लहानपणी आज्जी एका राजकन्येची गोष्ट सांगायची. चेटकिणीनं तिला एक शापित सफरचंद खायला घातलं आणि नंतर ती राजकन्या जी झोपली ती झोपलीच. तिच्यासाठी काळ थांबला. वेळ थिजली. पुढे एका राजपुत्रानं तिचं चुबन घेतलं आणि ती जागी झाली, वगैरे भाग केवळ ‘हॅपी एिन्डग’च्या कमíशयल दबावाखाली कथाकारानं घुसडला असावा असा माझा पक्का संशय आहे. उत्तमदादा याच कथेतल्या राजकन्येसारखा अजूनही जगतो आहे. तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना जो उत्तमदादा आमचा हीरो होता, त्याची आता दया येते. उत्तमदादा माझ्या मित्राचा- विक्रमचा मोठा भाऊ. शाळा संपल्यावर मी गिरगाव सोडून अंधेरीला राहायला गेलो. तिथे विक्रम माझा मित्र झाला. क्रिकेट खेळणे, कॉमिक्सची अदलाबदल करण्यापासून ते धडधडत्या काळजानं ‘शान’ वा ‘पिंकी’ थिएटरमध्ये मॉर्निग शोचे सिनेमे पाहायला जाण्यापर्यंत आमच्या मैत्रीचं कार्यक्षेत्र होतं. हे कुटुंब मूळ गुजराथी; पण सगळेच उत्तम मराठी बोलायचे. आज विक्रम शिंपी झालाय. वर्षांतून एखाद् वेळी भेटतो. विक्रमचे वडील वाणी कम् इस्टेट एजंट होते. त्यांचं छोटंसं पी. सी. ओ.चं  दुकानही होतं. उत्तमदादा हे दुकान सांभाळायचा. उत्तम म्हणजे एकदम जॅकी श्रॉफ! रुबाबदार. तशाच कोरलेल्या मिशा. डोळ्यात तीच बेफिक्री. तोही स्वत: जग्गूदादाचा मोठा फॅन होता. त्याच्या त्या छोटेखानी दुकानात एक भिंत जॅकीच्या पोस्टर्सने भरलेली होती. जॅकीचा सिनेमा आला की उत्तमदादा त्या सिनेमाच्या पोस्टरवर जॅकीचा पोशाख असेल तसाच पोशाख करून ‘संगम’वा ‘बहार’ थिएटरच्या आवारात फर्स्ट डे फर्स्ट शोला हजर असे. जॅकीसारखी त्यानं प्रत्येकाला ‘भिडू’ अशी हाक मारायची सवयही स्वत:ला लावून घेतली होती. एकदा चुकून त्यानं स्वत:च्या तीर्थरूपांनाच ‘भिडू’ अशी हाक मारली तेव्हा शा. सुंदरलाल यांनी तिथल्या तिथे आपल्या या सुपुत्राच्या थोतरीत ठेवून दिली होती. पण ही एक दुर्घटना सोडली तर उत्तमदादाची बाकी कारकीर्द उज्ज्वल होती. दर रविवारी आम्ही इतर कॉलन्यांशी ‘मॅच’ लावत असू. आठ-आठ आणे कॉन्ट्रिब्यूशन आणि जिंकणाऱ्या टीमला एक रबरी बॉल असं बक्षीस जिंकण्यासाठी त्या मॅचेस जीवाच्या निकरीनं खेळल्या जात. त्यात उत्तमदादा आमचा स्टार बॅट्समन होता. ओपिनगला येऊन तो प्रतिस्पर्धी संघाचा धोबीघाट घालायचा. बरं, बॅटिंग करून सगळं ग्लॅमर आपल्याकडे ओढून घेतल्यानंतर उत्तमदादा क्षेत्ररक्षण वगैरे मजुरीची कामं बिलकूल करत नसे. पहिली बॅटिंग असेल तर उत्तमदादा धावा कुटून, कॉलर वर करून निघून जात असे. आधी फििल्डग करून मग ‘टार्गेट चेस’ करायच्या वेळी तो उत्तरार्धात बेफिक्रीनं येऊन विचारी, ‘किती करायच्या?’ आणि दहापैकी आठ वेळा तो सांगितलेला धावांचा आकडा एकहाती पार करून द्यायचा. अशावेळी उत्तमदादा आम्हाला हिंदी सिनेमातल्या हीरोइतकाच ‘लार्जर दॅन लाइफ’ वाटे. शेंगदाणा उडवून तो अलगद तोंडात पकडणे, सिग्रेट पेटवल्यावर माचिस हवेत फेकून ती खिशात झेलणे, बॅटिंग करताना अझरुद्दीनसारखं ‘ग्रेसफुल’ दिसणे, यापैकी काहीतरी आपल्याला उत्तमदादासारखं जमलं पाहिजे असं तेव्हा मनोमन वाटे.

उत्तमदादाची शैक्षणिक प्रगती मात्र अगदीच ‘ड’ दर्जाची असावी. दहावीचा घाट त्यानं कसाबसा ओलांडला. बारावीचा कडाही रडतखडत सर केला. पण डिग्री कॉलेजात ए. टी. के. टी. नावाच्या दलदलीत जो त्याचा पाय रुतला, तो निघता निघाला नाही. सरतेशेवटी शा. सुंदरलाल बन्सीलाल यांनी आपल्या या सुपुत्राला एस. टी. डी. बुथ उघडून दिला. मी अंधेरीला राहायला जायच्या आधी ती व्हिडीओ कॅसेट लायब्ररी होती. पण का कोण जाणे, ती एके दिवशी अनंतात विलीन झाली आणि त्या जागी एस. टी. डी. बुथ आला. ‘हीरो कम्युनिकेशन्स, एस. टी. डी., आय. एस. डी. अ‍ॅण्ड पी. सी. ओ.’ अशी पाटी दिमाखात दुकानावर लागलेली दिसे. त्याचबरोबर आपण दिलेल्या गाण्यांच्या यादीबरहुकूम ब्लँक कॅसेटमध्ये गाणी भरून देण्याचा जोडधंदाही उत्तमदादा करत असे. त्यासाठी तो आमच्या एरियात तुफान लोकप्रिय होता. तिथे त्याचं मुख्य गिऱ्हाईक नुकतंच कॉलेजच्या जगात पाऊल ठेवलेल्या मुली असत. त्यामुळे उत्तमदादाचं दुकान हे आमच्यासाठी तीर्थक्षेत्रच होऊन गेलं होतं. पण आम्ही तिथे जाणं म्हणजे कृष्णाच्या रासलीलेला पेंद्यांनी हजेरी लावण्यासारखं होतं. साक्षात् जॅकी श्रॉफचा अवतार तिथे रुबाबात कीचेन फिरवत बसलेला असताना आम्हा शक्ती कपूर छाप पोरटय़ांकडे कोण बघणार होतं? उत्तमदादाचं एस. टी. डी.-पी. सी. ओ.चं दुकान त्या काळात दे मार चाललं होतं. एकूणच आपल्या थोरल्या चिरंजीवांनी फारसं न शिकताही आपलं छोटेखानी राज्य प्रस्थापित केलं आहे या समाधानातच शा. सुंदरलाल वैकुंठलोकी निघून गेले. त्यानंतर काही दिवसांतच तो ‘रंगीला’मधल्या जॅकी श्रॉफसारखा गळ्यात ओढणी बांधून दुकानासमोर बाईक लावताना दिसला आणि उत्तमदादा पितृशोकातून बाहेर आल्याची आमची खात्री झाली. सगळं आबादी आबाद चाललेलं असताना ‘मोबाइल’ नावाच्या सैतानानं नंदनवनात प्रवेश केला. गंमत म्हणजे मी सगळ्यात पहिला मोबाइल उत्तमदादाकडेच पाहिला. मला वाटतं, बत्तीस रुपये पर मिनिट आऊटगोइंग असलेला. तोवर माझं दिल्लीला जायचं नक्की झालं होतं. २००१ साली मी दिल्लीला गेलो आणि २००३ साली भारतात  सगळीकडे इनकिमग फ्री झालं. मी जेव्हा दिल्लीहून पुन्हा मुंबईत आलो तेव्हा जग बदललेलं होतं. हाता- हातात मोबाइल फोन्स आले होते. १८ जून २००३ ला मी पश्चिम एक्स्प्रेसनं दिल्लीहून मुंबईत अवतीर्ण झालो. त्याच रात्री सवयीनं पावलं उत्तमदादाच्या दुकानाकडे वळली. उत्तमदादा तिथे होताच. पण एरवीसारखी अकरा वाजल्यानंतर  ‘हाफ रेट’वर एस. टी. डी. कॉल्स करायला आलेल्यांची रांग नव्हती. उत्तमदादानं माझं जंगी स्वागत केलं. सिग्रेट ऑफर केली. मी एन. एस. डी. ला जाऊनही सिग्रेट प्यायला शिकलो नाही याबद्दल खेद व्यक्त केला. आणि स्वत: सिग्रेटचा झुरका घेऊन मेदूवडय़ासारखे परफेक्ट धुराचे गोल काढून दाखवले. गंधर्वाला अजूनही त्याचे बारीकसारीक चमत्कार जमत होते याचा मला आनंद वाटला. पण त्यात रमण्यापेक्षा माझी नजर दुकानाची जात चाललेली रया पाहण्यात जास्त गुंतली होती. ‘दादा, मोबाइल वाट लावणार. आता प्रत्येकाच्या खिशात आहे.’ ‘टाइमपास आहे सगळा. अंबानी आता ५०० रुपयांत देतोय. नंतर तो बिल पाठवून बांबू घालणार बघ. तेव्हा सगळे भिडूलोग परत आपल्या बूथसमोर लाइन लावणार. बघत राहा तू.’ मृत्यू समोर दिसत असतानाही बहलोल खानावर चालून जाणाऱ्या प्रतापराव गुजरांच्या निश्चयानं उत्तमदादा बोलत होता. पण उत्तमदादाच्या या आशावादाच्या बरोब्बर उलटय़ा दिशेला जग केव्हाच धावत सुटलं होतं. इनकिमग फ्री, मग फोनमध्येच इंटरनेट, मग २-जी, ३-जी, ४- जीची चढती भाजणी ही पावलं जगानं इतक्या वेगानं टाकली, की उत्तमदादासारखे अनेक ‘नाइन्टीज्चे हीरो’ बावचळून गेले. एस. टी. डी.साठी रांगा लावण्याचा काळ गेला. कॅसेटच्या भोकांमध्ये पेन्सिल घालून आतलं रीळ फिरवण्याचा काळ गेला. उत्तमदादाचा काळ गेला. आज उत्तमदादा पन्नाशीच्या धक्क्याजवळ येऊन पोहोचलाय. त्याचा हीरो असलेला जग्गूदादाही आता दुय्यम सिनेमांमध्ये तिय्यम भूमिका करताना दिसतो. पण उत्तमदादा टाइम कॅप्स्यूलच्या बाहेर यायला तयार नाही. काळानं कपाळावरचे केस मागे ढकलले आहेत. पण अजूनही तो मागचे केस मानेवर रुळत ठेवतो.  गंधर्वाचं आता पोट पुढे आलंय. पण बेल्ट लावून पॅन्ट घट्ट आवळायला तो विसरत नाही. त्याचं पी. सी. ओ.चं दुकान अजूनही तसंच आहे. अजूनही भिंतीवर जॅकी श्रॉफ विराजमान आहे. त्या जागेत नेमकं कसलं दुकान चालतं, हे सांगणं अतिशय कठीण आहे. बसायला निमित्त हवं म्हणून आता तिथे ‘हीरो इस्टेट एजंट्स’ असा बोर्ड लटकवलेला आहे. पण मी उत्तमदादाला कधीही, कुणालाही, कुठलीही रियल इस्टेट पाहायला घेऊन जाताना पाहिलं नाही. मधल्या काळात उत्तमदादाचं लग्न झालं. वहिनी अगदीच साध्या आहेत. ‘गाववाली आहे..’ असं उत्तमदादा आवाजातला अपेक्षाभंग लपवत हसत सांगायचा. आमच्या एरियाची मिनी माधुरी दीक्षित सायली शहा उत्तमदादाच्या आकंठ प्रेमात पडून दर आठवडय़ाला नवीन ‘कॅसेट’ बनवण्याच्या निमित्तानं ‘हीरो कम्युनिकेशन्स’च्या  चकरा मारायची, हा इतिहास माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. आता उत्तमदादा एखादं दु:स्वप्न पाहावं तसा जगाकडे पाहतो. मागे मला निराश होऊन तो म्हणाला होता, ‘साली, ही काय गाणी आहेत भिकार७७! उदित नारायणच्या आवाजात काय रोमान्स होता. हे सिंगर साले सॅन्ड पेपरनं लाकूड घासल्यासारख्या आवाजात गातात. यांची गाणी आपल्याला गुणगुणता येत नाहीत. आणि गाणी गुणगुणता नाही आली तर रोमान्स कसा करायचा?’ नव्वदीच्या दशकात तरुण असलेल्या अख्ख्या पिढीची विषण्णता उत्तमदादानं मांडली. शा. सुंदरलालजींच्या कृपेनं उत्तमदादाला वरण-भाताची काळजी करायची गरज नाही. पण आजच्या या स्मार्टफोनच्या जगात उमेदीनं काहीतरी करावं असं उत्तमदादाला अजिबात वाटत नाही. एरवी क्रिकेट मॅच असली की ‘हीरो कम्युनिकेशन्स’मध्ये सार्वजनिक टी. व्ही.ची सोय असे. मॅच बघत उभ्या राहिलेल्या भिकाऱ्यांचंही आदरातिथ्य होत असे. पण तोच उत्तमदादा आता ‘आय. पी. एल.’च्या नावानं बोटं मोडतो. ‘साला मिसळपाव सगळा! कोण कोणाच्या टीममध्ये आहे तेच कळत नाही. झहीर खान आपला मुंबईचा बॉलर.. तो आता दिल्लीचा कॅप्टन! ही काय साली पद्धत झाली! थू!’ फोर-जी टेक्नॉलॉजीच्या वारूवर आरूढ होऊन भरधाव वेगानं चाललेल्या जगाकडे उदासपणे पाहत उत्तमदादा आजही ‘हीरो कम्युनिकेशनन्स’च्या बोर्डखालीच उभा आहे. आता तो मुलाबाळांचा बाप आहे. पण त्यांची आदराची स्थानं याला कळत नाहीत आणि याचा हीरो त्यांना ‘बुढ्ढा’ वाटतो. मागे एका मित्राच्या लग्नात तो सहकुटुंब भेटला होता. मुलाचा हात प्लास्टरमध्ये होता. मी सहज विचारलं, ‘काय रे? कसं लागलं?’ ‘कॅच पकडायला गेलो. पडलो.’ ‘क्रिकेट खेळतोस का?’ त्यानं मान हलवली. मी उत्तमदादाकडे पाहत म्हटलं, ‘तुझा डॅडी सॉलिड बॅट्समन होता. एकदम मोहम्मद  अझरुद्दीन!’ ‘डॅडी, अझरुद्दीन एटले?’’ चिरंजीवांनी बापाकडे पाहिलं. ‘इंडियाना कॅप्टन हता. आइस्क्रीम जोईए के?’ आइस्क्रीम आणायच्या निमित्तानं उत्तमदादानं कल्टी मारली. मुलानं चमत्कारिक नजरेनं माझ्याकडं पाहिलं. ‘अंकल, डॅडी क्रिकेट खेळायचा?’ त्यानं मला विचारलं. ‘म्हणजे? तुला माहीत नाही? अरे तो..’ पुढे मला काही बोलवेच ना. उत्तमदादानं आपली झंझावाती बॅटही ‘हीरो कम्युनिकेशन्स’च्या बोर्डबरोबर अडगळीत फेकून दिली होती. आता तिचं नावनिशाणही उरलं नव्हतं.

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com