जगातील दोन अव्वल दर्जाच्या संघांमधील कसोटी सामना अवघ्या तीन दिवसात संपला. मध्यंतरी महाराष्ट्र व दिल्ली यांच्यातील रणजी सामना केवळ दोन दिवसांत आटोपला, तर बंगाल व ओदिशा यांच्यातील रणजी सामना अवघ्या दीड दिवसात संपला. ही किमया खेळपट्टीची की खेळाडूंच्या नाकर्तेपणाची हा आता चर्चेचा विषय आहे. जागतिक क्रिकेट स्तरावर एकाच वेळी किती विरोधाभास चित्र पाहावयास मिळत आहे. कसोटी क्रिकेट वाचावे म्हणून त्याची लोकप्रियता वाढविण्याचे एक साधन म्हणून दिवसरात्र स्वरुपाचा कसोटी सामना आयोजित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारी सुरू झालेल्या या कसोटीद्वारे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला जात असतानाच नागपूर येथील कसोटीचा खेळ तीन दिवसांत खल्लास होतो, हे किती विरोधी चित्र आहे.

कसोटी किंवा दीर्घकालीन क्रिकेट हा खेळाचा आत्मा आहे, असे छातीठोकपणे सांगितले जात असले तरी खेळाडूंना जास्त काळ खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करता येत नाही ही खरी वस्तुस्थिती आहे. एक दिवसीय व ट्वेन्टी२० सामन्यांच्या अतिरेकामुळे खेळाडूंना पन्नास काय, पण वीस षटकेदेखील पूर्ण खेळ करता येत नाही. अर्थात हल्लीच्या वेगाच्या दुनियेत पाच दिवसांचा कसोटी सामना पाहण्यासाठी कोणालाही फारसा वेळ नसतो. खेळाडू, त्यांचे नातेवाईक व सुरक्षा पथकातील लोकच सामन्यासाठी उपस्थित असतात. एक कसोटी सामना खेळण्याऐवजी ट्वेन्टी२० चे चार सामने खेळले तर भरपूर आर्थिक कमाई होते हा हेतू ठेवीतच अनेक खेळाडू खेळत असतात.
आपल्या गोलंदाजांना अनुकूल राहील अशी खेळपट्टी तयार करण्यावरच नेहमीच संयोजक संघ प्रयत्न करीत असतो. आफ्रिकेकडे फिरकी गोलंदाजांची वानवा आहे, तसेच त्यांच्या फलंदाजांची फिरकी माऱ्यापुढे त्रेधातिरपीट उडते हे लक्षात घेऊनच भारतीय संयोजकांनी आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी फिरकी गोलंदाजीस अनुकूल खेळपट्टी तयार केली व तीन तीन अनुभवी फिरकी गोलंदाज खेळविले. त्यामुळे भारतीय संघाने कसोटी मालिकाही जिंकली.

कसोटी सामना खेळावयाचा म्हणजे पाच दिवस दररोज किमान सहा तास प्रत्यक्ष मैदानावर खूप शारीरिक कष्ट पडतात. त्याऐवजी ट्वेन्टी२० साठी केवळ चारच तास कष्ट पडतात, असा अनेक खेळाडू विचार करीत असतात. झटपट क्रिकेटच्या काळात कसोटीतील खेळालाही वेग आला हे खरे ; पण नागपूरच्या कसोटीचा काळ मात्र खेळपट्टीमुळे झटपट झाला .