लॉरेल-हार्डी, चिमणराव-गुंडय़ाभाऊ यांसारखी आपल्याला खळळून हसायला लावणारी, कधी विचारात पाडणारी तर कधी अंतर्मुख करणारी जोडी म्हणजे संता-बंता असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होईल. पण म्हणून संता-बंताच्या विनोदांची जातकुळी कमी ठरत नाही. ही जोडगोळी म्हणजे तशी निरागसच. बावळटपणाच्या सीमारेषेपर्यंत जाणारा त्यांचा हा निरागसपणा आजच्या काळाची, त्यातील माणसांची, प्रवृत्तींची खिल्ली उडवून कधी जातो ते अनेकदा समजतही नाही. हे आपण बोलत आहोत ते अर्थात त्यांच्या ‘शाकाहारी’ विनोदांबाबत. त्यांचे मांसाहारी विनोद हा वेगळाच प्रांत असून, त्याबद्दल येथे न बोललेलेच बरे. कारण तशा विनोदांसाठी तेथे संता आणि बंता हीच पात्रे आवश्यक असतात असे नव्हे. तेथे संता-बंताऐवजी कोणीही टॉम, डिक वा हॅरी वा रामा, शिवा वा गोविंदा असला तरी त्याने फरक पडत नाही. संता-बंताच्या अन्य विनोदांचे तसे नसते. तेथे त्यांचे शिख असणे हे महत्त्वाचे असते. त्यामुळे त्या विनोदांची खुमारी काही औंस तरी नक्कीच वाढते. पण त्यातील समस्या नेमकी हीच आहे.
संता-बंताच्या विनोदांमुळे शिख समाजाची बदनामी होते, त्यांच्याबद्दल जगभरात गैरसमज निर्माण होतात, त्यामुळे अन्य समुदायांबरोबरच्या शिख समाजाच्या समानतेच्या हक्काला बाधा पोचते असा दावा करीत हरविंदर चौधरी या शिख वकिल महिलेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचे म्हणणे असे की या विनोदांतून शिख निर्बुद्धांचा समाज असल्याचे चित्र निर्माण केले जाते. तेव्हा ते विनोद प्रसिद्ध करणाऱ्या संकेतस्थळांवर सरकारने बंदी घालावी अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या याचिकेवर विचार करण्याचे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. महिनाभराने या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे.
मात्र शुक्रवारी हरविंदर चौधरी यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान जे घडले ते हे एकंदर प्रकरण समजून घेण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. न्या. टी एस ठाकूर आणि न्या. गोपाल गौडा यांच्या पीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. त्यावेळी बोलताना न्यायमूर्तींनी चौधरी यांना सुनावले, की अनेक लोक हे विनोद खिलाडूपणे घेतात. आमच्या माहितीत तसे बरेच लोक आहेत. ते विनोद म्हणजे काही अपमानकारक नसतात. सहजच विनोदासाठी ते केलेले असतात. त्यांवर बंदी घालण्याच्या मागणीला उलट शिख समाजातूनच विरोध होण्याची शक्यता आहे.
अन्य कोणाचे सांगता येत नाही, परंतु आज ख्यातकीर्त साहित्यिक आणि पत्रकार खुशवंतसिंग हयात असते तर त्यांनी नक्कीच या बंदीच्या मागणीला विरोध केला असता. याचे कारण साधे आणि सरळ आहे, की अशा निखळ विनोदांचा हेतू हा काही त्या समाजाची बदनामी करणे असा नसतो. शिख व्यक्तींची लोकांच्या मनात एक प्रतिमा असते. मोकळे-ढाकळे, मनात छक्के-पंजे नसलेले, दिलदार, प्रसंगी जीवाला जीव देणारे पण भोळे असे हे लोक असतात असे मानले जाते. हिंदी चित्रपटांतूनही त्यांची हीच प्रतिमा आपल्यासमोर येत असते. हा समाजाच्या प्रवृत्तीचा, मनोवृत्तीचा लसावि काढण्याची पद्धत तशी जुनीच आहे. त्यामागे काही पिढय़ानुपिढय़ा मुरलेल्या सामाजिक धारणा असतात. त्यातून चिक्कू मारवाडीसारखे वाक्प्रचार तयार होत असतात. याचा अर्थ तो सगळा समाज तसाच असतो असे कोणी मानत नसते. नाही तर पुण्याचे भामटे, मुंबईचे मवाली असे म्हटल्यानंतर या शहरांशी कोणी सोयरिक केलीच नसती! पुन्हा हे आपल्याकडेच आहे असेही नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये ज्यूंना चिक्कू समजले जाते, अमेरिकेतील टेक्सन ते सगळे काऊबॉय समजले जातात आणि डोक्यावर तांबडे केस असलेल्या सगळ्या तरूणींना ‘इंटेल इनसाईड’ नसते असे मानले जाते. ब्लॉंड मुली, पोलिश, आयरिश, ज्यू यांच्याबद्दलच्या विनोदांनी तर गुगलचे सव्‍‌र्हर भरले असतील. पण हे विनोदापुरतेच ठीक असते. एखाद्या समाजाबद्दलच्या विनोदांचा विनोद हाच विस्तार आणि तीच त्याची मर्यादा असली पाहिजे. तसे जेव्हा नसते तेव्हा काय घडते ते आपण आपल्या आजुबाजूला आजही पाहू शकतो.
एखाद्या समाजाचे, जातीचे, धर्माचे सर्वसाधारीकरण करून त्यांच्याबद्दल गैरसमजच नव्हे, तर द्वेषभावना पसरविण्याची कारस्थाने सतत सुरू असतात आणि आहेत. यासंदर्भात दुसऱ्या महायुद्धपूर्व जर्मनीचे उदाहरण चिंतनीय आहे. ज्यूंना ज्या कारणांसाठी विनोदविषय बनविले जात होते, ती कारणे नंतर त्यांच्यावरील अत्याचारांचे समर्थन करण्यासाठी वापरली गेली. ते त्या समाजाचेच दोष असल्याचे लोकांच्या मनावर बिंबवले गेले. ज्यूंच्या शिरकाणाबद्दल तेव्हाचा जर्मन समाज मौन बाळगून होता, याचे कारण तेच होते आणि म्हणूनच या सर्वसाधारीकरणाच्या प्रवृत्तीपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे.
संता-बंताच्या विनोदांना निरोप देण्याची खरोखरच गरज नाही. विनोदाचे इंद्रिय हरविलेला समाजच अशा बंदीच्या मागण्या करीत असतो. त्यांतील हास्यास्पदता सर्वानीच लक्षात घेणे बरे. समाजाच्या स्वास्थ्यासाठी ते अधिक चांगले असते.