‘‘माझ्या हातून क्वचितच एखादं व्यंगचित्र ‘वेगळं’ तयार होतं. ते श्रेष्ठ की निकृष्ट ही इतरांनी ठरवायची बाब. असं चित्र जेव्हा तयार होतं, पूर्ण होतं आणि त्या चित्रापासून थोडा दूर जाऊन मी त्याच्याकडे पाहतो तेव्हा ते त्याच्या शब्द नसलेल्या भाषेत मला दाद देतं. एरवी हजारो प्रेक्षकांच्या टाळ्या ऐकून रंगमंचावरच्या कलाकाराला जे वाटेल त्यापेक्षा मोठा अनुभव माझ्या चित्राची नि:शब्द दाद मला देतं. दाद देण्याघेण्यातला ‘व्यवहार’ ज्या क्षणी संपतो त्यानंतर होणाऱ्या कशातही मी हजर नसतो.

शेवटच्या बॉलवर सिक्सर मारून विजेत्याच्या आनंदात पॅव्हेलियनमध्ये आलेल्या बॅट्समनला ‘ही सिक्सर तू कशी मारलीस?’ हा प्रश्न विचारून पाहा. ‘मला माहीत नाही’ एवढंच त्याचं इमानदारीनं दिलेलं उत्तर असेल. क्रिकेट इतकंच कलेच्या प्रांतात कुणी ‘फुलहार्टेडली’ उत्तर देणारं असेल तर हातून घडलेल्या असाधारण आविष्काराबद्दल हे एवढंच उत्तर मिळेल. ‘माझ्या हातून घडलं हे खरं आहे; पण ते मी केलं म्हणायला कोणताही आधार सापडत नाही. ते झालं, एवढंच खरं आहे. जे काही थोडं बहुत ‘वेगळं’ झालं त्याच्यावर मालकी हक्काला मी अद्याप आधार शोधतो आहे. एकही सापडत नाही. माझ्या हातात कुणी तरी चप्पल सुपूर्द करतो. त्या चपलेला मी माझ्या वकुबाप्रमाणे शिवण टाकतो. ज्याची त्याला परत करतो. शिवून देणाऱ्याला त्या चपलेवर मालकी हक्क कसा सांगता येईल? टाकलेल्या शिवणीवरसुद्धा हक्क सांगता येत नाही, कारण चपलेच्या मालकाने मला त्याचा मोबदला पूर्णपणे दिलेला असतो. माझ्या जगण्याच्या वाटचालीत एखादी वस्तू वाटेत सापडते. माझ्या हाताने मी ती उचलून घेतो. ती इतर कुणाचीही असेल अथवा कुणाचीसुद्धा नसेल; पण ती माझी नाही. निश्चित नाही या वास्तवातून बाहेर पडण्याचा मार्ग मला अजून तरी सापडलेला नाही.
भ्रमात राहण्याच्या अवस्थेतून मी केव्हाच पलीकडे गेलो. माझ्या बुद्धीला जे जाणवतं तेवढंच कदाचित असेल तर माझ्यापुरतं खरं असू शकेल या निष्कर्षांच्या काडीचा आधार घेऊन गटांगळ्या खात का होईना मी जगतो आहे. माझ्या हातून क्वचितच एखादं व्यंगचित्र ‘वेगळं’ तयार होतं. ते श्रेष्ठ की निकृष्ट ही इतरांनी ठरवायची बाब. असं चित्र जेव्हा तयार होतं, पूर्ण होतं आणि त्या चित्रापासून थोडा दूर जाऊन मी त्याच्याकडे पाहतो तेव्हा ते त्याच्या शब्द नसलेल्या भाषेत मला दाद देतं. एरवी हजारो प्रेक्षकांच्या टाळ्या ऐकून रंगमंचावरच्या कलाकाराला जे वाटेल त्यापेक्षा मोठा अनुभव माझ्या चित्राची नि:शब्द दाद मला देतं. दाद देण्याघेण्यातला ‘व्यवहार’ ज्या क्षणी संपतो त्यानंतर होणाऱ्या कशातही मी हजर नसतो. चितारलेलं चित्र असतं. शरीराने माझं अस्तित्व इतरांना दिसत असेलही तिथे. असा अनुभव देणारं एक चित्र आणि ते तयार होण्यापूर्वी काय घडलं ते इथे जसंच्या तसं सांगून टाकतो. या चित्रावर माझा मालकी हक्क कसा नाही हे तेव्हा घडलेल्या प्रसंगातून कुणालाही स्पष्टपणे पाहता येईल. त्यातून कुणालाही एखादी वैचारिक पळवाट सापडलीच तर मला जरूर सांगा. मी अद्याप ती शोधतोय.. त्याचं झालं असं. मी रात्री साडेअकरानंतरच्या सामसूम वातावरणात माझ्या ड्रॉइंग बोर्डसमोर बसतो. कानाची हिअरिंग एड काढून ठेवतो. पूर्ण शांतता प्रस्थापित होते. हातात ब्रश नसतो. बोर्डवर ड्रॉइंगपेपर नसतो. या सर्व गोष्टी नंतर येतात. नाटकात आधी पडदा उघडतो. मग लाइट्स येतात. मग सेट दिसतो. नंतर पात्रं प्रवेश करतात तसंच इथे होतं. ड्रॉइंग बोर्ड समोर, खुर्चीत मी काही काळ असाच शांत, नि:शब्द वातावरणात बसलो होतो त्या रात्री. पावणेबारा वाजून गेले असावेत. आणि अचानक आमच्या डहाणूकर कॉलनीतले लाइट्स गेले. पूर्ण काळा ठार अंधार आसमंत भरून राहिला. मी स्वत:सुद्धा स्वत:ला दिसत नव्हतो. त्यात डेड सायलेन्स. ही परिस्थिती किती काळ राहणार कळत नव्हतं. अशा परिस्थितीत इतर कुणाचंही झालं असतं तेच माझं झालं. विचारांच्या अडगळीत एक अनुत्तरित प्रश्न पडला होता तो समोर आला.
1
इतक्या अंधारात मी स्वत:च स्वत:ला दिसत नाही. कसला आवाजही ऐकू येत नाही. तरीसुद्धा मी जिवंत आहे असं मला का वाटतं आहे? तशा काळोखात या प्रश्नाच्या मागे, सुसाटत मी पार क्षितिजापर्यंत जाऊन आलो. उत्तर सापडलं नाही. यात नेमका किती वेळ गेला कुणास ठाऊक. आणि अचानक दिवे आले. लख्ख प्रकाश पडला आणि ज्या वॉर्डरोबच्या खणात मी ड्रॉइंगपेपर ठेवतो तिथून पेपर काढण्यासाठी मी वॉर्डरोबचं दार उघडलं. आत कुठे तरी ठेवलेला एक मोठ्ठा काळा ठार टिंटेड पेपर दार उघडताक्षणीच उंचावरच्या खणातून हवेत हेलकावत माझ्या पायाशी येऊन विसावला. वटवाघूळ येऊन जमिनीवर बसावं तसा. मघाशी मी काळोखात शोधत होतो त्या प्रश्नाचं उत्तर या काळ्या ठार टिंटेड पेपरमध्ये सापडतं का पाहू या तर खरं! हे असले उपद्व्यापी विचार का आणि कुठून येतात नाही माहीत मला. मी तो काळा टिंटेड पेपर बोर्डवर अडकवला. नेहमीप्रमाणे कुठून कुठे जायचं हे अजिबात न ठरवता टेक ऑफ घेतला. त्या काळ्या पेपरवर उजव्या हाताच्या खालच्या कोपऱ्यात एक तिरका एलिप्टिकल फटकारा मारला. माझ्या हातातल्या ब्रशने त्यांची पणती केली. इवलीशी वात तेवत असलेली. ती तिरकी पणती काळ्या कागदावर दुरून पाहताना मला ती काळोखाच्या लाटांत हिंदकाळणारी होडी वाटायला लागली. मग त्या होडीत मागच्या बाजूला मी बसलेला चितारलो गेलो. कोणतंही कारण नव्हतं. या सगळ्याचं काय करायचं तेही लक्षात येत नव्हतं. मघाच्या ब्लॅकआऊटमधल्या अंधारात मी कसा डोळे विस्फारून बघत असेन ते एक्स्प्रेशन माझ्या चेहऱ्यावर ट्रान्सप्लांट झालं. होडीतला मी म्हणजे हातात वल्हं असायला हवं. तेही चितारलं. त्या वल्ह्याचा फ्लॅट ब्रश मला समजायच्या आत होऊनसुद्धा गेला. (चित्र क्रमांक १) या अनुक्रमाने हे होत गेलं. ठरवून, विचार करून काळजीपूर्वक यातलं काही घडलं नाही. जे चित्र झालं त्यात बालपणी अनुभवलेल्या कोल्हापुरातल्या रॉकेलच्या कंदिलाच्या पिवळ्या उजेडातल्या अंधाराचा समावेश झाला. कदाचित तेव्हा जमिनीवर ठेवलेल्या कंदिलाच्या उजेडात माणसं कशी दिसत, त्यांच्या भिंतीवर वावरणाऱ्या प्रचंड सावल्या कशा दिसत त्याचा समावेश अनवधानाने झाला असावा. त्या वेळच्या धास्तीचे अवशेष आजही माझ्या मनात आहेत कुठे कुठे. अडगळीत पडलेले.
हे चितारलेलं चित्र मी जेव्हा थोडं दूर होऊन पाहिलं तेव्हा मीच दचकलो. कुठून आलो, कुठे आहे आणि कुठे जाणार हे काहीच लक्षात न येणाऱ्या काळ्याकुट्ट अंधारात मला केव्हा तरी काही तरी ‘दिसेल’ म्हणून डोळे फाडफाडून बघणारा मी या अंधाराला मागे ढकलत कुठे तरी जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणूनच मी जिवंत असण्याची खात्री मला पटते आहे! मला मी दिसत नसताना काळ्याकुट्ट अंधारातसुद्धा पटते आहे!
या चित्राच्या रूपाने हे उत्तर मला सामोरं आलेलं पाहून मीच हादरलो, भूत दिसावं तसा आणि दुसऱ्या क्षणी या चित्राने मला भरभरून दाद दिली. मला जवळ घेऊन डोक्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवून मनापासून दाद दिली. हे चित्र माझ्या हातून चितारलं गेल्याचा उदंड आनंद माझा आहेच. फक्त माझा हक्काचा आहे! मात्र या निर्मितीचा मालक मी आहे याला आधार कुठे आहे? दाखवता मला? याचा मालक कुणीही असेल किंवा कुणीसुद्धा नसेल. पण मी निश्चित नाही!
व्यंगचित्र या माध्यमाशी आयुष्यभर खेळ करत बसलो. प्रयोग करत बसलो म्हणण्यात अर्थ नाही. गंभीर विचार, मनन, चिंतन, वाचन, अनुभव या सगळ्याच्या आधाराने प्रयोग केले जातात. मी यातलं काहीही केलेलं नाही. माझ्याकडे चित्रकलेचं कोणतंही क्वालिफिकेशन नाही. कुणी माझा गुरू होण्याचं धाडस दाखवलं नाही. उत्तम झालं. मार्गातला एकेक अडथळा पार करत वाटचाल घडली. उशीर लागला. पण माझी पाऊलवाट तयार झाली. प्रस्थापित हमरस्त्याने गेलो नाही. हातात आलेल्या माध्यमाशी खेळत बसलो ते यातून घडलं. व्यंगचित्रकार वगैरे होण्याच्या महत्त्वाकांक्षेशिवाय ही वाटचाल घडली. या खेळ करण्यात केव्हा तरी लक्षात आलं की, व्यंगचित्र ही स्वतंत्र भाषा आहे. भाष्य असेल तर भाषेत जे जे काही करता येतं ते व्यंगचित्रातून करता आलं पाहिजे. भाषेत फक्त विनोद, टीका, थट्टा करता येते असं नाही. यापलीकडच्या अनेक गोष्टी- म्हणजे काव्यात्म आशय, वैचारिक सिद्धांत, भावनांचा आविष्कार, मनोव्यापार असं सर्व काही भाषेतून व्यक्त करता येतं. व्यंगचित्र ही स्वतंत्र भाषा आहे. हे मला वाटणं खरं असेल तर या सर्व गोष्टी त्या व्यंगचित्रातून व्यक्त करता आल्या पाहिजेत, या निष्कर्षांपाशी माझं व्यंगचित्र या माध्यमाशी ‘खेळणं’ सुरू झालं.
2
आजूबाजूच्या जगात माणसांमध्ये वावरताना मला स्पष्टपणे असं जाणवलं की, प्रत्येक माणसात एक श्वापद लपून बसलेलं आहे. ते सहसा पृष्ठभागावर येत नाही. बाहेरच्या भीती, धास्तीमुळे ते माणसाच्या आत लपून बसतं. मात्र जवळपास कुणी दखल घेणारं अस्तित्वातच नाही अशी निर्भय परिस्थिती जरा निर्माण झाली की ते डोकं वर काढतं. मनसोक्त धुमाकूळ घालतं आणि कुणी दखल घेण्याच्या आता माणसामध्ये जाऊन पुन्हा गुपचूप लपून बसतं. याला कुठेही कुणाचा अपवाद मला सापडला नाही. हे मला जे काही सापडलं ते व्यंगचित्रातून व्यक्त करता येतं का याचा उपद्व्याप केला. त्यातून हे माणसांच्या पावलांचं चित्र तयार झालं. (चित्र क्र. २)माणसाच्या पाऊलखुणा, मध्येच श्वापदाचं बागडणं आणि पुन्हा माणसाच्या पाऊलखुणा, फक्त पाऊलखुणांतून माणसाबद्दल एवढा मोठा आशय शब्दांशिवाय सांगणारं व्यंगचित्र यात तयार झालं. ‘‘पाहणाऱ्याला हसविण्याच्या उद्देशाने चितारलेलं ते व्यंगचित्र ही व्यंगचित्राची सरळ सोपी व्याख्या. स्वत:ला उत्क्रांत, प्रगत सर्वश्रेष्ठ वगैरे समजणाऱ्या माणसाला ही परिस्थिती हसवणारी नाही असे कोण म्हणेल. अगदी भयाण गंभीरपणे या वास्तवाला सामोरं गेलं तरी आतलं श्वापद मरणार थोडंच आहे. स्वत:मधल्या श्वापदाचं अस्तित्व यातून स्वीकारता आल्यास – हसून स्वीकारता आल्यास त्यावर निदान थोडंबहुत नियंत्रण तरी प्रस्थापित करता येईल. हा एकूणच गंभीर आशय व्यक्त करतं आहे एक व्यंगचित्र!
शब्दांतून मनाच्या अवस्था, संवेदना व्यक्त करता येतात. काही यातूनच जन्माला येतात. अत्यंत जवळच्या, अगदी रक्ताच्या नात्यातल्या दोन व्यक्ती प्रयत्नांची पराकष्ठा करतात, पण एकमेकांना समजू शकत नाहीत. नात्याबाहेरच्या तर अजिबातच नाहीत. माणसामाणसांच्या मध्ये कोणत्या तरी अज्ञात अदृश्यच मोठमोठय़ा भिंती उभ्या राहाव्यात अशी परिस्थिती आपण सर्वच जण अनुभवतो. नीट पाहिलं असता हे अडथळं कुठल्या प्रशस्त भिंतीमुळे नसून प्रत्येकाच्या अस्तित्वामुळेच निर्माण झालेलं सापडतात. प्रत्येक जण आपल्या अस्तित्वात कोंडून एकटा पडलेला असतो. जन्मठेपेच्या कैद्यासारखा मरेपर्यंत
3
माणसांची ही अवस्था तो अस्तित्वात आल्यापासूनची. युगानुयुगं हाच माणूस दुसऱ्या माणसावर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत पोहोचतो तो याच अवस्थेतून. एक माणूस दुसऱ्या माणसाला जाणून घेऊ शकला असता तर हे कशाला घडलं असतं? अशा या अस्तित्वात असलेल्या पण दिसत नसलेल्या अवस्थेला व्यंगचित्रासारख्या दृश्य माध्यमातून व्यक्त करण्याचा जो खेळ करत बसलो त्यातून हे दगडी पुतळ्याचे व्यंगचित्र तयार झालं. (चित्र क्र. ३)आत कोंडलेला, जिवाच्या आकांताने त्याच्या अस्तित्वाचा एक चिरा बाहेर ढकलून देऊन कळवळून सांगतोय, ‘कुणी तरी माझ्यापर्यंत पोहोचा रे!’ भयाण गंभीर, पण तितकीच मजेदार परिस्थिती दाखवणारं हे व्यंगचित्र!
अगणित थोरामोठय़ांनी आत्मचरित्रं लिहिली. शब्दात लिहिली. संपूर्ण आत्मचरित्र आशय कॉन्संट्रेट करून एकाच नि:शब्द व्यंगचित्रात व्यक्त करता येईल? तेही माझं एकटय़ाचं, माझ्यापुरतं असलेलं आत्मचरित्र नव्हे. पाहणाऱ्या कुणालाही त्याचं आत्मचरित्र त्या व्यंगचित्रात छान दिसायला हवं, असं व्यंगचित्र चितारता येईल? खेळ करणं सुरू झालं. माकडवाल्याने खेळण्यापूर्वी हातातल्या डमरूमधून ‘कडाई कट्ट- कट्ट’ करत खेळ सुरू करावा तसा नेहमीप्रमाणे इथेही खेळ सुरू झाला. पतंग जमिनीवर आणि तो उडविणारा जमीन सोडून आकाशात गेलेला हे व्यंगचित्र या खेळातून तयार झालं. 5
(चित्र क्र. ५)
आपल्या पश्चात आपलं नाव, रूप उरावं हा व्यर्थ खटाटोप चांगली शहाणीसुरती, कर्तबगार, विचारवंत माणसं करताना पाहून माझी अतोनात करमणूक होत आली आहे. मागे उरलेल्या आपल्या नावाचा, कर्तबगारीचा कालांतराने जो ‘मोहेंजोदारो’सारखा भग्नावशेष शिल्लक उरतो आणि त्याचा कुणीही स्वत:च्या सोयीसाठी उपयोग करू लागतो हे परखड वास्तव समजत असेल तर माणूस हा खटाटोप जिवंतपणी का करतो? कशासाठी करतो? काय मूल्यमापन होतं त्याच्या कर्तबगारीचं? हा निष्कर्ष व्यंगचित्राशी खेळताना असा व्यक्त झाला. स्वत:च्या सामर्थ्यांकडे पाहणारा मी! 4(चित्र क्र. ४)
प्रसंगी वाघाला माणूस व्हावं, माणसाला वाघ व्हावं, असं वाटू नये का? मला मिळालेल्या अस्तित्वात आणि आधारातच मी जन्मभर जगलो पहिजे. ही काय सक्ती आहे इथे? हत्तीच काय, गाढवसुद्धा होण्याचं स्वातंत्र्य माणसाला असायला हवं. इतरांच्या सुखदु:खात सामील होता आलं पाहिजे. हा जर सुविचार, सुसंस्कार असेल; हा विचारसुद्धा सुसंस्काराचंच एक्स्टेन्शन आहे, मग गाढवाची सुखदु:खं गाढव होऊन अनुभवणं वावगं कसं? विचाराचं निरुत्तर करणारं हे तिरपागडं कडबोळं व्यंगचित्रातून असं व्यक्त झालं. शेजारच्या फुलझाडावरील कळी उमलण्याचा अनुभव घेते तोच अनुभव दिव्याच्या जळणाऱ्या ज्योतीने का घेऊ नये? तीही फुलासारखी उमलून तो अनुभव घेताना व्यंगचित्रात दिसलं. तिने आयुष्यभर जळत काय म्हणून राहायचं? (चित्र क्र. ६)
राणीच्या बागेतल्या वाघाच्या पिंजऱ्यात कुणी तरी आयती उडी घेतो तसं एखादं व्यंगचित्र कधी कधी अनपेक्षितपणे कागदावर उतरतं. त्यासाठी व्यंगचित्राशी खेळसुद्धा करावा लागत नाही. पुण्यातल्या एका समारंभात मी व्यासपीठावर प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. (व्यंगचित्र चितारणाऱ्याला कधीच अवदसा आठवू नये असं थोडंच आहे?) प्रथेप्रमाणे सभेपूर्वी सत्कार झाला. शाल, श्रीफळ वगैरे. तो स्वीकारला. शाल खांद्यावरून काढून घडी करून समोरच्या टेबलावर ठेवली. दिलेला नारळ वरती ठेवला. दुसरीकडे मायक्रोफोनवरून माझ्या परिचयाच्या निमित्ताने वक्त्यांचा स्वैर कल्पनाविस्तार सुरू होता. तो ऐकण्याचा 6नाद सोडला. टेबलावर ठेवलेला नारळ माझं लक्ष वेधून घेत होता. त्याचा एकूण आकार, लहानशी शेंडी पाहता पाहता मला तो नारळ लहान मुलीच्या डोक्यासारखा दिसू लागला. शेंडीची छान पोनीटेल दिसू लागली. मायक्रोफोनवरची चाललेली बडबड संपताच माझ्या शेजारी बसलेल्या अध्यक्ष महाराजांनी मला उठवून व्यासपीठावर समोर ठेवलेल्या मध्यम आकाराच्या दगडापाशी नेलं. अध्यक्षांच्या हातात नारळ देण्यात आला. तोही बरोब्बर तसाच – म्हणजे छोटय़ा मुलीच्या डोक्यासारखा दिसू लागला. ‘या दगडावर नारळ फोडून अध्यक्ष महाराज आता उद्घाटन करतील,’ असा आदेश लाऊडस्पीकरवरून देण्यात आला आणि अध्यक्ष महाराजांनी आपल्या निष्ठुर हातांनी नारळ दगडावर आपटून फोडला. 7टाळ्यांचा कडकडाट झाला. मला मात्र ती एका मुलीची हत्या झाल्यासारखं वाटलं. नंतर त्या सभेत जे काही झालं त्यात मी होतो, पण मनाने केव्हाच बाहेर पडलो होतो. समारंभ संपल्यावर घरी आलो. ड्रॉइंग बोर्डवर पेपर होताच, त्यावर माझ्या हातातल्या ब्रशने हे चित्र आपोआप चित्तारलं. माझी वाटसुद्धा हाताने पाहिली नाही. स्त्री-भ्रूणहत्येचा संदर्भ त्याला चिकटूनच आला. हे माणसाच्या स्वभावातली विकृती चितारणारं व्यंगचित्रच होतं. (चित्र क्र. ७)
हे सर्व माझ्या हातून का घडतंय आणि काय घडतंय, माझ्या लक्षात येत नाही. आणि हे सर्व इतकं काळजीपूर्वक होत असेल तर ते आपोआप होतं म्हणणं खोटं ठरतं आहे. माझ्या सुमार बुद्धीपुढे फक्त एकच शक्यता उतरली आहे. माझ्या हातून हे घडविलं जात आहे. म्हणूनच या चित्रांबद्दल मला जे काही मिळतं ते (त्यात कौतुकाचं शब्दसुद्धा) मी घरी आणतो. जे कुणी हे माझ्या हातून घडवून घेत आहेत असा मला संशय आहे त्यांच्या पायाशी हे आणलेलं सुपूर्द करतो. – इदं न मम- असं मनापासून म्हणतो आणि पुण्यात माझ्या रिकाम्या हातांनी फिरत राहतो.
mangeshtendulkarcartoonist@gmail.com