एक माणूस आणि कलाकार म्हणून निरनिराळ्या वाटांवर चालताना भेटलेली कितीएक माणसं.. साधी, अनवट, विक्षिप्त, बुद्धिमान, कलासक्त, ध्येयवेडी, सर्जनशील वगैरे.. त्यांची शब्दचित्रं!

१९९७ सालच्या जुलै महिन्यात आमच्या कॉलेजच्या एका भिंतीवर एक पोस्टर लागलं होतं. त्या पोस्टरनं माझं आयुष्य बदललं. ‘संवेदना’ आयोजित एका अभिनय शिबिराचं पोस्टर होतं ते. याच शिबिरात  अमर भेटला. ‘मेरा नाम जो है- अमरजीत आमले.’ अमरचं हे पहिलं वाक्य. अमर या शिबिराचा आणि पर्यायानं ‘संवेदना’ या संस्थेचा कर्ताधर्ता होता. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर ‘गुडफादर’!

Nashik Citylink bus
परीक्षा काळातच नाशिकची सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प
Demolition of Shiv flyover delayed again due to examinations Mumbai
मुंबई: परीक्षांमुळे शीव उड्डाणपुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर
Mumbaikars should have a referendum on Mahalakshmi Race Course proposal ex-BJP corporators demand
महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावावर मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी
one labourer killed 4 injured in wall collapse in nalasopara
नालासोपाऱ्यात भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू; ४ मजूर गंभीर जखमी

त्याचं खरं नाव- सुरेश नथुराम आमले. ‘अमरजीत’ हे त्यानं घेतलेलं नाव. अभिनयाच्या किडय़ानं डसलेला चारचौघांसारखाच असावा आधी. त्याच मिषानं या मायासृष्टीकडे ओढला गेला असावा. पण पुढे अमरच्या  वाटा बदलत गेल्या. आजही त्याची नेमकी वाट कुठली, याबद्दल अनेकांची मतांतरं आहेत. सुरेश आमलेची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच. वडील नव्हते. आई, एक भाऊ आणि हा. शिक्षण अर्धवट सोडलेलं. पण नंतर खटपटीनं बँकेत नोकरी लागली. मग शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा कीर्ती महाविद्यालयात प्रवेश घेतला. आणि हे सगळं करताना तो स्टार व्हायची स्वप्नं बघत असावा! नाही, चुकलं. तो स्वत: स्टार बनण्याची स्वप्नं बघण्यापेक्षा आजूबाजूच्या सामान्य, नाटकवेडय़ा मुलांना ‘स्टार’ कसं बनवता येईल याची स्वप्नं बघत असावा.

मी ते अभिनयाचं शिबीर केलं. शिबीर संपलं. शिबिरात निर्मल पांडे, किशोर कदम यांच्यासारखी मोठी मोठी माणसं येऊन गेलेली. याच शिबिरामुळे एन. एस. डी. नावाच्या संस्थेबद्दल कळलेलं. वय वर्ष सतरा. कम्प्लीट डोकं फिरायचं वय. वडील बँक कर्मचारी. कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये अभिनय केला तर कौतुकानं चार मित्रांना सांगतील, पण अभिनयात करिअरबिरिअर करतो म्हटलं तर ‘लेकाला भिकेचे डोहाळे लागलेत!’ म्हणून हताश होतील; अशी परिस्थिती.

एके दिवशी घरच्या नंबरवर अमरचा फोन आला. ‘क्या कर रहा है?’ (हिंदी सिनेमात काम करायचं तर हिंदी चांगलं हवं. यासाठी त्यावेळी ‘संवेदना’तली सगळी माणसं हिंदीतच एकमेकांशी बोलत.)

‘कुछ नहीं.’

‘दादर स्टेशन पे मिल रात को.’ त्या दिवशी ट्रेनमधून दादर स्टेशनवर उतरताना मला हे माहीत नव्हतं, की पुढची सहा र्वष असंख्य रात्री मी याच स्टेशनवर काढणार होतो.

‘वडिलांचं नाव धर्मेद्र देओल आहे? यश चोपडा आहे? नाही ना.. मग कोण करणार तुम्हाला स्टार? इंडस्ट्रीत गॉडफादर लागतो. घुसायचं तर मिळून घुसायचं. एकटय़ानं नाही. त्यासाठीच ‘संवेदना’ आहे. हा ग्रुप नाही, परिवार आहे. आपण एकमेकांचे गॉडफादर. मी तुमचा ‘गुडफादर’!’

अमर अचाट बोलायचा. भारावून जायला व्हायचं. पण या गुडफादरचं ऐकून सळसळत्या रक्तानं घरी परत यावं तर तिथे खरेखुरे फादर गुड सोडून बॅड, अग्ली सगळं झालेले असायचे. आपल्या मुलानं सी. ए. व्हावं, वकील व्हावं; ही अ‍ॅक्टर बनण्याची थेरं कुठली? पुढे माझ्या वडिलांमधला आणि माझ्यातला हा संघर्ष खूप चिघळला तेव्हा मी अमरशीच बोललो. ‘तेरे बाप को मिलता हूं जाके.’ मी काही म्हणायच्या आत फोन ठेवला होता त्यानं. मला आमचे तीर्थरूप देना बँक- मरीन लाइन्स ब्रांचमधून एका माणसाला बखोटं धरून बाहेर हाकलतायत असं चित्र दिसू लागलं. संध्याकाळी  बाबा घरी आले. मी भीत भीत विचारलं, ‘अमर आला होता का?’ बाबा काही क्षण विचारात बसून राहिले. मग म्हणाले, ‘चांगला मुलगा आहे. फक्त बोलतो खूप. आणि त्यातही सतत हिंदी बोलतो.’ एवढंच. अमरने मला एक मोठी लढाई परस्पर जिंकून दिली होती. ‘तुमचा मुलगा एन. एस. डी.ला जाऊन शिक्षण घेईल. पुढे तो अभिनय क्षेत्रातच करिअर करेल,’ हे तो माझ्या वडिलांना परस्पर समजावून आला होता. आणि आश्चर्य म्हणजे त्यांना ते पटलंही होतं. आणि हे फक्त त्यानं माझ्यासाठीच केलं असं नाही. ‘संवेदना परिवार’ (हो. एव्हाना ऑफिशियली ‘संवेदना’चा ‘संवेदना परिवार’ झाला होता.) या संस्थेतल्या प्रत्येकासाठी त्यानं हे केलं. कारण आम्ही सगळीच मुलं-मुली कनिष्ठ किंवा मध्यमवर्गीय घरांमधली. काहींचे तर मुंबईत राहायचे वांधे. पण अमरनं सगळ्यांचा ठेका घेतला होता. मधल्या काळात बँकेच्या नोकरीलाही लाथ मारून झाली होती. कशी, ते तपशील सांगत बसलो तर जागा अपुरी पडेल. पण अमर प्रत्येकासाठी असायचा.

त्या काळात मोबाइल नव्हते. तरीही अमरचा जनसंपर्क अचाट होता. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षांला असताना तर रोज संध्याकाळी सहा-साडेसहाला अमरला भेटायचं आणि तो बोट धरून नेईल त्याच्या मागे जायचं असा माझा दिनक्रमच झाला होता. बरं, कधी कुणाच्या पंक्तीला नेऊन बसवेल याचा नेम नाही. मी अमरबरोबर भलभलत्या ठिकाणचे भुर्जीपावही खाल्लेत आणि अमरबरोबरच सुभाष घईंच्या पार्टीतही गेलोय. दादर स्टेशनवर शेवटची ट्रेन चुकली म्हणून रात्र काढलीय. आणि अमरबरोबरच जॅकी श्रॉफ यांच्या पर्सनल व्हॅनिटीत बसून अडीच तास त्यांच्या गप्पाही ऐकल्या आहेत. कारण अमर कुणालाही थेट जाऊन भिडायचा. ‘हम थिएटर करनेवाले मिडल क्लास लडके-लडकीयां हैं. आप  हमारे लिये एक वर्कशॉप लीजिए,’ असं थेट नसीरुद्दीन शाहांना सांगून आला होता. आणि नसीरजींनी दामू केंकरेंच्या घराच्या तळमजल्यावर आमच्यासाठी तीन दिवसांचं वर्कशॉप घेतलंही होतं! ‘सत्या’ पिक्चर पाहिला. आम्ही भिकू म्हात्रेच्या कौतुकात असताना अमर कुठूनतरी पत्ता काढून थेट लेखक-अभिनेते सौरभ शुक्लांना भेटूनही आला. ‘हमारे लिये नाटक कीजिए,’ असं थेट आवाहन! आणि सौरभसरांनी त्यांच्या फिल्मी करिअरच्या शिखरावर असताना मुंबईतल्या आम्हा अनोळखी मराठी मुलांना घेऊन ‘काल’ नावाचं एक अस्खलित हिंदी नाटक केलं होतं. आमच्यातल्या एकीला मेकअपमध्ये इंटरेस्ट होता; तिची थेट विक्रम गायकवाडांशी गाठ घालून दे.. अदलीमधली बातच नाही. अमरनं ही एरवी घट्ट बंद वाटणारी कपाटं आमच्यासाठी सहजगत्या उघडली आणि आम्हाला मुक्तहस्ते हवं ते घेऊ दिलं.

माझ्या एन. एस. डी.च्या परीक्षेला अमर माझ्याबरोबर दिल्लीला आला. माझ्याचबरोबर त्याची तेव्हाची प्रेयसी आणि आताची बायको कविताही परीक्षेला होती. तिची निवड नाही झाली; माझी झाली. पण अमरच्या चेहऱ्यावर फक्त निखळ आनंद दिसला. कुठल्याही प्रायोगिक संस्थेचं पुढे जे होतं ते ‘संवेदना परिवार’चंही झालं. अनेक फाटे फुटले. त्यातल्या काहींना अमरच जबाबदार होता. ‘संवेदना’ नावाचं नियतकालिक सुरू करण्याचा घाट घालून त्यानं आम्हा सगळ्यांनाच तिथे जुंपलं अणि तिथून फाटाफूट सुरू झाली. मी एन. एस. डी.ला निघून गेलो. अमरशी संपर्क तुटला. परत आल्यावर चौकशी केली तेव्हा कळलं, अमरनं आता दुसरी संस्था सुरू केलीय. दुसरा परिवार. माझ्या नाटकांच्या प्रयोगांना आवर्जून यायचा, पण फारसा बोलायचा नाही. २००५ साली वडील गेले तेव्हा खूप रात्री एकदा आला. हात धरून बसला. फारसं न बोलता गेला. मागच्या वर्षी ‘समुद्र’ पाहायला आला. तेव्हा मात्र तो खऱ्या अर्थानं खूश दिसला.  प्रयोग संपल्यावर चहा प्यायला गेलो. इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर मी विचारलं, ‘अमर, तुझं काय?’ अमर हसला. डोळ्यांनी हसतो तो. ‘मिशन सुरू आहे. थांबायचं नाही. राळेगणसिद्धीला  चाललोय. तिथे एक वर्कशॉप करतोय.’ त्या दिवशीही चहाचे पैसे अमरनेच दिले. माझ्याकडे त्यावेळी कदाचित त्याच्यापेक्षा ते कैकपटीनं जास्त होते. तरीही मी त्याला ते देऊ दिले. काही बापांसमोर आपण मोठं न झालेलंच बरं असतं.. आपल्यासाठी!

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com