आखवेला जाऊन आता जवळजवळ पाच र्वष होतील. कुठलीही वाईट बातमी अचानक, अनाहुत मिळावी तशीच आखवे गेल्याची बातमी मिळाली होती. आमचा कॉमन फ्रेंड विवेक जोशी याचा एका करकरीत सकाळी फोन आला होता- ‘‘आखवे गेला.’’ आयुष्यातल्या अर्निबध  उनाडपणातला एक सोबती गेला. त्याला ‘शेवटचं’ बघायला नव्हतो जाऊ शकलो. पण त्याची खंत नाही. ते शेवटचं दर्शन न घडणं कधी कधी एखाद्याला आपल्या आठवणींत अमर करून जातं. माझ्यासाठी आज ही आखवे या जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी आहे, तितकाच बेहिशेबी, तितकाच वेड७७!

माझी आणि आखवेची मैत्री कशी आणि का झाली, हे मला आज आठवत नाही. खरं तर वयानं तो माझ्यापेक्षा खूप मोठा. जवळजवळ पंधरा-सतरा वर्ष. पण त्याला माझ्याकडून कधीच ‘अहो-जाहो’ केलं गेलं नाही. असं का, याचं उत्तर माझ्याकडे नाही. आमच्याच डहाणूकर कॉलेजचा . पण सुपर सीनिअर! आजही विचारलं तर मला नितीन आखवेविषयी वैयक्तिक माहिती फार नाही. त्याच्या कवितांबद्दल तर त्याहून नाही. तरीही मी आणि आखवेनं एक ‘काळ’ एकत्र घालवला. तो ‘काळ’ संपला.. पण मनात कायमचा उरला. आखवे म्हणजे आजन्म विरही! पांढरे केस, पांढरी दाढी असा अवतार असूनही लहान बाळासारखा डोळे मिचमिचे करून हसताना तो गोड वाटायचा! आखवे जेवढा त्याच्या कवितांसाठी प्रसिद्ध; तेवढाच त्याच्या पिण्यासाठीही. त्याचं दारूवर नाही, नशेवर प्रेम होतं! काही लोकांचं जगणं हे त्यागाचं जगणं असतं. काहींचं शिस्तीचं असतं. काहींचं मेहनतीचं असतं. नितीनचं जगणंच नशेचं जगणं होतं. ‘आता आणखी प्यायलात तर मराल!’ अशा स्पष्ट शब्दांत डॉक्टरांनी त्याला निर्वाणीचं सांगूनही अनेक र्वष झाली होती.. पण तरीही आखवे नशेला आणि नशा आखवेला सोडत नव्हती. मी जेव्हा अंधेरीत राहायचो तेव्हा अचानक कधीतरी त्याचा फोन यायचा- ‘तुझ्या घराजवळच बसलोय. येतोस का?’ मी जायचो. माझ्यासारख्या न पिणाऱ्या माणसाची कंपनी त्याला त्यावेळी का हवी असायची, हे मला कधीच कळलं नाही. पण मला असं वाटायचं की, आखवेला दारूपेक्षा जास्त एकूण आयुष्याचीच नशा होते. दिवसभर ते आयुष्य तो पितो आणि रात्री आयुष्य त्याला चढतं. शराब सिर्फ बहाना है!

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

कवी म्हणून नितीन आखवे खूप मोठा आहे. ‘फुलले रे क्षण माझे’ या गाण्यातच ते सिद्ध होतं. पण कवी म्हणून त्याचं असलेलं मोठेपण मला फार उशिरा कळलं. त्याआधी तो माझा मित्र झाला होता. आखवेचा पहिला आणि बहुतेक एकमेव काव्यसंग्रह जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा मला त्याचं लौकिकार्थानं असलेलं मोठेपण कळलं. जवळजवळ अख्खं पारलं त्या प्रकाशन समारंभाला लोटलं होतं. त्या दिवशी आखवे खूप नीटनेटका, स्वच्छ आणि जबाबदार दिसण्याचा प्रयत्न करत होता. एरवी कुठेही गेलं की त्याचा आविर्भाव शेवटच्या बाकावर बसून वर्गशिक्षिकेला कॉम्प्लेक्स देणाऱ्या विद्यार्थ्यांचाच असायचा. त्या दिवशी आपल्या आईबद्दल बोलताना आखवे खूप गहिवरला. तसा त्याला गहिवरताना मी अनेक वेळा अनेक बारमध्ये बघितला होता; पण त्या दिवशीचं गहिवरणं वेगळं होतं. कारण एरवी तो असा गहिवरला की मी घडय़ाळ बघू लागायचो. त्या दिवशी  वेळेनं पुढे जाऊच नये असं वाटत होतं. कारण तो आखवेच्या आयुष्यातला एक ‘हाय पॉइंट’ होता. आणि का कोण जाणे, मला तो क्षण काही तासांचा व्हावा असं वाटत होतं.

‘क्षण’ हा मी लिहिलेला पहिला चित्रपट. त्या चित्रपटातली सगळी गाणी आखवेनं लिहिली आहेत. ‘क्षण’चा नायक प्रेमात हरलेला गायक.. ज्याचं प्रेम यशस्वी होऊ शकलं नाही असा एक मनस्वी कलाकार. त्यामुळे त्याची गाणी लिहिणं म्हणजे विराट कोहलीला ओळीनं सहा फुलटॉस मिळण्यासारखं होतं. आखवेनं प्रत्येक गाण्यात षटकार ठोकला आहे. त्यावेळी आखवेनं चकाल्याला एक खोली भाडय़ानं घेतली होती. तिथे तो लिहायला बसत असे. माझ्या घरापासून आखवेची ही कुटी बाईक फेकली की पाच मिनिटांच्या अंतरावर होती. जवळजवळ रोज रात्री मी आखवेला भेटायला जात असे. आखवे नशेत असायचा. दारूच्या नाही. विरहाच्या. ‘क्षण’ची गाणी लिहून होईपर्यंत आखवेनं दारूला हातही लावला नव्हता. ‘‘चांगली गाणी लिहून होतायत मित्रा. उद्या त्याचं क्रेडिट दारूला जायला नको.’’ असं एक तिरपागडंच लॉजिक होतं त्याचं. ज्या दिवशी गाण्यांचं रेकॉर्डिग  झालं त्या दिवशी आखवे बऱ्याच दिवसांनी ‘बसला.’ चकाला सिग्रेट फॅक्टरीसमोरच्या ‘योगी’ नावाच्या बारमध्ये हा प्रेमयोगी मग पहाटे पाचपर्यंत त्याचा ‘दर्द’ मला ऐकवत राहिला. सामान्यपणे दारूच्या नशेत माणसं किस्से, कहाण्या सांगतात. काय झालं? कुठे बिनसलं? ती कशी सोडून गेली? पण आखवे फक्त कविता करायचा. घडून गेलेल्या गोष्टींची भलीथोरली कविता करून त्यानं त्याच्या रक्तात कायमची भिनवली होती. तीच त्याच्या लेखणीवाटे  हप्त्याहप्त्यानं बाहेर पडत असावी.

आखवेचे ‘किस्से’ पाल्र्यातल्या त्या सर्कलमध्ये तरी मशहूर आहेत. अभय परांजपेंनी एकदा मला सांगितलं होतं. त्यांच्या ओळखीत कोणालातरी भेटायला ते आणि नितीन गेले होते. वेळेपेक्षा लवकर पोहोचले. काय करायचं, म्हणून कुठेतरी बसले. वेळ जरा जास्तच गेला. त्यामुळे अंमळ जास्तच आनंद लुटला गेला. बाहेर पडताना आखवेनं कॉन्फिडन्टली सांगितलं, ‘तू टेन्शन घेऊ नको रे! चढलेली उतरवण्याची नवीन टेक्निक आहे.. शीर्षांसन घालायचं.’ असं म्हणून त्यानं अभयसरांच्या बाईकवरच शीर्षांसनाचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि पलीकडच्या बाजूला जाऊन दाणकन् पडला. असे असंख्य किस्से आखवेच्या नावे जमा आहेत. पण नितीन आखवे नावाचा माणूस या किश्श्यांच्या खूप पलीकडे होता.

त्याच्या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ म्हणजे त्याची बायोग्राफीच होती जवळजवळ. फुलपाखरू फुलातून मधुकण वेचतं आहे आणि त्याचवेळी त्याचे पंख जळत आहेत. आखवेनं  भावनांचे असंख्य  मधुकण  त्याच्या कवितेतून वेचले. पण त्या कवितांचे पंख सतत जळत राहिले. त्याच्या एकूणच सगळ्या कवितांना  दु:खाची, विरहाची धारदार किनार होती. ती कुठून आली होती, हे मला आमच्या इतक्या वर्षांच्या मैत्रीत कधीच कळलं नाही. ‘ती’ कोण होती- जिनं आमच्या या फुलपाखराचे पंख पेटवले होते. खरंच अशी कुणी होती, की आखवे येतानाच हे करुणेचं संचित सोबत घेऊन आला होता? कधीच कळलं नाही. आता कळण्याची शक्यता नाही.. आणि गरजही नाही. आखवे मला भेटलेला ‘देवदास’ होता. आणि मी बहुदा त्याला सुखरूप घरी पोहोचवणारा त्याचा तो रामूकाका. इतक्या मलंग प्रवृत्तीच्या माणसानं आयुष्यभर बँकेत नोकरी करावी हीसुद्धा एक गंमतच होती. युनायटेड वेस्टर्न बँकेत आखवे नोकरीला होता. या वारा प्यायलेल्या वासराला सांभाळताना त्याच्या  सहकर्मचाऱ्यांची आणि साहेबांची काय तारांबळ उडत असणार, हा मोठय़ा कल्पनाविलासाचा विषय आहे.

आखवे गेल्याचं कळलं तेव्हा डोळे पाणावले नाहीत, की गळा दाटून आला नाही. पण एक क्षण मी होतो तसाच थांबलो. मागच्या सहा-सात वर्षांतल्या अनेक रात्री डोळ्यांपुढून सरकल्या. त्याचा तो लहान मुलासारखा होणारा चेहरा आठवला. ‘आनंद’ सिनेमातलं अमिताभचं वाक्य आठवलं- ‘आनंद कभी मरते नहीं है.’ मी माझ्यासाठी या वाक्यात ‘आनंद’ हा शब्द ‘आखवे’नं रिप्लेस केला.. आणि पुढे जगू लागलो!

चिन्मय मांडलेकर –  aquarian2279@gmail.com