पुराव्याची व्यवस्था करणारी व्यक्ती तगडी असेल आणि आपल्याइतकाच तगडा पुरावा ती सादर करू शकत असेल तर सत्य हे असत्य ठरू शकते आणि असत्याचे रूपांतर सत्यात होऊ शकते.

सत्य हा बचाव असू शकत नाही, हे न्यायालयाचे महत्त्वाचे तत्त्व. याचा अर्थ सलमान खान चालवत असलेल्या मोटारीखाली कोणीतरी रस्त्यावरचा मेला हे सत्य असले तरी सलमान खान वा त्याची मोटार त्यास जबाबदार आहे, असा होत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने आज सलमान खान यास १३ वर्षांपूर्वीच्या अपघात प्रकरणात निर्दोष सोडले. हे फारच छान झाले. याचे कारण उगा सत्याच्या सहाऱ्याने जगू पाहणाऱ्या निर्बुध्दांना आता तरी सत्य हा बचाव असू शकत नाही, या अत्यंत महत्त्वाच्या, शहाण्या तत्त्वाची जाणीव होईल. न्यायालयात महत्त्व असते ते पुराव्याला. एखादी घटना घडली आणि ती कितीही सत्य असली तरी तिच्या सत्यतेचा पुरावा जो पर्यंत सादर केला जात नाही तो पर्यंत ती सत्य मानता येत नाही आणि जर ती सत्य मानलीच जात नसेल तर तिच्याबाबत निवाडा कसा आणि काय करणार ? !
हा युक्तिवाद समजून घेणे ज्यांना जड जात असेल त्यांच्यासाठी आणखी एक उदाहरण देता येईल. ते म्हणजे निवृत्त सरकारी कर्मचार्याचे. ठराविक काळाने या निवृत्त कर्मचाऱ्यांना आपण जिवंत आहोत, याचा पुरावा द्यावा लागतो. ते ठीकच. पण नियम असा की ही निवृत्त व्यक्ती स्वत/ जातीने बँक वा सरकारी कार्यालयात हजर असली तरी कार्यालयातला पिजराधीन कर्मचारी त्या व्यक्तीस तुम्हा हयात आहात याचा पुरावा काय, असा प्रश्न विचारतो आणि तो नसेल तर त्याचे निवृत्ती वेतन रोखू शकतो. वास्तविक ती व्यक्ती समोर चालत/ बोलत आहे त्या अर्थी नक्कीच हयात आहे हे जरी सत्य असले, तसेच ती व्यक्ती हयातच नसेल तर समोर येणारच नाही हेही सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ सत्य असले तरी हे सत्य असणे निर्णयासाठी पुरेसे नसते. महत्त्व असते ते पुरावा नावाच्या घटकास. घटना सत्य की असत्य हे दुय्यम. जे सिध्द करायचे असेल ते सिध्द करण्यासाठी पुरावा तगडा हवा. पुराव्याची व्यवस्था करणारी व्यक्ती तगडी असेल आणि आपल्याइतकाच तगडा पुरावा ती सादर करू शकत असेल तर सत्य हे असत्य ठरू शकते आणि असत्याचे रूपांतर सत्यात होऊ शकते.
या प्रकरणात फिर्यादी पक्षाने सादर केलेला पुरावा सलमान यास दोषी ठरवण्यासाठी पुरेसा नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले. ते नोंदवताना न्यायालयाने अत्यंत महत्वाच्या साक्षीदाराचे अत्यंत महत्वाचे विधानच मोडीत काढले. हा साक्षीदार म्हणजे रवींद्र पाटील हा सलमानचा सुरक्षा रक्षक. या पाटील याने दिलेल्या जबानीनुसार अपघात घडला त्यावेळी सलमान स्वतः मोटार चालवत होता आणि त्याने मद्यपान केले होते. ही जबानी देऊन, क्षयरोगाने पाटीलचे निधन झाले. ही जबानी सत्र न्यायालयाने ग्राह्य मानली आणि उच्च न्यायालयाने तीच जबानी हा पुरावा ठरू शकत नाही, असे मत नोंदविले.
सलमान खान निर्दोष सोडला गेल्यानंतर तरी आपल्याकडील भाबडय़ा जनतेस सत्यापेक्षा पुराव्यास महत्त्व देण्याची जाणीव निर्माण होईल, अशी आशा बाळगावयास हरकत नाही. तसे न झाल्यास पुराव्याचे पतंग कापले जाण्याचा ‘कायपो छे’ खेळ यापुढेही सुरू राहील.