अवघ्या २६ व्या वर्षी, जिनं बाहेरचं जग फारसं बघितलंच नाही अशी स्त्री पदर खोचून ताठ उभी राहते, पतीविना मुलांना वाढवते. तेव्हा त्या कष्टांनाही आनंदाचं मोल लाभतं. गीता झेंडेची ही कथा.
गीता. सातवी पास. गावातल्या शाळेतली चुणचुणीत मुलगी. छोटं शेत, स्वत:चं घर, आई-वडील आणि एकच भाऊ. तेराव्या वर्षांपर्यंत घराच्या छायेत सुखात गेलं बालपण. तुझं स्वप्न काय होतं, असं विचारलं तर गीता सांगते, ‘‘गावात सातवीपर्यंतच शाळा. शहरात पाठवून शिकवतील अशी शक्यताच नव्हती आणि वडिलांनी त्यांच्या चुलतबहिणीच्या मुलाला मुलगी द्यायची हेही आधीच ठरवलं होतं. त्यामुळे वेगळी स्वप्नं वगैरे पाहण्याचा प्रश्नच नव्हता. आई-बाबा सांगतील ते ऐकायचं. लग्न करून सासरी जायचं. आणि आईला नावं ठेवतील असं वागायचं नाही, ही पक्की खूणगाठ!’’
वयाच्या सोळाव्या वर्षी गीताचं लग्न झालं. पती सुधाकर झेंडे रिक्षा चालवत होते. गावाकडे शेती, ठाण्याला एक खोली. सुरुवातीला गावाकडे पूजा-अर्चा आटोपल्यावर गीता ठाण्याला आली. एका खोलीत दीर-जावेसोबत सुधाकर-गीताचाही संसार सुरू झाला. दोघांच्या खर्चापुरते पैसे मिळत होते. पहिल्याच वर्षी बाळंतपणाला गीता गावी गेली. मुलगा झाला. आणि बाळासह ती सासरी, गावीच राहिली तब्बल ४ र्वष. ‘का’ असं विचारायची पद्धत नव्हती. दुसराही मुलगा झाला आणि मग त्याच्या शाळेसाठी गीताला ठाण्याला यायला मिळालं. ठाण्याला जेमतेम ३-४ र्वष बरी गेली. अन् सुधाकर आजारी पडला. दोन-अडीच र्वष आजारीच होता. गीता सांगते, ‘‘चांगला होता स्वभावानं आणि वागायलाही सरळ. त्याला ना व्यसन, ना नाद. पण तापाच्या उपचारात त्याला रक्त चढवलं त्यातून काही संसर्ग झाला असणार. खंगून गेला तो.’’ तोपर्यंत कधी घरकाम किंवा शेतावर काम करावं लागलं नव्हतं गीताला. पण आता पहिली जाणीव झाली ती मुलांच्या जबाबदारीची. गावाकडे मानानं राहणं अवघड झालं. भाऊ आणि आईनं आग्रह धरला, ‘‘माहेरी चल, तू आम्हाला जड नाहीस.’’ पण गीताला वाटलं, उद्या भावाचा संसार सुरू होईल, आपण त्याच्यावर ओझं टाकू नये.
स्त्रीमध्ये उपजत अनेक शक्ती असतात. परिस्थितीच्या आचेनं त्यातल्या जरूर त्या क्षमता जागृत होतात आणि कामाला लागतात. नाही तर अवघ्या
२६ व्या वर्षी, जिनं बाहेरचं जग फारसं बघितलंच नाही अशी स्त्री पदर खोचून ताठ उभी राहते, तिच्या स्वाभिमानाला अंकुर फुटतात आणि रडत न बसता ती आलेल्या संकटाला तोंड देते, हे विलक्षण आहे. त्याचा प्रत्यय लगेचच आला.
सुधाकर असतानाच जावेची आणि गीताची चूल वेगवेगळी होती. मुलांना घेऊन आल्यावर गीताच्या लक्षात आलं की माळ्यावर दिवा, पंखा लावण्यासाठी आपल्याला परवानगी घ्यावी लागते. खोली सासऱ्यांच्या नावावर आणि मीटर नाही हे कसं, म्हणून ती बोर्डाच्या ऑफिसात चौकशीला गेली. ही बातमी दिरानं गावी कळवल्याबरोबर साऱ्यांचं धाबं दणाणलं. त्यांना वाटलं, गीता खोलीवर ताबा मिळवायला बघतेय. सारे धावत आले गाडी करून.. जुनी बिलं राहिली म्हणून मीटर कट झालं होतं. गीतानं ओळखी काढून, अधिकाऱ्यांना नवऱ्याच्या दुखण्याविषयी सांगून, गोड बोलून काम करून घेतलं. पण नात्यांमध्ये मिठाचा खडा पडलाच.
पण कणखर गीतानं परिस्थिती सांभाळली. ठाण्याला तिनं भराभर घरकामं धरली. एकदा कामावर जायला उशीर झाला म्हणून रस्त्याने चक्क धावत निघाली होती, तर गावाकडचे एक भाऊ भेटले. त्यांनी तिला मोटारसायकलवरून चौकात सोडलं. झालं.. घरी आल्यावर तिला जाब विचारला गेला. तिनं शांतपणे एका वाक्यात सांगितलं, ‘‘पुढे-मागे जर माझं काम सुटलं तर ज्याची माझ्या मुलांची जबाबदारी घेण्याची तयारी आहे, त्यानंच मला जाब विचारावा. बाकीच्यांनी नाही.’’ नंतर तिच्यावर कुणी अविश्वास दाखवला नाही.
सुधाकर वारले तेव्हा मोठा स्वप्निल चौथीत होता, तर धाकटा नीलेश दुसरीत. मुलं अभ्यास करीनात. दिवसभर वाडीत भटकत. म्हणून गीतानं त्यांना उरुळी कांचनच्या वसतिगृहात घातलं. दोघांचे मिळून महिना चार हजार द्यावे लागत. शिवाय येणं-जाणं- कपडे- खाऊ वेगळाच. दर महिन्याला आई भेटली की मुलं धो धो रडायची. स्वत:चे आसू लपवत गीता त्यांची समजून घालायची. एकदा ट्रेनमध्ये तिला एका गृहस्थांनी रडताना पाहिलं. त्यांनी चौकशी केली आणि गीताला वाघोलीच्या जैन संघटनेच्या वसतिगृह आणि शाळेचा पत्ता दिला. गीता त्याच पावली वाघोलीला गेली. तिथली उत्कृष्ट व्यवस्था, शिस्त पाहून आनंदली. अनाथ मुलांना तिथे सारंच मोफत होतं. गीताचा हात हलका झाला आणि मुलंही वाघोलीत रमली.
मुलांना लहानपणापासूनच आईच्या कष्टांची जाणीव होती. धाकटा नीलेश सांगतो, ‘‘मी लहान असताना एकदा आईबरोबर शेतावर गेलो होतो. साऱ्यांनी दुपारची भाकर आणली होती. पण आमच्या घरातून आईला भाकरसुद्धा दिली नव्हती. इतर मजूर बायकांनी आम्हाला थोडं थोडं जेवण दिलं. तेव्हाच ठरवलं की लौकर काम करून आईला आराम द्यायचा.’’ नीलेश गणितामुळे बारावीतच अडकलाय. पण एका ऑफिसमध्ये शिपायाची नोकरी करीत आईला हातभार लावतोय. मोठा स्वप्निल बारावी पास होऊन इलेक्ट्रिशिअनचा कोर्स करतोय. आईशी कधी निवांत भेट होत नसे. आईचा सहवास नाही. एवढं सोडलं तर त्याचीही कसलीच तक्रार नाही. तो म्हणतो, ‘‘आता आईला साऱ्या गावात मान आहे. दुसऱ्यांच्या अडचणीला ती धावून जाते. तिनं कधी कुणाकडे काही मागितलं नाही याचं गावात कौतुक आहे.’’
सुरुवातीच्या काळात गीताच्या आईनं आणि भावानं मदत केली. केशवमामानं दर महिन्याला होस्टेलला जाऊन मुलांकडे पाहिलं. मुलांना आजोळचा खूप लळा आहे. आधार आहे. आता गीता ठाण्याच्या मनोरुग्णालयात आयाकाम करते. मुलांच्या हौसमौजेला पुरी पडते. रामदास स्वामींवर तिची खूप श्रद्धा! आणि धर्माधिकारींच्या बैठकांमधलं सगळं तत्त्वज्ञान ती आचरणात आणायचा प्रयत्न करते. तिची छोटीशी मूर्ती धिटाईनं मनोरुग्णांनाही धाक दाखवताना पाहिली की वाटतं, हे हिला कुणी शिकवलं असेल? हा कणखरपणा, ही धिटाई गावाकडच्या मातीतच असेल की परिस्थितीच्या आघातातून उसळली असेल? स्वत: जळून इतरांना प्रकाश देणाऱ्या ज्योतीलाही कधी कधी काजळी धरते, पण गीता कधीच निराश दिसत नाही. तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळत नाही. तिला स्वत:लाही न्यूमोनिया आणि नंतर क्षयरोगाशी सामना करावा लागला होता. पण ती खचली नाही. पूर्ण बरी होऊन कामावर रुजू झाली. रुग्णांना व्हॅनमधून नेणं-आणणं, घरी पोहोचवणं या जबाबदाऱ्याही कणखरपणे पार पाडायला लागली.
‘लेकराची माय, तुये पाखराचे पाय..’ या लोकगीताप्रमाणे सारखी वाघोलीला मुलांकडे झोपवणारी गीता, तिनं पस्तिशी ओलांडली. मुलं जवळ राहायला आल्यानं थोडी सुखावली. मुलांना नोकरी लागली चांगली की माझी जबाबदारी संपली अशी निवृत्तीची भाषा करायला लागलीय ती. देव करो आणि तसंच होवो. पण वाटतंय, समोरून आलेलं प्रत्येक संकट आपल्या कणखर हातांवर झेलणाऱ्या स्त्रीसाठी शुभेच्छा, देवाकडे तरी का मागायच्या?
आपण असं म्हणू या, ‘‘बाई, आजवरची तुझी शक्ती वृद्धिंगत होऊ दे, भविष्यातली तुझी वाट निष्कंटक असू दे, चंद्राची शीतलता तुझ्या सोबतीला राहू दे आणि तुझ्या ‘मातृत्व वसा’ची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होऊ दे!
vasantivartak@gmail.com