विजेंदरसिंग हा केवळ हौशी बॉक्सिंगपुरताच योग्य आहे. त्याने विनाकारण व्यावसायिक बॉक्सिंगचा मार्ग स्वीकारला अशी टीका करणाऱ्यांना विजेंदर याने सणसणीत चपराख दिली आहे. त्याने व्यावसायिक क्षेत्रातील पदार्पणातच शानदार विजय मिळवित झकास सलामी केली आहे. त्याने सोनी व्हाईटिंग यासारख्या युवा परंतु अव्वल दर्जाच्या बॉक्सरविरुद्ध ही पहिली लढत जिंकली आहे.
विजेंदर हा बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने २००८ मध्ये ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले होते. त्याने जेव्हां हौशी बॉक्सिंगला रामराम ठोकून व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण करण्याचा मार्ग निवडला. त्या वेळी त्याच्यावर भरपूर टीका झाली. दोन दशके हौशी खेळाडू म्हणून कार्यरत असलेल्या विजेंदरकडे व्यावासायिक बॉक्सिंगची शैली नाही. तो तेथे अपयशी होईल अशीही सतत टीका झाली. मात्र त्याने या टीकेकडे दुर्लक्ष केले.
विजेंदर याने व्यावसायिक बॉक्सिंगचा मार्ग का निवडला याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. गेली दोनतीन वर्षे भारताच्या हौशी बॉक्सिंग क्षेत्रात गलिच्छ राजकारणामुळे अस्थिरता आली आहे. या अस्थिरतेमुळे प्रायोजकही फारसे मिळत नाहीत. तसेच तो सध्या २९ वर्षांचा आहे. हौशी क्षेत्रात अनेक युवा खेळाडू शिरजोर ठरत असतात. हेदेखील कारण महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत त्याने व्यावसायिक बॉक्सिंगचा मार्ग निवडणे काही गैर नाही.
विजेंदर याने व्यावसायिक क्षेत्रात दिमाखात पदार्पण केले आहे. त्याने ज्या खेळाडूला हरविले तो इंग्लंडचा व्हाईटिंग हा आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो. तसेच प्रतिस्पर्धी खेळाडूला जोरदार ठोशांच्या प्रहाराने घायाळ करण्याची शैलीही त्याच्याकडे आहे. त्यामुळेच विजेंदरचा विजय निश्चितच प्रेरणादायक आहे.