संगीत, कला, आर्किटेक्चरची इथे देवाण-घेवाण तर करता येईल ना! अकबराला तानसेन हवा होता, त्याचं गाणं हवं होतं; ते राज्यकर्ता म्हणून शासनकर्ता म्हणून असलेली स्वत:ची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी. कारण आता तो त्याचा दरबारी गायक होता. तानसेनवर, त्याच्या गळ्यावर आणि त्याच्या गाण्यावर आता अकबराचा अधिकार होता.’’

पंडितजी सांगत होते, ‘‘हे मला सगळं कादंबरीच्या अंगानं मांडायचं आहे. कितपत जमेल, ते सांगता येत नाही. कादंबरीचा शेवट मला सुचतोय, तो असा-

आता तानसेन म्हातारा झालेला आहे. आपण बादशहाच्या आग्रहापोटी काय करून बसलो, याचा त्याला विषाद वाटतोय. तो दु:खी आहे. आपला मूळ गळा आपण गमावून बसलो, आपलं मूळ गाणं आपण हरवून बसलो – ही जाणीव त्याला अस्वस्थ करते आहे. अखेर अशा निराश, पराभूत अस्वस्थतेत तो दिल्ली सोडतो. मजल-दरमजल करत त्याच्या मूळ गावी परततो. तिथेच आपलं उरलेलं आयुष्य घालवायचं ठरवतो. एका पहाटे त्याला जाग येते ती एका वृद्ध बाईच्या भजनानं. तो उठतो. त्या आवाजाच्या दिशेनं चालत चालत नदीकाठी पोचतो. तिथे एक म्हातारी एकतारीवर भजन म्हणत असते. त्याला साक्षात्कार होतो, हा आपला मूळ आवाज आहे. हे आपलं मूळ हिंदुस्थानी शुद्ध संगीत आहे. तो त्या म्हातारीला विचारतो, ‘बाई, हे गाणं तुम्ही कुठे शिकलात? कोणी शिकवलं तुम्हाला?’ म्हातारी म्हणते, ‘कोणी नाही. माझा एक भाऊ  होता. तानसेन नाव होतं त्याचं. तो लहानपणी हे घरी गायचा. पुढे तो दिल्ली दरबाराचा मोठा गायक झाला. आम्हाला विसरला. त्याची आठवण आली, की मी हे भजन गाते.’ इथे मी कादंबरी संपवेन, असं म्हणतोय. या कहाणीत खरा इतिहास किती, दंतकथा किती आणि माझा कल्पनाविलास किती हे मला नाही सांगता येणार. पण जेव्हा जेव्हा मला भाऊंची आणि माझी शेवटची भेट आठवते, तेव्हा तेव्हा ही तानसेन कादंबरी मनात उसळी मारू लागते.’’

जवळपास तीन तास पंडितजी त्यांच्या शांत, हळू आवाजात हे सर्व कथानक मला उलगडून दाखवत होते. दादर केव्हा आले, दोघांना कळले नाही. त्यांच्या सांगण्यातून एका आगळ्या-वेगळ्या कादंबरीचा पट मला स्पष्ट दिसत होता. मी म्हणालो, ‘‘पंडितजी, तुम्ही आता उशीर करू नका. आपण प्रथम ती ‘माणूस’ दिवाळी अंकात प्रसिद्ध करू आणि नंतर त्याचं पुस्तक तयार करू.’’ पंडितजींना कल्पना पसंत पडली.

मी विचारले, ‘‘कधी सुरुवात करताय बोला?’’

‘‘दिलीपराव, तुमची आस्था आणि कळकळ मी समजू शकतो. पण मी पडलो गवयी. थोडीफार कथाकारी केली असली, तरी मी लेखक नाही. रियाझ, मैफिली यातून कागदाला पेन लावायला आणि बैठक मारून लिहायला फुरसत मिळणं अवघड.’’

‘‘पंडितजी, एक मार्ग सुचवतो. पहा, पटला तर. मी तुम्हाला लेखनिक देतो. तुम्ही आठवडय़ातले दिवस ठरवा. त्या वेळी हे लेखनाचं काम करा.’’

पंडितजींना हा उपाय पटला. माझ्या नजरेसमोर माझी भाची, माधुरी पुरंदरे हे नाव आले. ती पंडितजींकडे गाणे शिकत होतीच. त्यांना हे नाव एकदम मान्य झाले. आम्ही दोघांनी दादरच्या एका सार्वजनिक टेलिफोन बूथवरून माधुरीला फोन केला. दुसऱ्याच दिवशी माधुरी मुंबईत आली. ठरल्या वेळी माधुरी आणि मी पंडितजींच्या घरी गेलो. ते तयार होतेच. सर्व कल्पना सविस्तर बोलून झाली. लिहायला सुरुवात करणार, इतक्यात बाहेरून हाक आली, ‘‘काय पंडितजी, आहात का घरी?’’

पाठोपाठ एक प्रसिद्ध गीतकार आले. त्यांच्या गाण्यावर पंडितजींचे काम चाललेले असावे. त्यांच्या गप्पा रंगू लागल्या. तसे मी आणि माधुरीने ओळखले, आजचा दिवस गेला. आम्ही उठलो. पुढची वेळ ठरली. पुन्हा माधुरी त्यांच्या घरी गेली. पुन्हा नवी अडचण. वेळेचा वायदा पुन:पुन्हा होत होता. पंडितजींना मनापासून हे लेखन करायचे आहे, हे कळत होते, पण काही ना काही कारणाने या लिखाणला मुहूर्त काही लागला नाही. लिहिणे प्रत्यक्षात झालेच नाही.

कदाचित हेही संगीताच्या मौखिक परंपरेला साजेसेच म्हणायचे. पंडित जितेंद्र अभिषेकी या प्रतिभावान कलावंताच्या तोंडून डेक्कन क्वीनमध्ये ऐकलेली कादंबरी डेक्कन क्वीनमध्येच राहिली..

rajhansprakashaneditor@gmail.com   

(((   सई परांजपे, जयंत नारळीकर यांच्या समवेत दिलीप माजगावकर.   )))