‘‘पुन्हा बॉल आला घरात तर विळीवर कापून, दोन तुकडे करून देईन. ब्लडी स्वाईन्स!’’ जनार्दनकाकांची ही शापवाणी ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि ही केवळ पोकळ धमकी नसायची. एकदा त्यांनी खरंच आमच्या सहा रुपयांच्या लाल, रबरी बॉलच्या दोन करवंटय़ा करून खिडकीतून बाहेर फेकल्या होत्या. तो बॉल त्यांनी विळीवर कापला की मलेशियाहून आणलेल्या त्यांच्या खास सुऱ्यांनी कापला.. त्यांचं त्यांनाच ठाऊक. जनार्दनकाकांचं घर म्हणजे देशोदेशीहून जमवलेल्या वस्तूंचा अजबखानाच होता. अर्थात मी ते घर आतून खूप नंतर पाहिलं. त्यांच्या त्या दोन खोल्यांच्या घराबद्दल मी कथाच खूप ऐकल्या होत्या. जनार्दनकाकांच्या घराच्या मधोमध म्युझिकवर पाणी उडवणारा एक कारंजा आहे अशी आमच्या लहानपणी खूप अफवा होती.

जेहत्ते काळाचे ठायी कधीतरी जनार्दनकाका कुठल्यातरी परदेशी कंपनीत नोकरीला होते. त्या नोकरीच्या निमित्तानं त्यांनी खूप जग पाहिलं असावं. आणि तिथूनच या तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू जमवल्या असाव्यात. आम्ही जेव्हा लहानाचे मोठे होत होतो तेव्हा जनार्दनकाका म्हातारपणची उत्तम सोय करून, बऱ्यापैकी पैसे कमावून रिटायर झाले होते. तेव्हा ते फारसे म्हातारेही नसावेत खरं तर. पण जसं अश्मयुगात कधीतरी ए. के. हंगल ‘बेटीऽऽऽ’ हाक मारतच जन्माला आले असा आपला ठाम समज असतो, तसेच जनार्दनकाकाही वटारलेले डोळे आणि कपाळावर आठय़ा घेऊनच जन्माला आले असा आमचा दृढ विश्वास होता. ‘तुम्हा इंडियन्सच्या बुडावर हंटर हवा सतत..’ काका पेटले की मुठी आवळून म्हणायचे. ‘हं, आम्ही इंडियन्स.. आणि यांचा जन्म लंडनच्या पुलाखालीच झालाय जणू!’ आम्ही आपले आपापसात कुजबुजायचो. ब्रिटिश सत्तेवर सूर्य न मावळण्याच्या काळातला एखादा अकाली मेलेला रावबहाद्दूरच काकांच्या रूपात जन्माला आलाय असं आम्हाला वाटायचं. शाळेतून येताना बऱ्याचदा नाक्यावर जनार्दनकाका कुणाशी तरी भांडताना दिसायचे. त्या काळात रस्त्यावर गाडय़ा फार कमी असायच्या. आमच्या अख्ख्या गल्लीत मिळून नेरकरांची एक प्रीमियर पद्मिनी होती. एकदा जनार्दनकाका नेरकरांना जवळजवळ कॉलरला धरून त्यांना कशी गाडी चालवायची अक्कल आहे, पण लावायची अक्कल नाही, हे सांगत होते. ‘आमच्या इंग्लंडमध्ये असतात तर यू वुड हॅव बिन फाइन्ड् सर! गुड डे टू यू सर..’ असं म्हणून जनार्दनकाका तरातरा निघून गेले. ते सदैव कुठल्या तरी मिशनवर असल्यासारखेच चालायचे. पुढे मी वुडहाऊसची पुस्तकं वाचायला लागल्यावर ब्रिटिश लोक एखाद्याचा अपमान करून त्याला फुटवताना ‘गुड मॉर्निग’ किंवा ‘गुड डे’ म्हणतात हे कळल्यावर मला जनार्दनकाकांचीच आठवण झाली होती.

काकांच्या काकू फारशा नजरेला पडत नसत. काकूंना मी घराबाहेर, रस्त्यावर फार क्वचितच पाहिलंय. त्यांच्या खिडकीत तुळशीला पाणी घालत उभ्या राहिलेल्या काकूच आठवतात. शाखेत ठेवलेल्या महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याप्रमाणे त्या अध्र्याच दिसायच्या.

काकांना एक मुलगाही होता. आमच्यापेक्षा वयानं मोठाच होता. शाळा पास झाल्यावर तो पुढच्या शिक्षणासाठी कुठेतरी निघून गेला असावा. ‘काकानं वशिला लावून ऑक्सफर्डलाच पाठवला असेल त्याला..’ आमच्यातलं कुणीतरी एकदा तुच्छतेनं म्हणालं होतं.

पुढे जुनी गल्ली सुटली. जुनी माणसं सुटली. पण तरी जुन्या जगातल्या खबरी कानावर पडत असत. या मधल्या काळात काकांची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली. पण काकांचा त्या रिडेव्हलपमेंटला तीव्र विरोध कसा होता, मग अख्खी बिल्डिंग रिकामी झाल्यावरही ते एकटेच भुतासारखे त्या इमारतीत कसे राहत होते (एव्हाना काकू आपला अर्धाकृती पुतळ्याचा अवतार संपवून फोटोफ्रेममध्ये स्थिरावल्या होत्या.) आणि मग कसं त्यांच्या मुलानं एक दिवस त्यांना जवळजवळ जबरदस्तीनं उचलून बदलापूरला आपल्या घरी नेलं, याची हकिगत कानावर येतच होती. हे ऐकल्यावर काकांचा राग येण्यापेक्षा त्यांची दयाच जास्त आली.

दोन वर्षांपूर्वी ‘आपल्या वाडीतले जुने रहिवासी आणि आताचे आघाडीचे कलावंत’ म्हणून माझा सत्कार झाला. गल्लीतल्याच मुलांनी बसवलेलं कोळीनृत्य पाहत मी पहिल्या रांगेत बसलो होतो. त्याचवेळी कुणीतरी माझ्या कानात येऊन सांगितलं की, जनार्दनकाकांना मला भेटायचं आहे. काकांचं नाव ऐकून मी चमकलोच. ‘काका अजून आहेत?’ माझ्या तोंडून पटकन् निघून गेलं. दुसऱ्याच क्षणी माझी मलाच लाज वाटली. सत्कारबित्कार झाल्यावर मी काकांच्या घरी गेलो. ज्या घरात केवळ आमचे चेंडू गेले आणि दोन तुकडे होऊन परत आले त्या घरात शिरताना थोडी गंमत वाटली. पण लहानपणी काकांच्या घराबद्दल दंतकथा ऐकल्या होत्या तसं काहीच नजरेस पडलं नाही. म्युझिकवर पाणी उडवणारं कारंजं नव्हतं! कोपऱ्यात एक टी. व्ही. आणि हॉलमध्येच एक लोखंडी खाट याव्यतिरिक्त फारच कमी सामान होतं खरं तर. जे होतं ते अत्यंत साधं, बेसिक होतं. त्याच खाटेच्या मधोमध काका बसले होते. ‘चिन्मय! कम इन.. कम इन.’ दुसऱ्याच क्षणी माझ्या लक्षात आलं, की काकांची दृष्टी गेलीय. ‘तुझ्या मालिका ऐकतो मी.. तुकाराम!’ मी काकांशेजारी बसलो. ज्या माणसाबद्दल लहानपणी आपल्या मनात द्वेष ही एकमेव भावना होती, त्यांना असं पाहून मला नाही म्हटलं तरी थोडं गलबलून आलं. ‘विनोद  बदलापूरलाच असतो का?’ मी आपलं काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. ‘हो. महाल बांधलाय जवळजवळ त्यानं. पण माझं मन तिथे रमत नाही. इथल्या गटारांचा वासच वेगळा!’

मी काकांजवळ वीसएक मिनिटं बसलो असेन. काकांना बहुतेक बऱ्याच दिवसांनी कुणीतरी बोलायला मिळालं असावं. ‘इंग्लंड! व्हॉट पुट धिस रिडीक्यूलस आयडिया इन युवर हेड! मी लंडन काळं का गोरं ते पाहिलं नाहीये. नेवर बिन देअर.’ ही माहिती धक्कादायक होती. येता-जाता इंग्लंडच्या राणीच्या नावानं जप करणारा माणूस.. ‘आमच्या इंग्लंडमध्ये असतात तर..’चं पालुपद आळवणारा माणूस.. समोरच्याचा अपमान करताना त्याला ‘गुड मॉर्निग’ म्हणणारा माणूस.. हा इंग्लंडला कधी गेलाच नव्हता! ‘माझी नोकरी तीन र्वष बर्मा आणि मग जकार्ताला. मी कुठला जातोय इंग्लंडला?’ बेचाळीसच्या आंदोलनात चौदा वर्षांचा जनार्दन एक दिवस जेलमध्ये बसून आला, हेही कळलं. ‘पण त्यानंतर वी ऑल वेन्ट टू डॉग्ज्. आणि प्रॉब्लेम काय आहे- आपल्या दुर्गतीसाठी ब्लेम करायला देवानं आपल्याला दोन कारणं दिलीत. राजकारणी आणि पाकिस्तान! पण ते सगळं खोटं आहे. राजकारणी नालायकच असतात. सगळीकडे. पण लोकांनी आपली लायकी सांभाळायला हवी. द डे वी स्टॉप स्पीटिंग ऑन रोडस् अ‍ॅण्ड स्टॉपिंग एट रेड लाइटस्.. दॅट इज द डे माय बॉय! तोवर आपलं काही खरं नाही. वी आर द रीझन ऑफ अवर ओन मिझरी!..’ काका असं बराच वेळ बोलत राहिले. त्या बोलण्यातही दोन-तीनदा ते ‘आमच्या लंडनमध्ये हे असं नसतं..’ वगैरे बोललेच. मी त्यांचा निरोप घेऊन निघालो. बाहेरच बालपणीचे जुने मित्र भेटले. ‘एवढा वेळ काय बोलत होता म्हातारा?’ एकानं मला विचारलं. मी मान हलवून ‘काही नाही’ म्हटलं. गाडीत बसलो.

aquarian2279@gmail.com