‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सांगून ठेवल्यामुळे मराठी माणसाने तरी हे वचन ‘परंपरा’ म्हणून पाळलेले दिसत असेल तर त्यात वावगे काहीच नाही. कारण परंपरांचा पाईक होण्याची पात्रता अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करण्याचा निश्चयच आपण केलेला असतो. राज्यात सत्तेवर असलेला भाजप हा तर संस्कृति आणि परंपरांचा पूजक पक्षच असल्याने याला तो अपवाद नाही हे ओघानेच येते. खरे म्हणजे, भाजपने तुकारामांच्याही पुढे पाऊल टाकून निंदकाला थेट घरातच घेतले आहे. आता, ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी भाजपची अवस्था झाली असली तरी परंपरेचा त्याग करणे भाजपला शक्यच नाही. कारण परिस्थितीच तशी आहे. शिवसेनेला सोबत घेऊन सत्तेचा संसार थाटायचे भाजपने ठरवले, तेव्हा, ‘भांड्याला भांडं लागणारच आणि आवाज येणारच’ हे ‘स्वयंपाकघरातलं सत्य’ भाजपनं स्वीकारलंच होतं. आता तसेच होऊ लागले अाहे. सरकारमध्ये असलो तरी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यावर प्रसंगी विरोधही करणार असे ठणकावूनच उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष सत्तेत बसविला होता. सत्तेची ऊब मिळू लागली की कालांतराने हा तोरा उतरेल अशी त्या वेळी कदाचित भाजपची सेनेबाबत भावना असावी. म्हणूनच, शिवसेनेच्या लहानसहान कुरबुरींना पानं पुसून सत्तेचा गाडा आपल्या गतीने हाकण्याचे तंत्र भाजपने अवलंबिले होते. कामे होत नाहीत, निर्णय घेतले जात नाहीत, डावलले जाते, अशा तक्रारींचा सूर लावूनही भाजप ‘ताकास तूर’ लागू देत नाही हे लक्षात येईपर्यंत तुरीचा मुद्दा आयता हातात आला आणि घरच्या निंदकाची रोखठोक भूमिका शिवसेनेने शिरावर घेतली. मुळात डाळीच्या मुद्द्यावर भाजप, सरकार आणि बापट पुरते भरकटल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या पातळीवर प्रवक्त्याने एक बोलावे तर मंत्री म्हणून बापट भलतेच बोलून जातात आणि वेगळाच काहीतरी निर्णय घेऊन मुख्यमंत्री नवा बोळा फिरवतात असा डाळीचा पोरखेळ रंगलेला असताना मंत्रिमंडळाच्या भर बैठकीत ‘घरचा निंदक’ असलेल्या सेनेच्या मंत्र्यांनी डाळीवरून बापटांना घेरल्याने सरकारची पंचाईत झाली आहे. एकीकडे मंत्रिमंडळात सहकारी पक्ष ‘तोंड दाबायच्या’ तयारीत असताना, त्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी, ‘बुक्क्याचा मार’ही सुरू केला आहे. दुष्काळग्रस्तांसाठी असलेला पैसा कुणाच्या खिशात जातो असा खरमरीत सवाल करीत त्यांनी भाजपला थेट संशयाच्या भोवऱ्यात नेऊन ठेवले. डाळीच्या प्रश्नावर डळमळीत चालढकल सुरू असताना दुष्काळनिधीच्या मुद्द्यावर खरमरीत सवाल सुरू करून घरच्या निंदकाची भूमिका बजावण्यास सेनेने सुरुवात केल्याने, ‘शेजारच्या घरा’तील निंदक असलेल्या विरोधी पक्षांचे काम हलके झाले आहे.