मराठी विद्वतजगात दोन घराणी आहेत. एक बळवंतराव टिळकांचे विचार, त्यांचे राजकारण आणि त्यांची वैचारिक मांडणी यांचे अनुकरण करते. दुसरी परंपरा गोपाळराव आगरकर यांच्याशी निष्ठा सांगते. अरूण टिकेकर हे दुसऱ्या परंपरेचे आधुनिक पाईक होते. महाराष्ट्रात अलिकडच्या काळात आगरकरांची विचारध्वजा फडफडती ठेवणारे महंत फार उरलेले नाहीत. समाजसुधारणा या राजकीय सुधारणांपेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत, असे शुद्ध आगरकरी घराण्याप्रमाणे टिकेकर यांना वाटे. उभय घराण्यांतील फरक आहे तो विचारांच्या मांडणीत. आपला जो काही मुद्दा असेल तर तो संयतपणे मांडावा, ही आगरकर घराण्याची शिकवण होती. टिकेकरांकडून तिचे कधीही उल्लंघन झाले नाही. आवश्यक तितक्या आणि तितक्याच ठामपणाने आपले मत समोरच्यासमोर मांडले की आपली भूमिका संपली असे रास्तपणे ते मानत. आपले काम समोरच्यास योग्य ते काय हे सांगण्याचे आहे, त्याने ते ऐकायलाच हवे असा आग्रह आपण धरणे योग्य नाही, असे ते मानत आणि तसेच वागत.
टिकेकर दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक होते इतकेच त्यांचे मोठेपण नाही. ते नखशिखांत ग्रंथकार होते. ग्रंथकार आणि पत्रकार या दोघांपैकी त्यांच्यात पहिल्याच्या प्रेरणांना अधिक स्थान होते. ग्रंथांच्या सहवासात राहण्याची संधी मिळते आणि बुद्धिजीवी राहताना इतरांनाही शहाणे करून सोडता येते यासाठी ते पत्रकारितेत आले. विविध विषयांवरील ग्रंथांचे परिशीलन करावे, त्यातील उत्तमोत्तम ग्रंथांचा संग्रह करावा यावर त्यांचे विलक्षण प्रेम. टिकेकरांसाठी आयुष्यात श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही ग्रंथच होते. डोळ्यावरती जाड काड्यांचा चष्मा, पांढरा फुलशर्ट आणि मूठ बंद करून सिगारेटचा सणसणीत झुरका घेत हव्या त्या विषयांची माहिती देणारे टिकेकर महाराष्ट्रातील अनेक विद्वतप्रेमींनी पाहिले असतील. तेथे असतानाच दुसरे तितकेच ग्रंथोपजीवी गोविंदराव तळवलकर यांच्या सहवासात ते आले आणि त्याचमुळे वृत्तपत्र जगतातही त्यांनी पाऊल टाकले.
टिकेकरांनी आयुष्यभर प्रेम केले ते फक्त ग्रंथांवर. अन्य कोणाच्याही नजरेत येण्याची शक्यता नसलेला एखादा महत्त्वाच्या विषयावरील ग्रंथ वाचल्यानंतर त्यांना होणारा आनंद शब्दातीत असे. त्या सुमारास त्यांची भेट झालीच तर टिकेकर आपण वाचलेल्या ताज्या ग्रंथाविषयी हरखून जाऊन बोलत. हे त्यांचे विवेचन इतके प्रभावी असे की अनेक ग्रंथोच्छुकांनी केवळ टिकेकरांकडून ऐकले म्हणून अनेक पुस्तके खरेदी केली असतील. इतरांना न दिसणाऱ्या विषयांची मांडणी करण्यातली त्यांची हुकमत टिकेकरांनी लिहिलेल्या ग्रंथांतूनही दिसते. ब्रिटिशकालीन किंकेड पितापुत्रांवर लिहिलेले पुस्तक याची साक्ष देईल. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचा टिकेकर यांनी लिहिलेला इतिहास विद्यापीठाच्या इतिहासाइतकाच देदीप्यमान आहे. त्यांचे वेगळ्या अर्थाने चर्चिले गेलेले पुस्तक म्हणजे ‘मुंबई डी-इंटलेक्चुअलाईज्ड’. या महानगरीचे बौद्धिक विश्व कसे आकसत चालले आहे आणि त्या बद्दल कोणालाच कशी खंत नाही याचे बौद्धिक तरीही रसाळ विश्लेषण या ग्रंथात आहे. एका अर्थाने हे पुस्तक म्हणजे सर्वच शहरांची व्यथा असे म्हणता येईल.
‘लोकसत्ता’चे ते माजी संपादक. प्रत्येक संपादकाचे स्वत:चे म्हणून काही राजकीय ग्रह असतातच. किंबहुना ते असायलाच हवेत. परंतु, म्हणून भिन्न मते असणाऱ्यांना त्या वर्तमानपत्रांत स्थान नाही, असे झाल्यास ते संपादकाचे अपंगत्व असते. टिकेकरांना सुदैवाने त्या अपंगत्वाचा स्पर्शही कधी झाला नाही. समस्त लोकसत्ता आणि एक्स्प्रेस समूहातर्फे त्यांना आदरांजली.