‘‘आमच्यात लग्न होत नाहीत. आम्हीच पार्टीचा गाडा ओढायचा. आईनं केलं तेच मी केलं. लावणी ‘खेळणं’ हे हौसेचं नाही, तोच आमचा पेशा. आमचं कुटुंबं त्यावर चालतं. पायात घुंगरू बांधले की लग्न नाही. पण संसाराची स्वप्नं तर पडतातच ना मग ‘मालक’ करायचा.. ही पूर्वापार रीत. पण हे नातं जर-तरचं असतं याची जाणही असते. इथे हक्क, कर्तव्य अशी भाषा नाही चालत. त्यामुळे पालकत्व एकटीनं निभवावं लागलं. ती माझीच जबाबदारी होती, मी ती पार पाडली.’’ ज्येष्ठ लावणी कलाकार शकुंतलाबाई नगरकर यांच्या एकल पालकत्वाविषयी..

पुरुषांनी पुरुषांच्या मनोरंजनासाठी रचलेली लावणी, त्यात स्त्री जेव्हा तिच्या जीवनानुभवाचं सार ओतते तेव्हा ती लावणी एकाच वेळी बेभान करते आणि रसिकांच्या काळजात घरही करते. समोरच्या रंगमंचावर नखशिखांत नखरेलपणा आणि मर्दानी रांगडेपणाचा एक धीट आविष्कार आम्ही एकाचवेळी पाहात होतो..
‘नेसले पितांबर जरी’ या लावणीतली भावकुसर थक्क करणारीच होती. ज्येष्ठ लावणी कलाकार शकुंतलाबाई नगरकर यांच्या गारूडावर सारे प्रेक्षक डोलत होते. त्यांची ही जादू मी अनेक वेळा अनुभवली होती. या जादूई भारलेपणानंतर मी जाऊन त्यांना त्यांच्या एक पालकत्वाविषयी प्रश्न विचारणार.. माझं मलाच हसू येत होतं. दडपण आलं होतं. ‘एकल पालकत्व..’ शकुताई क्षणभर थांबल्या आणि म्हणाल्या, ‘‘ते काही दुर्दैवानं कोसळलं वगैरे नाही. पोरं ‘काढायचा’ निर्णय सर्वस्वी माझा होता. आमच्यात हे माहीतच असतं, पोरं जन्माला घालायची तर ती स्वत:च्या हिमतीवर.’’
ऐकलं अन् सर्रकन अंगावर काटा आला. शकुताई अगदी सहजपणे बोलत होत्या..
‘‘माझा जन्म भातू कोल्हाटी समाजातला. आईपण नाचायची. आईनं मला पद्धतशीर शिकवलं. वसंतराव घाडगे, गोविंदराव निकम यांनी सुरुवातीला धडे दिले. पुढे आपलं आपण शिकत राहिले. आमच्यात लग्न होत नाहीत. पार्टीचा गाडा ओढायचा. आईनं केलं, तेच मी केलं. त्यात विशेष ते काय?’’
‘‘लावणी ‘खेळणं’ हे हौसेचं नाही, तोच आमचा पेशा. आमचं कुटुंब त्यावर चालतं.’’ शकुताई लावणी खेळणं हा शब्द वापरतात. ‘सादर करणं’ हा फारच आधुनिक आणि अचेतन शब्द वाटला त्यापुढे. पायात घुंगरू बांधले की लग्न नाही. पण संसाराची स्वप्नं तर पडतातच ना, मग ‘मालक’ करायचा.. ही पूर्वापार रीत. मन जडलं, खिशाला परवडलं की नातं जुळतं. पण हे नातं जर-तरचं असतं याची जाणही असते. इथे हक्क, कर्तव्य, जबाबदारी अशी भाषा नाही चालत. एखादीच भाग्यवंत की जिची सारी जबाबदारी मालक घेतो आणि शेवटपर्यंत निभावतो, तिचा संसार सुखाचा होतो. शकुताईंना तीन मुलं झाली. आईकडे तीस-पस्तीस माणसांचं कुटुंब. मुलं लहानपणी भाऊ आणि भावजयीनं सांभाळली. तशीच पद्धत होती. घरात मुलीच कर्त्यां, कमावत्या. त्यांना संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा असायचाच. घरात आई आणि मुलींचाच शब्द चालायचा.
शकुताईंनी मात्र कटाक्षानं मुलांनी शिकावं म्हणून प्रत्येकाला आठव्या वर्षांनंतर हॉस्टेलला ठेवलं. थोरली मुलगी बारावी झाली. मुलानंही बारावी करून तंत्रशिक्षण घेतलं. धाकटी पदवीधर, बी.कॉम. झाली. तिनं ब्युटीथेरपीत डिप्लोमाही केला. शाळेत घालताना मुलांचं नाव, वडिलांचं नाव हे प्रश्न त्रास देतात. पण सुरुवातीलाच. एकदा शिक्षकांना सारं सांगितलं की, मग त्यांचीही अपेक्षा नसते. शकुताईंना पालकसभेला जाणं, अभ्यासेतर उपक्रमात भाग घेणं शक्यच नव्हतं. मग कसं निभलं असेल?
त्यांचं उत्तर सरळ होतं, ‘‘शिक्षण हवंच हे ध्येय होतं. मन घट्ट केलं की सारं निभतं. पोरंही एक-दोनदा घाव झेलून घट्ट होत जातात.’’ शकुताईंना एक प्रसंग आठवतो. त्यांचं जरा नाव होऊ लागलं होतं. सुषमा देशपांडे त्यांची दूरदर्शनवर मुलाखत घेणार होत्या. थोरली मुलगी तेव्हा मोठी होती. ती कासावीस झाली. पोर व्याकूळ बघून शकुताईंचा पाय अडला. पोरीला दुखवायला मन होईना. मग सुषमानं वेळ काढला. पोरीला भेटली. ‘‘तुझी आई किती उत्कृष्ट कलाकार आहे, ती परंपरा जपते, अंगभर साडी नेसून नाचते, यात लाज वाटण्यासारखं काय आहे. उलट ताठ मानेनं सांग मैत्रिणींना,’’ वगैरे खूप समजावलं. थोरलीला मग तिची समजूत पटली. मुलांना आईचा अभिमान होताच. पण वीस वर्षांपूर्वी या कलेला एवढी समाजमान्यता नव्हती.
समाजातलाच मुलगा केला म्हणून थोरलीच्या किंवा मुलाच्या लग्नात काही अडचण आली नाही. दोघं आपापल्या संसारात सुखी आहेत. मुलाचा स्वत:चा छोटासा कारखाना आहे. धाकटय़ा मुलीनं कबूलच केलं की हा मानसन्मान, चॅनेलचं ग्लॅमर, आईचं नाव हे हल्ली लाभलं. शाळेत असताना सुरुवातीला खूप वाईट वाटायचं की, पालकसभेला किंवा गॅदिरगचे कार्यक्रम बघायला आपली आई येत नाही. कुणी नावावरून छेडायचं, तुझे बाबा का येत नाहीत विचारायचं, त्याची तक्रार सांगायला आई भेटणार एक महिन्यानं.. पण बोलता बोलता ती एक कठोर सत्य सांगून गेली, ‘‘परमेश्वर आमच्यासारख्या मुलांना समजूत जरा जास्तच देतो.. जन्मत: त्यामुळे सगळ्या गोष्टींचा स्वीकार आम्ही सहज करतो. तक्रार किंवा कुरकुर करून काय फायदा.’’
हे झालं शाळेतलं. पण नंतर शकुताईंचं स्वत:चं घर झालं. कुटुंबाला एकत्र राहायला मिळालं. धाकटीचं कॉलेजजीवन सुरळीत गेलं. पण मित्रमैत्रिणींना फार जवळ करता येत नाही. धाकटी सांगते, ‘‘आम्ही काही लपवत नाही. पण मुद्दाम सांगतही नाही. पण एक मित्र खास होता. असं वाटलं की हे नातं वेगळं होतंय, पण त्याच्या घरचे माझं अस्तित्व, माझं कुटुंब स्वीकारतील का या भावनेनं मी आपोआप मिटून गेले.’’
आपल्याला लाभलेलं आयुष्य, त्यातली अपरिहार्यता मुलांनी लहानपणापासूनच मनापासून स्वीकारली. पुढे सगळं चांगलंच झालं. शकुताईंनी मुलांचं शिक्षण, कपडालत्ता यात काहीच कमी पडू दिलं नाही. मुलंही समजुतीनं अन् शिस्तीनं राहिली यातच सारं आलं. शकुताईंना पालकत्व एकटीनं निभवावं लागलं, असं मुळीच वाटत नाही. कारण त्यांच्या मते ‘‘ती माझीच जबाबदारी होती मी ती पार पाडली.’’
भातू कोल्हाटी समाजात मुळात मातृसत्ताक कुटुंबपद्धती मनोमन मान्य आहे त्याचाच हा परिणाम असावा. आता समाज खूप बदलला आहे. कलेला खूप मान आहे. पण त्यांच्या समाजातली मुलं शिक्षण घेऊन पांढरपेशा समाजात मिसळतानाचा जो मधला टप्पा होता तो कठीणच होता. मुलांचं कोवळं वय.. त्यांना घरचं जग आणि बाहेरचं जग यातली दरी साधणं अवघड गेलं असणार. पण हे अवघड आव्हान पेलायला मुलांना घट्ट बनवलं हेच तर शकुताईंचं यश आहे. सर्वस्वी वेगळ्या संस्कृतीत, वातावरणात मुलांना ठेवून समर्थ बनवणं, आपल्या स्वत:च्या पेशाचा अनादर न करता मुलांना त्यांचे स्वतंत्र मार्ग निवडायला सक्षम बनवणं. हेच तर पालकांचं कर्तव्य असतं. मी शकुताईंना म्हटलं, ‘‘कलेच्या प्रांतात तुम्ही जेवढी उंची गाठली, जे यश मिळवलं तेवढय़ाच उंचीचं हे यश आहे. पालक म्हणून तुम्ही दुहेरी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.’’
बाई फक्त हसल्या..
चौकोनी रंगमंचावरून सारं अवकाश आपल्या नजरेच्या धाकात ठेवणाऱ्या शकुताईंना काहीच अवघड वाटत नसणार. म्हणून तर आपण जन्म दिलेल्या अंकुरांची ‘लावणी’ त्यांनी वेगळ्या संस्कृतीत केली आणि तिथेही त्यांना सहजपणे फुलू दिलं. असं फुलवणं हे ही सर्जनशील कलावंताचंच काम आहे नाही का?
vasantivartak@gmail.com

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
sunil gavaskar supports rohit sharma
कसोटी क्रिकेटसाठी दृढनिश्चय आवश्यक! रोहित शर्माच्या वक्तव्याचे गावस्करांकडून समर्थन