टॉलरन्स अर्थात सहिष्णुता, असुरक्षित वातावरण या अर्थाचे हॅशटॅग गेले काही दिवस समाजमाध्यमांमध्ये धुमाकूळ घालत आहेत. आपला देश कसा असहिष्णु बनतोय असे म्हणणाऱ्यांचा एक गट विरुद्ध आत्ताच कसा देशाचा विकास होतो आहे आणि सहिष्णुता जपणारा भारत हाच कसा एकमेव देश आहे असे ठासून सांगणारा दुसरा गट यामध्ये शब्दयुद्ध रंगले आहे. याला ताजे निमित्त मिळाले आहे आमीर खानच्या देश सोडून जाण्याविषयीच्या वक्तव्याचे.  हे शब्दयुद्ध ऐन भरात यायच्या अगदी आदल्या दिवशी आणखी एक ऑनलाइन मोहीम जोर धरत होती आणि त्यालाही निमित्त होते अशाच एका वक्तव्याचे..

खरे तर दक्षिण भारतातील कोण्या एका मंदिराच्या प्रमुखाने आपल्या अनोख्या कल्पनाशक्तीतून शक्यता वर्तवलेल्या एका यंत्राचे. या मंदिर समूहाला कोण्या एका असे म्हणणे, तसे अयोग्यच. न जाणो यातूनही कुणाच्या भावना दुखवायच्या आणि कुणाच्या सहिष्णु वृत्तीचा कडेलोट व्हायचा. कारण ते मंदिर भारतातील किंबहुना जगातील प्रमुख मोठय़ा देवस्थानांपैकी एक.  केरळमधील शबरीमाला देवस्थान – या मंदिराला दरवर्षी किमान दहा लाख पुरुष भाविक भेट देतात. मंदिर प्रशासक म्हणून त्रावणकोर देवस्वम बोर्ड नावाचे मंडळ काम बघते. या मंडळाला नुकताच नवीन अध्यक्ष मिळाला. प्रयार गोपालकृष्णन. या गोपालकृष्णन महोदयांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतानाच आपल्या अगम्य कल्पनाशक्तीचे तारे तोडत भविष्याचा वेध घ्यायचा प्रयत्न केला आणि भविष्यात या मंदिरात स्त्रियांना प्रवेश देण्याची शक्यता बोलून दाखवली. या शबरीमाला मंदिरात सध्या विशिष्ट वयोगाटातील स्त्रियांना प्रवेश मिळत नाही. कारण रजस्वला स्त्रिया अपवित्र असतात. म्हणून जननक्षम वयात अर्थात मासिक पाळी सुरू असणाऱ्या १२ ते ५० या वयोगटातील स्त्रियांना या मंदिरात प्रवेश बंदी. पाळी सुरू असणारी स्त्री अमंगळ असते. अपवित्र असते. हत्यारे अथवा स्फोटके ओळखणारे जसे स्कॅनिंग यंत्र असते तसे स्त्रीचेअपवित्र स्त्री ओळखणारे यंत्र निर्माण झाले की, शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटाच्या स्त्रियांना प्रवेश देता येईल, असा गोपालकृष्णन यांचा भविष्यवेध. स्त्रीची मासिक पाळी सुरू नाही याची यंत्राद्वारे खात्री केल्यानंतरच तिला प्रवेश देणे सोयीचे जाईल, असा याचा अर्थ.

यावर अर्थातच विविध स्तरातील स्त्रियांनी व्यक्त व्हायला सुरुवात केली. ज्या नैसर्गिक क्रियेचा आधार मनुष्यजन्माच्या प्रक्रियेला आहे, त्या सृजनात्मकतेची अशी अवहेलना का, असा सवाल अनेकींनी विचारला. ‘हॅपी टू ब्लीड’ नावाची ऑनलाइन मोहीम दिल्लीतील एका तरुणीने सुरू केली आणि ‘हॅपी टू ब्लीड’ हा हॅशटॅग बघताबघता पसरत गेला. ‘आम्हाला मासिक पाळी येतेय म्हणून तुमचे अस्तित्त्व आहे’, ‘मला अभिमान आहे रजस्वला असण्याचा’, या अर्थाच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी हा मासिक धर्म आहे आणि तो पाळलाच पाहिजे वगैरे बिनबुडाचे युक्तिवादही केले. धर्मावर विश्वास नसेल अशांनी मंदिरातील प्रवेशासाठी तरी कशाला भांडावे, अशा तर्कटलीलाही झाल्या. सगळ्या वादांमध्ये धर्म, भावना आणायची विकृत सवय लागलेल्या आपल्या समाजाने यावरूनही धार्मिक राजकारण सुरू केले. आमच्या धर्मात कसे स्त्रियांना प्रार्थनागृहात प्रवेश मिळतो. आमच्या धर्मात कशी साधनशुचिता पाळली जाते वगैरे तद्दन तकलादू युक्तिवादांनी समाजमाध्यमांवर नेहमीप्रमाणे धुमाकूळ घातला आणि मूळ मुद्दा बाजूलाच राहिला.

मंदिरासारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाचा हक्क महिला म्हणून नाकारला कसा जाऊ शकतो? दलितांना प्रवेश नाकारणारीच ही मानसिकता नाही का? हे प्रश्न यातून समोर आले. आता मुद्दा आहे तो, विकास, समानता, सहिष्णुता याच्या गप्पा मारणाऱ्यांना ‘हॅपी टू ब्लीड’ पद्धतीची मोहीम आजच्या तरुणींना हाती घ्यावी लागते आहे, याचे काहीच वाटत नाही का? ‘भारतीय मुलींवर हॅपी टू ब्लीड असे म्हणायची वेळ का येते?’ या अर्थाने परकीय माध्यमांनीही या मोहीमेची मोठय़ा प्रमाणावर दखल घेतली. आपल्या विकसित, सहिष्णु भारताची जगात काय प्रतिमा आहे, याची ज्यांना काळजी वाटते, त्यांनी यावरून देशाची प्रतिमा काय होते आहे  याविषयी चिंता का व्यक्त केली नाही? पाळी म्हणजे काहीतरी वाईट आहे असे नाही, पण त्याची अशी ‘ओंगळवाणी’ चर्चा नको असे अनेक मध्यममार्गी म्हणवणाऱ्यांचे मत दिसले. यात बहुतांश स्त्रियादेखील आहेत.

स्त्रीची मासिक पाळी ही निसर्गदत्त देणगी आहे. तिच्या स्त्रीत्त्वाची ती मूळ ओळख आहे. त्यामुळेच तुम्ही-आम्ही जन्म घेऊ शकलो. ही गोष्ट अगदी व्यवस्थित कळलेली असूनही पाळीला ‘अडचण’, ‘विटाळ’ असे समानार्थी शब्द देणाऱ्या समाजाला काय म्हणावे? पाळी इतकी अमंगळ, अपवित्र की त्या विषयी चारचौघात चर्चाही करायची नाही. ती चर्चाच ओंगळवाणी ठरणार. पाळीभोवती एवढी नकारात्मक भावना आजही आहे याचेच आश्चर्य वाटते. या नकारात्मक भावनेनेच प्रत्येक तरुणीला तिच्या पहिल्या पाळीच्या वेळी समजावले जाते. त्यामुळे या काळातील शिवाशिव, देवाला स्पर्श न करणे, बाजूला बसणे या गोष्टीदेखील त्या पौगंडावस्थेतील मुलीला पाळीप्रमाणे सहज वाटू लागतात. पाळी म्हणजे अडचण याची सुरुवात तिथूनच होते. त्यामुळे ती अडचण भोगावी लागणारच.. स्त्रीजन्मा ही तुझी कहाणीच्या धर्तीवर उगीउगी करत हीच भावना कुरवाळली जाते. त्यामुळे अशा खुल्या चर्चा होतात तेव्हा अर्थातच अनेक स्त्रियांना धक्का बसतो. ती ओंगळवाणी वाटते. आपण गुलामगिरीत आहोत, याची जाणीवच नसणाऱ्या समाजाला स्वातंत्र्याची आस कशी लागणार? आपल्यावर अन्याय होतो आहे, यात समानता नाही, हे ज्यांच्या गावीही नाही, त्यांना या अशा खुल्या चर्चेने किमान भान आले आणि या बाबतीत सहिष्णुतेची अपेक्षा बाळगण्यात गैर नाही हे कळले तरी या ‘पावित्र्याच्या यंत्रा’ने काम केले, असे म्हणता येईल.