ज्येष्ठ नाटय़-दिग्दर्शक मोहन महर्षी २००३ च्या नोव्हेंबर महिन्यात आम्हा राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांबरोबर ‘सांप सिढी’ नावाचं नाटक बसवत होते. इनाम उल हकनं आदल्या दिवशीच भर वर्गात जाहीर केलं होतं, की त्याला या नाटकात काम करायचं नाही़  आणि सरांना विनंती केली होती, की त्यांनी त्याला एक अभ्यासक म्हणून या नाटकाच्या प्रक्रियेबद्दल एखादा प्रोजेक्ट करू द्यावा. कडक इस्त्रीच्या महर्षीसरांनी थोडा विचार करून इनामच्या या अजब मागणीला अनुमती दिली होती.

त्या दिवसापासून इनाम रिहर्सल हॉलच्या एका कोपऱ्यात एक वही आणि पेन घेऊन बसू लागला. तो त्या वहीत काय लिहीत होता, आम्ही कधीच विचारायला गेलो नाही. आम्ही सगळे त्याला मनोमन मूर्ख आणि वेडा ठरवून मोकळे झालो होतो. एन. एस. डी.चा थर्ड इयर स्टुडंट नाटकात भूमिका करायची सोडून कारकुनासारखा वहीत खरडत कसला बसतो! त्या दिवसांमध्ये इनाम कधी नव्हे इतका शांत आणि गप्प गप्प झाला होता. तालमीच्या वेळी तो निमूट वर्गात येई. तोंडून एक शब्दही न काढता आपला कोपरा धरून बसून राही. डोळे आणि कान उघडे. तोंड बंद! तिसऱ्या दिवशी इनाम वर्गात एक टेपरेकॉर्डर घेऊन आला. महर्षीसरांनी प्रश्नार्थक भुवई उंचावली. इनाम नम्रपणे म्हणाला, ‘‘सर, आप क्लास में बहुत अहम बातें करतें हैं. मैंने सोचा रेकॉर्ड कर लूं. डॉक्यूमेंटेशन होता रहेगा. और अ‍ॅक्टर्स को भी फायदा होगा.’’ महर्षी सुखावले! त्यानंतर ते इनामच्या टेपरेकॉर्डरमध्ये आपला आवाज रेकॉर्ड होईल अशा बेतानेच बोलतायत असा आम्हाला भास होत असे. आणखी चार दिवसांनी इनाम वर्गात एक हॅण्डी-कॅम घेऊन अवतरला. ‘‘सर, रेकॉर्ड करने के बजाय अगर शूट करूं तो सभी के लिये ज्यादा सुविधा होगी.’’ रात्री मच्छर अगरबत्तीच्या संहारातून जीव वाचवून सकाळी घरात चुकार अवस्थेत उडणाऱ्या भटक्या डासाकडे आपण दुर्लक्ष करतो़, तसं एव्हाना महर्षीसर इनामकडे दुर्लक्ष करू लागले होते. त्यामुळे त्याच्या हातातल्या त्या बुडकुल्यासारख्या कॅमेऱ्याला त्यांनी सेकंड लूकही दिला नाही. त्यानंतर इनामचा एक वेगळाच उच्छाद सुरू झाला. तो ज्याला त्याला गाठून ‘‘तुझे क्या कहना है इस प्रोसेस के बारे में?’’ असे प्रश्न विचारू लागला. आमच्यापैकी कुणीच त्याला सीरियसली घेत नसल्यामुळे आम्ही मन मानेल ते त्याच्या कॅमेऱ्यासमोर बोलत होतो.

nagpur shivshahi bus accident marathi news
नागपूर : भरधाव शिवशाही बसने वाटसरूला उडवले
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
1st April Marathi Rashi Bhavishya
१ एप्रिल पंचांग: महिन्याचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल? ‘या’ राशींच्या लोकांसाठी धन व प्रगतीचे संकेत
mukhtar ansari death gangster turned politician buried near his parents graves in ghazipur
मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाचे दफन

हा काळ होता २००३ सालचा. कॅमेरा ही गोष्ट किती विघातक आहे हे तोवर जगाला पूर्णपणे कळायचं होतं. लोकांच्या खिशात मोबाईल फोन्सही तेव्हा अभावानं सापडत. आणि मोबाईलमधला कॅमेरा नामक उच्छाद जगात अवतरायचा होता. त्यामुळे आम्ही इनामच्या कॅमेऱ्यासमोर बेधडक हवं ते बोलत होतो. तो माझा इंटरव्ह्यू घ्यायला माझ्या खोलीत आला तेव्हा मी फक्त कमरेला लुंगी गुंडाळून कसलाही विचार न करता छताकडे पाहत पडलो होतो. (गेले ते दिन गेले!) ‘‘कम से कम शर्ट तो पहन ले..’’ इनाम कॅमेरा रोखत म्हणाला. ‘‘सच हमेशा नंगा होता है मेरी जान!’’ मी शेषशाई विष्णूच्या पोझमध्ये पहुडत म्हणालो. त्याच्या कॅमेऱ्यासमोर मी तेव्हा काय बोललो हे आता मला आठवतही नाही. पण माझ्या सुदैवानं मी फारसं काही विस्फोटक बोललो नसावा. त्यानंतर काही दिवस इनाम स्कूलमधून अंतर्धान पावला. एव्हाना आमचं नाटक ओपन झालं होतं. ठरलेले प्रयोग झाले. महर्षीसर प्रयोग संपवून पुन्हा त्यांच्या चंदिगढ निवासी रवाना झाले. आम्ही सगळे पुढच्या येऊ घातलेल्या नाटकासाठी नव्या दमाने तयार झालो.

जानेवारी महिन्यातल्या एका रम्य सकाळी मी ऑम्लेटच्या अभिलाषेनं मेसकडे निघालो होतो. वाटेत नोटीस बोर्डवर सहज नजर गेली. आणि अचानक कुणीतरी पायातनं हाडं काढून त्या जागी जेलीचे क्यूब भरलेत असा मला भास झाला. नोटीस बोर्डवर एका ए-फोर आकाराच्या चकचकीत कागदावर एक पोस्टर होतं.. ‘आर पार : अ डॉक्युमेंटरी बाय इनाम उल हक.’ पोस्टरच्या मध्यभागी आमच्याच ‘सांप सिढी’ नाटकाचा फलक होता. आणि एखाद्या इवल्याशा खेडय़ामागे अजस्र डोंगर उभा असावा तसा पोस्टरभर मोहन महर्षीचा चेहरा होता. डॉक्युमेंटरी? ‘आर पार’? मला काहीच कळेना. पुढच्या अध्र्या तासात त्या नोटीस बोर्डसमोर दादर स्टेशनवर होते तशी गर्दी झाली होती. जो-तो टाचा उंचावून त्या पोस्टरकडे पाहत होता. सगळे जण आपापसात कुजबुजत होते. ‘‘ये क्या नया बवाल है भाई?’’ प्रत्येकाच्या तोंडी फक्त प्रश्न होते. ज्याच्याकडे उत्तर होतं तो हॉस्टेलवर रूम नंबर- ७ मध्ये घोरत पडला होता. जेहत्ते काळाचे ठाई घडले होते असे, की ‘सांप सिढी’च्या काळात इनामनं आपल्या कॅमेऱ्यावर जे जे फुटेज शूट केलं होतं, ते एडिट करून त्यानं ‘आर पार’ नावाची एक डॉक्युमेंटरी तयार केली होती. ‘सांप सिढी’ची तालीम प्रक्रिया त्यात होतीच; पण त्यानिमित्तानं एन. एस. डी.मध्ये नाटक दिग्दर्शित करायला येणारे दिग्दर्शक विद्यार्थ्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करून केवळ आपला बायोडेटा कसा तयार करून घेतात, कसं त्याच त्याच फेवरेट विद्यार्थ्यांना रोल दिले जातात, दक्षिणेकडून किंवा नॉर्थ ईस्टवरून आलेले विद्यार्थी केवळ हिंदी नीट बोलता येत नाही म्हणून कसे उपेक्षित राहतात, त्यामुळे एकच दिल्लीकेंद्रित राष्ट्रीय नाटय़ शाळा असण्यापेक्षा त्या- त्या राज्याची प्रादेशिक एन. एस. डी. हवी का?, देशाच्या बजेटमध्ये वर्षांकाठी तूट वाढत असताना एन. एस. डी. स्टुडंट्स प्रॉडक्शन्सवर कसा अवाजवी खर्च करते.. इथपर्यंत सगळ्या मुद्दय़ांवर इनामची फिल्म बोलणार होती. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात ते पोस्टर नोटीस बोर्डवर लागलं असेल. २४ जानेवारी २००३ ला त्या फिल्मचं स्क्रीनिंग एन. एस. डी.च्याच ‘लाइटिंग स्टुडिओ’त होणार होतं. मधले दोन आठवडे शाळेत दहशतीचं वातावरण होतं. आपण इनामच्या कॅमेऱ्यासमोर गंमत म्हणून जे गरळ ओकलोय ते पडद्यावर अख्ख्या फॅकल्टीसमोर उघड झालं तर आपलं काय होईल, या भीतीनं प्रत्येकजण घाबरला होता. इनामनं अकाऊंट्स डिपार्टमेंटमध्ये घुसून आलेल्या सामानाच्या पावत्याही शूट केल्या होत्या. त्यावेळी त्याला कुणीच फार मनावर घेत नसल्यामुळे लहान मुलासमोर आपण बेधडक शेजाऱ्याला यथेच्छ शिव्या घालतो तसेच सगळे वागले होते. आता ते लहान मूल सगळ्यांची चहाडी करणार होतं. लोक इनामला दिसेल तिथे गाठून ‘‘भाई, मेरा क्या दिखानेवाला है तू?’’ ‘‘बताईयों यार!’’ ‘‘मुझे पास आऊट होने के बाद रिपर्टरी में नौकरी करनी है यार! लग जाएगी!’’ अशा विनवण्या करू लागले. इनाम फक्त मंद स्मित करून निघून जायचा. ज्या चंपकनं अडीच र्वष बोलून बोलून डोकं उठवलं होतं, तो आता अचानक गप्प झाला होता. २४ जानेवारीला तो सगळ्यांच्या बुडाखाली बॉम्ब फोडणार होता.

या सगळ्यात मला एन. एस. डी.चे डिरेक्टर देवेन्द्र राज अंकुर यांचं आश्चर्य वाटत होतं. त्यांच्या एका विद्यार्थ्यांनं त्यांच्याच नाकाखाली व्यवस्थेला सुरुंग लावणारी एक फिल्म बनवली होती, आणि अंकुरजी त्याचं जाहीर स्क्रीनिंग होऊ देणार होते! ‘आधी मला दाखव. मी अ‍ॅप्रूव्ह केली तरच बाकीच्यांना..’ असंही काही नव्हतं.

अखेर तो दिवस उजाडला. आजी-माजी विद्यार्थी, फॅकल्टी, इतर स्टाफ.. प्रेक्षागृह खचाखच भरलं होतं. ‘आर पार’ या डॉक्युमेंटरीबद्दल मी एवढंच म्हणेन, की ती बनवणारा इनाम उल हक माझा मित्र.. माझा बॅचमेट आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. सगळ्यांना वाटलं होतं, की तीन र्वष स्कूलच्या नाटकांमध्ये चांगला रोल न मिळाल्याचं फ्रस्ट्रेशन इनाम या डॉक्युमेंटरीत बाहेर काढणार. पण ती डॉक्युमेंटरी सुडानं पेटलेल्या भांडखोर मुलानं बनवलेली नव्हती. अत्यंत संयत, विचारी विद्यार्थ्यांनं बनवलेली होती. सुमारे तासाभराच्या या डॉक्युमेंटरीत विद्यार्थ्यांच्या स्कूलकडून असलेल्या अपेक्षा, त्यांना सामोरं जावं लागत असलेल्या अडचणी आणि एकूणच आजच्या समाजव्यवस्थेत एन. एस. डी.सारख्या संस्थेची गरज यावर उत्तम भाष्य केलेलं आहे. आमचे इंटरव्ह्यू तीत होतेच; पण इनामनं संकलन करताना जे महत्त्वाचं आणि मार्मिक होतं तेच वेचलं होतं. कुणाचंही करिअर त्याला धोक्यात आणायचं नव्हतं  पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांची पोटतिडीक बोथटही करायची नव्हती. उघडय़ा अंगावर केवळ लुंगी लपेटून पडलेली माझी आकृती पडद्यावर दिसली तेव्हा प्रेक्षकांमध्ये शिटय़ा वाजल्या. इनामनं मला कोपरखळी मारली, ‘‘तेरा नंगा सच वैसे का वैसा रखा है!’’

काही दिवसांनी मला मंडी हाऊसच्या नाक्यावर इनाम एका माणसाशी बोलताना दिसला. मी जवळ गेलो तोवर तो माणूस त्याच्याशी हात मिळवून निघून गेला होता. आम्ही दोघं चहा प्यायला बसलो. ‘‘वो बंदा ‘आज तक’ का था. उनको ‘आर पार’ के बारे में खबर लग गई.’’ माझा चहाचा पेला हवेतच थांबला. ‘‘तो?’’ ‘‘पांच लाख का ऑफर है. फिल्म हमको दे दो..’’ इनाम चहावाल्याच्या भगभगत्या स्टोव्हकडे पाहत म्हणाला. ‘‘तू देगा?’’ ‘‘ये वल्चर्स हैं. वो अपनी अंदर की बात है. अंदर ही रहनी चाहिए.’’ वयाच्या विशीत, करिअर सुरूही झालेलं नसताना सहारनपूरसारख्या छोटय़ा गावातल्या, अकरा भावंडांच्या घरात वाढलेल्या माझ्या या मित्रानं फार मोठा मोह नाकारला होता.

शाळा संपली. कालांतरानं इनामनंही मुंबईची वाट धरली. ‘सांप सिढी’च्या अनुभवानंतर त्याचा एकूणच अभिनयातला रस संपल्यासारखा झाला होता. मुंबईत येऊन तो पंकज पराशर या बॉलीवूड दिग्दर्शकाकडं असिस्टंट म्हणून लागला. मधली र्वष त्यांच्या गतीनं उडत निघून गेली. एके दिवशी इनामचा फोन आला, ‘‘तेरा भाई अभी अ‍ॅक्टिंग भूला नहीं है.’’ ‘फिल्मिस्तान’ नावाच्या एका छोटेखानी सिनेमात इनामनं काम केलं होतं. त्या रोलसाठी इनामला त्या वर्षीचं ‘बेस्ट सपोर्टिग अ‍ॅक्टर’चं स्क्रीन अवॉर्डचं नॉमिनेशन होतं. अक्षयकुमारच्या ‘एअरलिफ्ट’नंतर मात्र इनाम सगळ्यांच्याच परिचयाचा झाला. अक्षयकुमारच्या पात्राला गुडघे टेकायला लावणारा भ्रष्ट इराकी जनरल इनामनं त्यात झोकात साकारला होता. नुकताच अक्षयच्याच ‘जॉली एलएल.बी. २’मध्येही इनाम चमकला. ‘‘पैसा बहुत है यार! ‘एअरलिफ्ट’ के बाद लोग बिना सिर-पैर के स्क्रिप्टस् ले के आते हैं. एक-एक फिल्म का बीस-बीस लाख ऑफर करते हैं. मुझे नहीं करना यार. किसी दिन वुडी अ‍ॅलन की तरह कॅमेरा उठाकर निकल पडूंगा. अपना कुछ छोटा- मोटा मीनिंगफुल फिल्म बना लूंगा.’’

इनाम आता खूप बदलला होता. आता तो ‘इन्कलाब जिन्दाबाद’ची पाटी गळ्यात अडकवून फिरत नाही. पण तो इन्कलाब त्याच्या रक्तात आहे. तो त्याला कायम अस्वस्थ ठेवेल.. त्याला कायम ‘चंपक’ ठेवेल..त्याला कायम ‘इनाम’ ठेवेल.

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com